आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणूस असल्याची जाणीव इथे झाली, माझ्यासाठी तर हे देवालय...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकार्पणप्रसंगी डॉ. सुजय विखे, प्रकाश आपटे, अरविंद पारगावकर, अजय साठे, रमेशकुमार एन, अरूण शेठ अन्य. - Divya Marathi
लोकार्पणप्रसंगी डॉ. सुजय विखे, प्रकाश आपटे, अरविंद पारगावकर, अजय साठे, रमेशकुमार एन, अरूण शेठ अन्य.
नगर- पंधरावर्षे दुर्धर आजारावर मी उपचार घेते आहे. सरकारी काही खासगी रुग्णालयात भेदभाव, अस्पृश्यता आणि उपचारांना नकार मी अनुभवला. आपण नकोसे झालो ही भावना निराश करणारी होती. परंतु आमच्या मनुष्यत्वाची जाणीव केअरिंग फ्रेंड्स रुग्णालयाने आम्हाला करून दिली. जगण्याची नवी उमेद देणारे हे रुग्णालय आमच्यासाठी देवालयचं आहे... 
 
केअरिंग फ्रेंड्स रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यानंतर तेथे उपचार घेणाऱ्या रुग्णांना पाहुण्यांनी विचारले, येथे कसे वाटते. यावर एका महिलेने ही प्रतिक्रिया व्यक्त केली. या स्वतंत्र रुग्णालयाची गरज कशासाठी, याचे उत्तर यातून सर्व उपस्थितांना मिळाले. समाजातील प्रत्येकाला परवडणाऱ्या शुल्कात, भेदभावरहित, दर्जेदार उपचार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर स्नेहालयाच्या पुनर्वसन संकुलात उभारण्यात आले. त्याच्या लोकार्पणप्रसंगी अजय साठे (ग्रूप हेड, बजाज फिन्सर्व), डॉ. सुजय विखे (सीईओ, डॉ. विखे फाउंडेशन), अरविंद पारगावकर (प्रमुख, लार्सन अँड टूब्रो प्रयास फाउंडेशन), रमेशकुमार एन. (उपाध्यक्ष. क्रॉम्प्टन ग्रीव्हज् पॉवर अँड इंडस्ट्रीयल सोल्युशन्स), स्नेहालयचे ज्येष्ठ विश्वस्त अरुण शेठ, डॉ. मार्सिया वॉरने आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सिंजेन्टा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश आपटे होते. 
 
रुग्णालयाचे मानद संचालक डॉ. सुहास घुले यांनी प्रास्ताविक केले. एचआयव्हीबाधितांसाठी भारतात पहिले निवासी उपचार आणि पुनर्वसन केंद्र स्नेहालयाने दोन तपांपूर्वी केवळ लोकाश्रय आणि कार्यकर्त्यांच्या श्रमसहयोगातून एका झोपडीत सुरू केले. जिल्ह्यातील लालबत्ती विभाग पूर्णतः गुप्तरोगमुक्त केल्यावर झोपडपट्ट्यांतील आणि वंचित समूहातील रुग्णांसाठी उपचार देण्यासाठी दवाखाने नगर शहरासह सहा तालुक्यांतील वस्त्यांमधून सुरू करण्यात आले. बदलत्या परिस्थितीत आर्थिक दुर्बल समूहातील प्रत्येकाला परवडणाऱ्या शुल्कात, भेदभावरहित आणि दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्यासाठी सुसज्ज केअरिंग फ्रेंड्स रुग्णालय आणि संशोधन केंद्र उभारण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. 
 
स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स रुग्णालयाने नगरला नवी ओळख दिल्याचे पारगावकर यांनी सांगितले. डॉ. विखे म्हणाले, स्नेहालयाने लोकसहभागातून, शासकीय मदतीशिवाय उभे केलेले कार्य प्रेरित करणारे आहे. मिलिंद एकनाथ कुलकर्णी म्हणाले, बजाज फायनान्स, व्हर्गो फाउंडेशन, लार्सन अँड टूब्रो, प्रयास फाउंडेशन, इंग्लंडमधील मर्क्युरी फिनिक्स ट्रस्ट अशा अनेकांच्या सहयोगातून या रुग्णालयाची उभारणी झाली. डॉ. नीलेश परजणे आणि प्रवीण मुत्याल यांनी रुग्णसेवेबद्दल माहिती दिली. डॉ. प्रीती भोंबे आणि अमित काळे यांनी सूत्रसंचालन केले. अपर्णा बालटे यांनी प्रेरणागीत सादर केले. आर्किटेक्ट अर्शद शेख, इंजिनिअर शिरीष कुलकर्णी वास्तू उभारणाऱ्या कामगारांचा गौरव करण्यात आला. 
 
पाचवा सत्यमेव जयते दिन 
पाचवासत्यमेव जयते दिन स्नेहालयात साजरा झाला. त्यानिमित्त एचआयव्हीबाधितांचा राज्यस्तरीय वधू-वर मेळावा स्नेहालय पुनर्वसन संकुलात झाला. संसदेने एचआयव्ही बाधितांसाठी मूलभूत अधिकार प्रतिष्ठा देणारा कायदा संमत केला. त्याची माहिती देण्यासाठी एड्सग्रस्तांची जागृती परिषदही झाली. देह व्यापारातील बळी महिलांनी या आयोजनात पुढाकार घेतला. स्नेहालयच्या विश्वस्त जया जोगदंड, संगीता शेलार, सहसंयोजक विष्णू कांबळे, दीपक बुरम, यशवंत कुरापट्टी यांनी हे आयोजन केले. 
 
बातम्या आणखी आहेत...