आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढवण यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशी मागे, आठ दिवसांत पथदिवे : आयुक्तांचे आश्वासन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापालिका कार्यालयात दोन दिवसांपासून बैठा सत्याग्रह करणाऱ्या नगरसेविका शारदा ढवण यांनी मंगळवारी दुपारनंतर आंदोलन मागे घेतले. आठ दिवसांत प्रभागात पथदिवे बसवण्यात येतील, असे आश्वासन आयुक्त विलास ढगे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

प्रभाग मधील नागरिकांनी लोकसहभागातून घेतलेल्या ट्यूबलाईट बसवून द्याव्यात, तसेच जेथे पथदिवे नाहीत, तेथे दिवे बसवावेत, या मागणीसाठी नगरसेविका ढवण शिवसेनेचे उपशहर प्रमुख दिगंबर ढवण यांच्या नेतृत्वाखाली मनपा कार्यालयात सोमवारपासून ठिय्या आंदोलन करण्यात आले. सोमवारी दिवसभर तोडगा निघाला नाही. त्यामुळे ढवण यांनी दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरू ठेवले. नगरसेवक अनिल शिंदे, दिलीप सातपुते, संभाजी कदम, विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नितीन शेलार आदींनी आंदोलनास पाठिंबा दिला होता. आयुक्त ढगे यांच्याशी आंदोलकांनी मंगळवारी दुपारी चर्चा केली. आठ दिवसांत दिवे बसवण्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतर आंदाेलन मागे घेण्यात आले.

महापालिकेत पोतराज नृत्य
दोनदिवस आंदोलन करूनही प्रशासनाला जाग येत नसल्याने ढवण यांनी दुसऱ्या दिवशी जोरदार घोषणाबाजी केली. मनपा कार्यालयात पोतराजांनी नृत्य केले. त्यामुळे मनपा कार्यालय दणाणून गेले होते. आंदोलन सुरू असल्याने मनपा कार्यालयात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवाय महापालिकेची सर्व प्रवेशद्वारे बंद करण्यात आली होती. त्यामुळे मनपा कार्यालयात कामासाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. दिगंबर ढवण यांनी काही दिवसांपूर्वी विद्युत विभागप्रमुख बाळासाहेब सावळे यांना तब्बल चार तास कोंडून निषेध केला होता.