नगर - ‘माझ्या पोराला, सुनेला क्रूरपणे ठार केले. नातवाचे तुकडे केले. १५ दिवस झाले, तरी पोलिसांना आरोपी सापडत नाहीत. आता आम्हालाच गोळ्या घालून ठार करा, म्हणजे पोलिसांची अन् आरोपींसह सर्वांचीच सुटका होईल....’ असा टाहो जवखेडे हत्याकांडात बळी पडलेल्या संजय जाधव यांच्या वृद्ध पित्याने फोडला... त्यांचे अश्रू अजूनही थांबत नाहीत. संजय यांच्या आई साखरबाई तर शून्यात नजर लावून असतात. एकीकडे जाधव कुटुंबाची ही स्थिती, तर आरोपी सापडत नसल्याने गावात तणावपूर्ण शांतता आहे. चार-दोन लोक एकत्र आल्यानंतर पहिला विषय असतो, तो या अमानुष हत्याकांडाचाच. जवखेडे खालसा गावाला मंगळवारी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने भेट दिली, तेव्हा हे भीषण वास्तव अनुभवास आले.
गावाबाहेर जाधव वस्ती आहे. तेथे सरकारी तीन घरकुलांत त्यांचे आई- वडील, मोठा भाऊ दिलीप व त्याचे कुटुंब राहते.
मृत संजय यांचे घरकुल नवीन आहे. आता तेथे संजय, त्यांची पत्नी व मुलगा यांचे फोटो लावलेले आहेत. समोरच पोलिसांचे दोन तंबू आहेत. येणा-या प्रत्येकावर पोलिसांची बारीक नजर असते. एक तंबू अगदी घरासमोर, जेमतेम सात-आठ फुटांवर. कोण काय बोलते, याकडे पोलिसांचे कान असतात. मात्र, जाधव कुटुंबीय त्याची तमा बाळगत नाहीत. त्यांनी संशयितांची सर्व नावे पोलिसांना सांगितली आहेत, परंतु सबळ पुरावा नसल्याने पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. विशेष म्हणजे, पोलिसी जाचाचा जाधव कुटुंबालाच त्रास होत आहे.
आमच्या पोराचे तुकडे करणा-यांना फाशीवर लटकलेलं पाहायचंय...
मंगळवारी सकाळी ‘दिव्य मराठी’चा प्रतिनिधी गावात पोहोचला असता, जगन्नाथ यांचा थोरल्या मुलाचा मुलगा नुकताच पाेलिसांकडे जाऊन आला होता. तपासात काय प्रगती झाली, याची माहिती पोलिसांनी एकदाही सांगितली नसल्याची जाधव कुटुंबाची तक्रार आहे. तेथे आलेल्या ‘व्हीआयपीं’शी पोलिस अधिका-यांची बंद दाराआड तास- दीड तास चर्चा होते. त्यानंतर संबंधित पाहुणा पोलिसांचा तपास योग्य दिशेने चालू असल्याचे सांगतो. तपास योग्य दिशेने चालू आहे, तर पोलिस माहिती का देत नाहीत? आमच्या पोराचे तुकडे करणा-यांना फाशीच्या दोरावर लटकलेले पाहायचे आहे, पण पोलिस आम्हाला ते समाधान मिळू देतील का?’ असा जाधव कुटुंबाचा प्रश्न आहे. गावात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. अनैतिक संबंधांपासून चंदन तस्करीपर्यंतचे संदर्भ हत्याकांडामागे जोडले जात आहेत. आता तर नक्षलवादीही आगीत तेल ओतत असल्याचीही माहिती चर्चेत आहे.
विजेकडेही झाले दुर्लक्ष
जवखेडे गावात सध्या याच गोष्टीची चर्चा असते. शेतीत किंवा घरच्या कामांत कोणाचेही लक्ष लागत नाही. सध्या गावात विजेचा प्रश्न गंभीर झाला आहे. मात्र, ग्रामस्थांचे या प्रश्नाकडेही दुर्लक्ष झाले आहे. एकदाचा तपास पूर्ण करा व आरोपींना गजाआड करा. म्हणजे सर्व गावाचे लक्ष कामात लागेल, असे ज्येष्ठ नेते उद्धवराव वाघ म्हणतात.
