आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदी असतानाही पाथर्डीत जातपंचायतीचे आयोजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जग एकविसाच्या शतकात वाटचाल करत असताना जिल्ह्यात मात्र जातींचा पगडा काही केल्या संपायला तयार नाही. पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर गावात दोन दिवसांपूर्वी एक जातपंचायत झाली. अनेक संवेदनशील प्रकरणांचा न्यायनिवडा तेथे होणार होता. त्याबदल्यात लाखोंची वसुलीही होणार होती. मंगळवारी एका प्रकरणात वाद झाल्यामुळे पोलिसांना जातपंचायतीची कुणकुण लागली. अन् पोलिस तेथे आल्याने ही जातपंचायत बरखास्त करून पुढे ढकलण्यात आली.
टाकळी मानूर येथून दीड किलोमीटर अंतरावर अंबिकानगर आहे. तेथे ही जातपंचायत भरली होती. नगरसह वेगवेगळ्या जिल्ह्यांतील कौटुंबिक कलह, पती-पत्नींमधील वाद, भाऊबंदकीची प्रकरणे न्यायनिवाड्यासाठी मांडलेली होती. जातीबाहेर काढलेल्या व्यक्तींना पुन्हा जातीत घेण्यासाठी पंचांकडून लाखो रुपयांची मागणी केलेली होती. चार-पाच दिवस चालणाऱ्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतील एकूण १० पंचांसमोर न्यायनिवाडा होणार होता. पाथर्डी पोलिसांना याची कुणकुण लागल्याने त्यांनी अंबिकानगर गाठले. त्यामुळे पंचांना गाशा गुंडाळावा लागला.
ही जातपंचायत वर्षातून एकदाच न्यायनिवाडा करायला बसते. वीस वर्षांपूर्वी घोडेगाव (ता. नेवासे) येथे एका कुटुंबातील कलह मिटवण्यासाठी जातपंचायत बसली होती. मात्र, प्रचंड वादावादी होऊन धारदार शस्त्रांनी हाणामाऱ्या झाल्या. त्यानंतर काही वर्षे जातपंचायत भरलीच नाही. नंतर काही पंचांनी एकत्र येत इतरत्र जातपंचायत भरवणे सुरू केले. सध्या या पंचायतीत १० पंचांचा समावेश आहे. ते कुकाणा (ता. नेवासे), टाकळी मानूर, धनगरवाडी (ता. नगर), आष्टी तालुक्यातील दैठणे धामणगाव, ढोकराई (दौंड) पाथरवाला (ता. शेवगाव) चे आहेत.

मंगळवारी सकाळी भरलेल्या जातपंचायतीला विविध जिल्ह्यांतून आलेले सुमारे साडेचारशे ते पाचशे लोकांचा जमाव उपस्थित होता. आळेफाटा येथील एक प्रकरण सुनावणीसाठी पंचांसमोर आले होते. पत्नीला काळ्या रंगाचे बाळ झाले, म्हणून पतीला तिच्यापासून फारकत हवी होती. मात्र, या महिलेच्या वडिलांचे काही पंचांचे सुनावणी सुरु असताना वाद झाले. त्याची परिणती हाणामारीत होण्यापूर्वीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पाहताच जमाव पांगला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत पंचांनी उलटसुलट उत्तरे दिली.

लाखोंची होते मागणी
एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला असेल, तर त्याला जातीबाहेर टाकले जाते. पुन्हा त्याला जातीत घेण्यासाठी ते लाखांची नुकसान भरपाई पंच मागतात. कोणत्याही परिस्थितीत ही रक्कम परत केली जात नाही. अंबिकानगरला भरलेल्या जातपंचायतीत अशा प्रकारची ४-५ प्रकरणे सुनावणीसाठी आली होती. शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव येथील एकाला पुन्हा जातीत घेण्यासाठी पाच लाखांची मागणी करण्यात आली. या व्यक्तीची ऐपत नसल्यामुळे त्याला गेल्या काही वर्षांपासून जातीबाहेर हाकलण्यात आले आहे.

ही शरमेची बाब
^जातपंचायत भरल्याची माहिती मिळाल्याने आम्ही घटनास्थळी निघालो. पण तत्पूर्वीच पोलिस आल्याने जमाव पांगला. जातपंचायती भरणे ही शरमेची बाब आहे. जातपंचायत बरखास्त व्हाव्या, म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रयत्नशील आहे. जातपंचायतींना मूठमाती देण्याचे अभियान राबवत आहे. जातपंचायतीच्या संबंधित बहिष्कृततेच्या विरोधातील कायदा केंद्राकडे संमतीसाठी पाठवलेला आहे.'' अॅड.रंजना गवांदे, जिल्हा कार्याध्यक्ष, अंनिस, अहमदनगर.

....तेथे सदस्य नोंदणी सुरू होती!
^चौकशीत एका विशिष्ट समुहाचे लोक एकत्र आल्याचे दिसले. संघटना अथवा काही कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी सदस्य नोंदणी करण्यात येणार होती. कसलीही जातपंचायत भरलेली नव्हती. कोणाचीही काहीही तक्रार नव्हती. त्यामुळे आम्ही तेथून निघून आलो.'' नंदकुमारशेळके, पोलिस निरीक्षक, पाथर्डी.
बातम्या आणखी आहेत...