आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय नेत्यांसाठी नेमलेल्या जेलरचे अप्रकाशित पुस्तक प्रदर्शनात!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल आदी १२ राष्ट्रीय नेत्यांना नगरच्या भुईकोट किल्ल्यात बंदिवासात ठेवण्यात आले होते, तेव्हा जेलर म्हणून नेमणूक झाली होती बालकराम जी. मेहता यांची. १९४२ ते ४५ या काळात या नेत्यांच्या दिनक्रमाच्या व अन्य महत्त्वाच्या नोंदी बालकराम यांनी आपल्या हस्तलिखितात करून ठेवल्या आहेत. हा दस्तऐवज पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाचे सचिव श्री. मा. भावे यांना योगायोगाने मिळाला. "माय रेमिनिसन्सेस ऑफ द अहमदनगर फोर्ट ड्युरिंग द इयर्स १९४२-१९४५' या शीषर्काचे हे दुर्मिळ पुस्तक भावे यांनी १४ ते १६ नोव्हेंबरदरम्यान नगरच्या किल्ल्यात भरणाऱ्या प्रदर्शनासाठी उपलब्ध केले आहे.
राष्ट्रीय नेत्यांना विशेष बंदोबस्तात ठेवण्यासाठी ब्रिटिश सरकारने नगरच्या अभेद्य किल्ल्याची निवड केली होती. चले जाव आंदोलनाचा वणवा संपूर्ण देशात भडकला होता. आपल्या नेत्यांना सोडवण्यासाठी क्रांतिकारक वाट्टेल ते साहस करतील, अशी भीती इंग्रज सरकारला होती. म्हणून त्यांनी किल्ल्यात तयार केलेल्या खास तुरुंगाची जबाबदारी बालकराम यांच्यावर सोपवली.
जेलर मेहता यांनी लिहिलेले हे हस्तलिखीत अजून प्रकाशित झालेले नाही. टंकलिखित स्वरूपातील ही प्रत खासगी वितरणासाठी तयार करण्यात आली असावी. फूलस्केपची १५२ असलेल्या या पुस्तकाच्या प्रारंभी बालकराम यांची स्वाक्षरी असून त्याखाली "१-८-६०' अशी तारीख टाकण्यात आली आहे.
बालकराम हे १९४२ मध्ये पुण्यातील येरवडा तुरुंगात दुय्यम तुरुंगाधिकारी म्हणून काम पहात होते. सरकारने अतिशय गुप्तपणे त्यांची बदली नगरच्या किल्ल्यात केली. २ सप्टेंबर १९४२ रोजी या कैदखान्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. मेजर एम. सँडक हा युरोपियन अधिकारी या कैदखान्याचा प्रमुख होता.
किल्ल्यात पाऊल ठेवल्यापासूनचे वर्णन बालकराम यांनी केले आहे. राजबंद्यांच्या कोठड्या, तेथील साहित्य, स्वयंपाकघर, स्वच्छतागृह, दिवसभरातील कार्यक्रम, त्यांचे वाचन, खेळ याबरोबरच प्रत्येक राजबंद्याचे अतिशय बोलके व्यक्तिचित्र बालकराम यांनी ओघवत्या शैलीत रेखाटले आहे. या दस्तऐवजाचा किल्ल्याच्या विकासासाठी व तेथे होणाऱ्या संग्रहालयासाठी मोठा उपयोग होणार आहे. डॉ. शशी धर्माधिकारी यांनी पुण्यात भावे यांची भेट घेऊन नगरच्या प्रदर्शनासाठी हे दस्तएेवज देण्याची मागणी केली. भावे यांनी त्याला आनंदाने संमती दिली. १४ रोजी होणाऱ्या उदघाटन समारंभास ते स्वत: उपस्थित राहणार आहेत.
नव्याने प्रकाश पडणार
पंडित नेहरूंचे चरित्रकार एस. गोपाळ (माजी राष्ट्रपती राधाकृष्णन यांचे चिरंजीव) यांनी नेहरूंच्या नगरच्या किल्ल्यातील बंदिवासाविषयी लिहिले आहे. मात्र, बालक राम यांचे पुस्तक अप्रकाशित असल्याने त्यांना आपल्या लिखाणासाठी त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे किल्ल्यातील घडामोडींविषयीचे अनेक तपशील अद्याप उजेडात आलेले नाहीत. या पुस्तकामुळे अनेक गोष्टींवर नव्याने प्रकाश पडणार आहे.