कोणाशीही शत्रुत्व नव्हते
‘आमचे कोणाशीही शत्रुत्व नव्हते. मृत संजय शेती व गवंडी काम करत होते. आताही त्यांनी शेतात लावलेली ज्वारी उभी आहे. बाजरी कापण्यासाठीच ते कुटुंबासह शेतात जाऊन राहिले होते. मात्र, मारेक-यांनी पद्धतशीरपणे कट करून आमच्या मुलाला संपवले,’ असे जाधव कुटुंबीय सांगतात. हत्याकांडाआधी जाधव वस्तीवरील तीन कुत्री विष देऊन मारण्यात आली. ही कुत्री संजयबरोबर असत. हत्याकांड बाहेरच्यांनी केले. मात्र, त्यांना स्थानिकांनी माहिती दिली असल्याचा संशय आहे. कारण बंद पडलेल्या कूपनलिकेबाबत बाहेरील लोकांना माहिती असणे शक्यच नसल्याचे जाधव कुटुंबाचे म्हणणे आहे. ‘पोलिसांचा आम्हालाच त्रास हाेताेय. आरोपींना ओळखायचे आहे, म्हणून पोलिसांनी नगरला नेले. तेथे आरोपी वगैरे कोणीच नव्हते. फक्त गावाबाहेर नेऊन जबाब घेतले. त्या जबाबाच्या प्रतीही अद्याप मिळाल्या नाहीत,’ असे दिलीप जाधव यांनी सांगितले.
तंटामुक्त गावाला कलंक
सुमारे पावणेचार हजार लोकवस्तीचे हे जवखेडे खालसा गाव. गावाजवळून पाट गेल्याने शेतीही हिरवीगार. अठरापगड जमातीच्या या गावात सर्वांचाच मुख्य व्यवसाय शेती आहे. जो-तो किमान आठ महिने तरी शेतीच्या कामात गुंतलेला असतो. या गावात ३५ टक्के मराठा, ३५ टक्के मुस्लिम व इतर ३० टक्क्यांत धनगर, वंजारी, दलित व इतर समाज आहे. गावाला २०१०-११ या वर्षात तंटामुक्तीचा पुरस्कारही मिळाला आहे. असा लौ
किक असलेल्या या गावात इतके निर्घृण हत्याकांड घडल्यामुळे गावाला कलंक लागल्याची भावना गावकरी व्यक्त करतात.
शांतता... पण तणावपूर्ण
सध्या गावात शांतता दिसते, तरीही तणाव जाणवतो. कारण तपासाच्या नावाखाली अनेक निरपराध तरुण व ग्रामस्थांना पोलिसी जाचाचा त्रास सहन करावा लागत आहे. पोलिस कधीही व कोणालाही रात्री-बेरात्री उचलून नेत. नंतर ग्रामस्थांनी ग्रामसभा घेतली. त्या वेळी सर्व गाव झाडून उपस्थित होते. त्यात पोलिसांना निर्वाणीचा इशारा देण्यात आला. त्यानंतर मात्र पोलिस आता तपासासाठी दिवसा बोलावत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
पोलिसांचा वचकच नसल्याने हत्याकांड : ढोबळे
जिल्ह्यात पोलिसांचा वचक न उरल्यानेच जवखेडेसारखी दलितांची क्रूर हत्याकांडे घडत आहेत. पोलिसांची कार्यपद्धती गुंड व अपप्रवृत्तींना मोकळीक देणारी आहेत, असा आरोप माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी बुधवारी नगरमध्ये ‘दिव्य मराठी’शी बोलताना केला.
जवखेडे येथील तिहेरी हत्याकांडाला १५ दिवस उलटून गेले आहेत, तरीही पोलिसांना अद्याप आरोपी सापडलेले नाहीत. कदाचित त्यांना नावे कळली असतील, पण ती त्यांनी जाहीर केलेली नाहीत. पोलिसांनी योग्य दिशेने तपास करावा, यासाठी दलित संघटनांनी संयम पाळून सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू ठेवले आहे, तरीही काहीही फायदा होत नाही. त्यामुळे दलित संघटनांचा संयम तुटण्याची भीती ढोबळे यांनी व्यक्त केली.
नगर जिल्ह्यातच सोनई, खर्डा, जवखेडे यांसारखी हत्याकांड का घडतात, याचा विचार करण्याची गरज आहे. जवखेडेतील आरोपींचा माग लागत नाही. या वरून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हे उभी राहतात, असेही ढोबळे म्हणाले.