आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिवासी विद्यार्थ्यांचे 36 तास अन्नत्याग आंदोलन, अधिका-यांनी दिले लेखी आश्वासन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - आदिवासी शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून अन्नत्याग करून मांडलेले ठिय्या आंदोलन रविवारी रात्री ३६ तासांनंतर मागे घेण्यात आले. आदिवासी प्रकल्प अधिकारी एम. एस. ठुबे यांनी विद्यार्थ्यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मागण्या पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी इरेला पेटल्यामुळे हे आंदोलन रविवारी रात्रीही उशिरापर्यंत चालूच होते. मात्र, लेखी स्वरूपात सकारात्मक आश्वासन मिळाल्याने त्यांनीही माघार घेतली.

 

जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातून शहरात शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी या वसतिगृहात राहतात. येथे निकृष्ट पद्धतीचे जेवण अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. तसेच वसतिगृहाचे गृहपाल यांच्या मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त करून, त्यांच्या बदलीची मागणी केली. जोपर्यंत गृहपालाची बदली होत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार असल्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला होता.

 

या आंदोलनात राष्ट्रवादीचे नगरसेवक कुमारसिंह वाकळे, संपत बारस्कर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, निखिल वारे, लतिका पवार, तसेच चर्मकार उठाव संघाचे अशोक कानडे, गौतम सातपुते, प्रकाश पोटे, सुनील केदार, विलास भारमल आदींनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याची आग्रही मागणी केली होती. त्यामुळे रविवारी रात्री आदिवासी प्रकल्प अधिकारी एम. एस. ठुबे नाशिकहून नगरला आले.

 

विद्यार्थ्यांनी गृहपालाची तातडीने बदली करण्याचा हट्टा धरलेला होता. ठुबे यांनी तडकाफडकी बदली करता येत नसल्याचे स्पष्ट करून, त्यांच्यावर कारवाई प्रक्रिया राबवणार असल्याचे स्पष्ट केले. ठुबे यांनी यावेळी विद्यार्थ्यांसोबत इतर प्रश्नांवरही सविस्तर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ, असे सांगितले. आजवर झालेल्या विद्यार्थ्यांच्या असुविधेबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे वेळकाढूपणामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांवर आंदोलनाची वेळ आली, असा आरोप करत उपस्थितांनी शासकीय यंत्रणेचा निषेध करून या यंत्रणेत बदल करण्याची मागणी केली होती. आदिवासी प्रकल्प अधिकारी ठुबे यांनी लेखी आश्वासन देत विद्यार्थ्यांना अांदोलन मागे घेण्याची विनंती केली. नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आश्वासनांची पूर्तता कधी होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

या प्रमुख मागण्या
वसतिगृहाचे गृहपाल धनंजय खेडकर यांची तातडीने बदली करावी, विद्यार्थ्यांना मंजूर क्षमतेइतकी शासकीय इमारत उपलब्ध करून द्यावी, विद्यार्थ्यांसाठी कॉट, नेट सुविधा, संगणक लॅब, अभ्यासिका वर्ग, शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्धता करून द्यावी, विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या जेवणात तातडीने सुधारणा करावी.

 

चांगले जेवण द्या...
भोजनासाठीनवीन ठेकेदार नेमण्यासाठी ई-टेंडर राबवण्यास किंवा विद्यार्थ्यांच्या खात्यात जेवणाचे पैसे वर्ग करण्यास ठुबे यांनी सांगितले. खात्यात पैसे जमा करण्यास विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवत चांगल्या दर्जाचे जेवण उपलब्ध करण्याची मागणी केली. नवीन इमारत भाड्याने घेण्यासाठी प्रक्रिया राबवू, असे ठुबे म्हणाले.

 

असा काढला पर्याय
गृहपाल खेडकर यांच्याबाबत तक्रारी होत्या. त्यामुळे गृहपालपदाची पर्यायी व्यवस्था दोन दिवसांत केली जाईल. आयुक्तांच्या मान्यतेने एक संगणक दोन महिन्यांत मिळेल. पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था, भोजन ठेक्याची टेंडरिंग केली जाईल. नवीन प्रशस्त इमारतीसाठी लवकर पावले उचलली जातील.

 

बातम्या आणखी आहेत...