आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jaundice Condition, Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी वाचला 'काविळ'चा पाढा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहरात पसरलेल्या काविळच्या साथीवर नगरसेवकांनी बुधवारी सर्वसाधारण सभेत तब्बल अडीच तास चर्चा केली. आयुक्त विजय कुलकर्णी, आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजूरकर, पाणीपुरवठा विभागप्रमुख परिमल निकम यांच्यासह अनेक अधिका-यांना धारेवर धरत नगरसेवकांनी संताप व्यक्त केला.

महापौर संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक महत्त्वाचे विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. मात्र, कावीळ व डेंग्यूच्या आजाराने शहरातील शेकडो नागरिक त्रस्त असल्याने नगरसेवकांनी सभेच्या सुरुवातीलाच अजेंड्यावरील विषयांवर चर्चा न करता काविळवर चर्चा सुरू केली. नगरसेवक कैलास गिरवले यांनी आयुक्त कुलकर्णी यांना टार्गेट केले. आयुक्त हे कुटुंबप्रमुख म्हणून महापालिकेत काम करतात, परंतु शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात काविळची साथ पसरली असतानाही ते एकदाही पाहणीसाठी फिरकले नाहीत. कुटुंबप्रमुख म्हणून ते सक्षम अधिकारी नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव करावा, अशी मागणी गिरवले यांनी केली.
राजुरकरांना हाकला..
नगरसेवक विजय गव्हाळे, श्रीपाद छिंदम, अजिंक्य बोरकर आदींनी आरोग्याधिकारी डॉ. राजूरकर यांना टार्गेट केले. बोरकर यांनी, तर थेट राजूरकर यांच्या हकालपट्टीची मागणी केली. राजूरकर हे बेजबाबदार अधिकारी असून ते नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. त्यांना समस्या सांगण्यासाठी फोनवर संपर्क केला, तर ते कधीच उपलब्ध नसतात. त्यांचा फोन पत्नी उचलते. महापालिकेने फोन त्यांना दिला आहे की, त्यांच्या पत्नीला, असा सवाल छिंदम यांनी केला. राजूरकर यांना व्हीआरएस देऊन त्यांच्याजागी नवीन आरोग्याधिका-'यांची नेमणूक करण्याची मागणी बोरकर यांनी केली.
नगरसेवक अनिल शिंदे म्हणाले, आगरकर मळा परिसरात गेल्या आठ महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. त्याबाबत डॉ. राजूरकर व निकम यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी करूनही त्यांनी दखल घेतली नाही. अजूनही प्रभागात दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे आम्हाला नागरिकांच्या रोषाला तोंड द्यावे लागत आहे.

पाणीपुरवठा व आरोग्य विभाग यांच्यात समन्वय नाही, तसेच प्रशिक्षित कर्मचारी नसल्यामुळेच काविळची साथ पसरली असल्याचे अभय आगरकर यांनी सांगितले. काविळने मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना व लागण झालेल्या रुग्णांना नुकसान भरपाईपोटी आर्थिक मदत देण्याची मागणी सचिन जाधव यांनी केली.

आम्हाला लाज वाटते...
गणेश भोसले म्हणाले, शहरातील कच-याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जागोजागी पडलेले कच-याचे ढिग पाहून आम्हाला लाज वाटते. काविळनंतर आता डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे लोक अधिका-यांना बसू देणार नाहीत, असे ते म्हणाले. पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळा व कर्मचारीच अस्तित्वात नसल्याचे दीप चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले. शहरातील चारही प्रभाग एकत्र करून कर्मचाऱ्यांकडून एकत्रितपणे काम करून घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
बुरूडगावला मिळणार पाणी
मनपा हद्दीतून वगळलेल्या बुरूडगावला पाणी देण्याचा विषय या सभेत ठेवण्यात आला होता. नगरसेवक गणेश भोसले, अनिल शिंदे, कैलास गिरवले, सचिन जाधव आदींनी बुरूडगावला मनपातर्फे पाणी देण्याची मागणी केली. बुरूडगाव ग्रामस्थांना कचरा डेपोमुळे मोठा त्रास होतो. तेथील विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे मनपाकडून बुरूडगावला पाणी मिळालेच पाहिजे, अशी भूमिका भोसले व गिरवले यांनी घेतली. ग्रामस्थांकडे असलेली थकीत पाणीपट्टी मनपाने माफ करून यापुढेही मोफत पाणी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
अखेर लवादाचा आदेश मान्य
राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार बुरूडगाव येथील कचरा डेपोत खतनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे साडेचार कोटी रुपये जमा करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. तेराव्या वित्त आयोगातून नगरोत्थानकडे वर्ग केलेला २१ कोटी रुपयांचा निधी पुन्हा महापालिकेकडे वर्ग करून त्यातून ही रक्कम देण्यात येणार आहे. भरलेली ही रक्कम पुन्हा उभी करून ती पुन्हा नगरोत्थाकडे वर्ग करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे महापालिका प्रशासनासह सभागृहालाही लवादाचा आदेश मान्य करावा लागल्याचे स्पष्ट झाले.
अडीच तासांची चर्चा व्यर्थच!
काविळच्या साथीवर सर्वच नगरसेवकांनी प्रशासनावर अडीच तास तोंडसुख घेतले. मात्र, ही चर्चा शेवटी निष्फळ ठरली. काविळची साथ पसरण्यास कोण जबाबदार आहे, शिवाय कोणत्या ठोस उपाययोजना सुरू आहेत, साथ किती दिवसांत आटोक्यात येईल, हे प्रश्न अनुत्तरीतच राहिले. सुरुवातीला तावातावात बोलणारे अनेक नगरसेवक नंतर भरसभेत एकमेकांची चेष्टामस्करी करण्यात रमले. काही नगरसेवक तर सभा सोडून निघूनही गेले. दूषित पाणीपुरवठा व कावीळीची साथ रोखण्याबाबत जणूकाही कुणालाच देणे घेणे नसल्याचे दिसून आले.
आम्ही दुसरीकडे जाण्यास तयार
नगरसेवक कैलास गिरवले यांनी भर सभेत आयुक्त विजय कुलकर्णी यांना धारेवर धरत टक्केवारी घेतल्याचा आरोप केला. त्यामुळे संतापलेल्या आयुक्त कुलकर्णी यांनी गिरवले यांना सुनावले. मनपाची आर्थिक स्थिती नसताना अडचणीतून मार्ग काढत आम्ही काम केले. केडगाव पाणी योजना व नगरोत्थानची कामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे आमच्यावर निरर्थक आरोप करू नयेत. आमच्या विरोधात अविश्वासाचा ठराव घेण्याची देखील गरज नाही. तुम्हाला वाटत असेल, तर दुसरा आयुक्त आणा. आम्ही दुसरीकडे जाण्यास तयार असल्याचे आयुक्त म्हणाले.

तीन महिने काळजीचे...
आगरकर मळा परिसरात १२ ऑगस्टला काविळचे दोन रुग्ण आढळून आल्यानंतर तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या. महावीर कलादालनाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाची जुनी ड्रेनेजलाइन फुटल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दुरुस्तीचे काम प्रगतिपथावर आहे. काविळचा आजार ४५ दिवस राहतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी व्यापक स्वरूपाची मोहीम हाती घेतली आहे. साथ आटोक्यात आणण्यासाठी आणखी तीन महिने काळजी घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीने उपाययोजना सुरू असल्याचे आयुक्त कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.