आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास प्रशासकीय कारवाई करू, जनता दरबारात तक्रारींचा भडिमार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जनता दरबारात विविध नागरिकांनी दाखल केलेल्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री राम शिंदे यांनी गुरुवारी दिला.

सर्वसामान्यांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही व्हावी, या हेतूने जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रियदर्शनी हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या जनता दरबारात शिंदे बोलत होते. जिल्हाधिकारी अनिल कवडे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, अतिरिक्त जिल्हाधिकारी शरद जाधव, अतिरिक्त पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, उपविभागीय अधिकारी वामन कदम, जिल्हा कोषागार अधिकारी विजय कोते, नियोजन अधिकारी एस. बी. व्हरसाळे, सहायक आयुक्त माधव वाघ, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा शल्यचिकित्सक एस. एम. सोनवणे, उपजिल्हाधिकारी दत्तात्रेय बोरुडे आदी यावेळी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, सर्वसामान्यांना न्याय मिळावा, हा जनता दरबाराचा उद्देश आहे. नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देऊन त्या सुटाव्यात यासाठी स्वत: मी पालकमंत्री या नात्याने जनता दरबारास उपस्थित राहून प्रश्नांचा पाठपुरावा करणार आहे. यापुढे प्रत्येक महिन्यात जनता दरबार आयोजित करून जनतेचे प्रश्न सोडवले जातील. आज आलेल्या तक्रारींवर पुढील जनता दरबारापर्यंत कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संबंधित कार्यालयांना देण्यात आले आहेत.

शिंदे यांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश िदले. सार्वजनिक बांधकाम, पोलिस प्रशासन, जिल्हा परिषद, सहकार, महावितरण पाणीपुरवठा विभागाशी संबंधित तक्रारी दाखल झाल्या होत्या. जनता दरबारानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, जनता दरबारात दाखल झालेल्या सर्व तक्रारींचे निवारण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

आज एकूण १४० तक्रारी आल्या. आलेल्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल,असे शिंदे म्हणाले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अशोक गायकवाड यांनी नेवासे येथील तहसीलदारांबाबत तक्रार करून त्यांच्या बदलीची मागणी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रियदर्शनी हॉल येथे आयोजित जनता दरबारात नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेताना पालकमंत्री राम शिंदे, जिल्हाधिकारी अनिल कवडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी शरद जाधव.

मुरकुटे वगळता अन्य आमदारांनी फिरवली पाठ
पालकमंत्रीराम शिंदे यांनी गुरुवारी बोलवलेल्या पहिल्याच जनता दरबाराकडे जिल्ह्यातील भाजपच्या तीन आमदारासह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी पाठ फिरवली. ज्या पक्षाचे पालकमंत्री आहेत त्या पक्षाचे तीन आमदारही यावेळी अनुपस्थित होते. केवळ नेवासे मतदारसंघाचे भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी जनता दरबारात हजेरी लावली.

बियर बार बंद करण्यासाठी साकडे
चारिदवसांपूर्वी सुपा टोलनाक्याजवळील बिअर बारच्या उद्घाटनावरून चर्चेत आलेले गृहराज्यमंत्री राम शिंदे यांना जनता दरबारात नगर-मनमाड रस्त्यावरील नागापूर परिसरात सुरू असलेला अनधिकृत बिअर बार बंद करण्यासाठी विजय बोरा यांनी साकडे घातले. या बारचे सर्व पुरावे आपल्याकडे असून, संबंधित बार मालकाने कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे तातडीने कारवाई करावी, अशी मागणी बोरा यांनी केली आहे.

जिल्ह्यात दारूला प्रतिष्ठा मिळू देणार नाही...
व्यसनमुक्तीअभियान जिल्ह्यात दारुबंदीसाठी प्रयत्न करत आहेत. याबाबत मंत्री शिंदे यांना विचारले असता, ते म्हणाले, सरकार या अभियानामागे उभे राहील. दारूला प्रतिष्ठा दिली जाणार नाही, याची काळजी घेतली जाईल. राजकीय गुन्हे मागे घेण्याबाबत दोन बैठका झाल्या आहेत. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. पाच लाखांपेक्षा जास्त नुकसान असलेले गुन्हे मागे घेतले जाणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले.