आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेकडो छापे टाकूनही सापडेना एकही साठेबाज, पुरवठा विभागाचे ४२४ ठिकाणी छापे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- तूरडाळीचे भाव नियंत्रित रहावेत, यासाठी सरकारच्या निर्देशानुसार जिल्हा पुरवठा विभागाने नियुक्त केलेल्या पथकाने जिल्ह्यात विविध ठिकाणी ४२४ ठिकाणी छापे टाकले. मात्र, त्यात किलोभरही अतिरिक्त तूर डाळ सापडली नाही. त्यामुळे या कारवाईबाबतच साशंकता निर्माण झाली आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून पुरवठा विभागाची छाप्याची कारवाईही थंडावली आहे.
उत्पादनात घट झाल्याने मागील काही दिवसांत तूर डाळीचे भाव २०० रुपये किलोवर गेले होते. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडून पडले. भाव नियंत्रित रहावेत, यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलून डाळीच्या साठ्यांवर निर्बंध घालण्याचा निर्णय १४ ऑक्टोबरला घेतला. महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद या क्षेत्रासाठी तूर डाळीचा साठा निश्चित करण्यात आला होता. सरकारने निर्बंध घातल्यानंतर नगर जिल्ह्यात तूर डाळींच्या साठेबाजीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी जितेंद्र वाघ यांच्या आदेशानुसार २३ स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली. तहसीलदार तालुका पुरवठा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात अालेल्या या पथकांनी अनेक तालुक्यांमध्ये छापे घातले. मात्र, या छाप्यात किलोभरही अतिरिक्त डाळ आढळून आली नाही. श्रीरामपूरमध्ये पुरवठा विभागाने तीन ठिकाणी छापे घातले. तेथे २४५ क्विंटल तूर डाळ आढळून आली. मात्र, ती अतिरिक्त नसल्याने केवळ डाळ ताब्यात घेऊन नंतर ती व्यापाऱ्यांना परत करण्यात आली.

पुरवठा िवभागाने जिल्ह्याच्या विविध भागात ४२४ छापे टाकले, मात्र प्रत्यक्षात मूठभर डाळही अतिरिक्त आढळून आली नाही. त्यामुळे पुरवठा विभागाच्या या कारवाईबाबतच साशंकता व्यक्त केली जात आहे. छापे सुरु असताना डाळीचे भाव अजूनही सर्वसामान्यांच्या अावाक्याबाहेरच आहेत. सध्या किरकोळ बाजारात १५० ते १९० रुपये किलोने तुरीच्या डाळीची विक्री केली जात आहे. डाळीचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांच्या रोजच्या जेवणातून तुरडाळ गायब झाली आहे. तुरडाळीबरोबरच उडिदाच्या डाळीचेही भाव वाढले असून, किरकोळ बाजारात १६० रुपये किलो दराने उडीदाच्या डाळीची विक्री केली जात आहे.

विखेंनी फोडले बिंग
शिवसेना-भाजपमध्येतूर डाळीच्या दरावरुन चांगलीच जुंपलेली असताना सर्वसामान्यांना चढ्या दराने डाळ घ्यावी लागत आहे. राज्य सरकारने १०० रुपये किलो दराने डाळ विक्री करण्याची घोषणा केली अाहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांना कोपरगाव येथे एका किराणा दुकानात जाऊन पाहणी केली असता डाळीचा भाव १८० रुपये किलो भाव असल्याचे त्यांना आढळले.

...तर थेट कारवाई
तूर डाळ खाद्यतेलांच्या साठ्यांवर सरकारने निर्बंध घातले आहेत. जिल्ह्यात १४ ऑक्टोबर ते नाेव्हेंबरपर्यंत ४२४ छापे घातले. कुठेही प्रमाणापेक्षा जास्त तूर डाळ आढळून आलेली नाही. अतिरिक्त डाळीचा साठ आढळल्यास संबंधितांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल.'' जितेंद्रवाघ, जिल्हा पुरवठा अधिकारी.

मूग डाळही महागली
तूरडा‌ळीच्या दरात मोठी वाढ झाली असताना मूग डाळीचे भावही गगनाला भिडले आहेत. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने मुगाच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे मुगाच्या डाळीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे. किरकोळ बाजारात मूग डाळीची विक्री १२५ ते १५० रुपये दराने होत आहे.

कारवाईचा फार्स
कारवाईचा फार्स केला गेला. जप्त डाळ धान्य दुकानांतून उपलब्ध करावी, अशी आमची मागणी होती. मात्र, सरकारने जप्त डाळ व्यापाऱ्यांना विक्रीसाठी दिली आहे.'' राधाकृष्णविखे, विरोधी पक्षनेते.