आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवखेडे तिहेरी हत्याकांड: तत्कालीन फौजदार, सहायक निरीक्षकाची साक्ष उलटतपासणी पूर्ण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जवखेडे तिहेरी हत्याकांड खटल्यात शवविच्छेदन पंचनामा करणाऱ्या तत्कालीन फौजदाराची बुधवारी उलटतपासणीत चांगलीच तारांबळ उडाली. ३४ वर्षे सेवेचा अनुभव असूनही उलटतपासणीत बहुतांश प्रश्नांची उत्तरे देताना ते अडखळत होते. त्यांनी सरतपासणीत सांगितलेल्या काही बाबींचा पंचनाम्यात उल्लेख नसल्याचेही समोर आले. तब्बल दोन तास त्यांची उलटतपासणी चालली. त्यानंतर फिर्याद नोंदवणाऱ्या तत्कालीन सहायक निरीक्षकाची साक्ष उलटतपासणी पूर्ण झाली.
 
प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांच्यासमोर सोमवारपासून जवखेडे तिहेरी हत्याकांड खटल्याची सुनावणी सुरू आहे. विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी मंगळवारी तत्कालीन फौजदार कृष्णा जोपळे यांची अवघ्या १५ मिनिटांत सरतपासणी घेतली. मात्र, स्टेशन डायऱ्यांअभावी मंगळवारी त्यांची उलटतपासणी तहकूब करण्यात आली होती. बुधवारी आरोपींच्या वतीने अॅड. सुनील मगरे यांनी त्यांची तब्बल दोन तास उलटतपासणी घेतली.
 
आपण पोलिसांच्या वाहनातून २१ ऑक्टोबर २०१४ रोजी घटनास्थळी गेलो, असे जोपळे उलटतपासणीत म्हणाले. घटनास्थळ प्रतिबंधित करुनही तेथे गर्दी जमल्याचे त्यांनी मान्य केले. संजय जाधवच्या डाव्या बरगडीची जखम, हातातील कडे, मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यानंतर ब्लँकेटवर ठेवल्याचे, तिन्ही मृतदेहांना विहिरीतील गाळ, गवत चिकटलेले होते या बाबी पंचनाम्यात नमूद नसल्याचे फौजदार जोपळे यांनी मान्य केले.
 
शवविच्छेदनासाठी मृतदेह घाटी रुग्णालयाकडे सोपवताना जप्ती पंचनामा केला नव्हता. कारण मृतांच्या अंगावर त्यावेळी काहीच नव्हते, असे फौजदार जोपळे म्हणाले. शवविच्छेदन झाल्यावर प्रशांत जाधवकडे मृतदेह सोपवून ताबा पावती घेतली. त्यातही इतर चीजवस्तूंचा उल्लेख नसल्याचे जोपळे यांच्या उलटतपासणीत समोर अाले. उलटतपासणी घेण्यासाठी अॅड. मगर यांना अॅड. छगन गवई, हर्षवर्धन प्रधान यांनी सहकार्य केले.
 
पोलिसांना सूचना 
खटल्याच्या कामकाजासाठी स्टेशन डायऱ्या उपलब्ध करुन द्याव्यात, असे न्यायालयाने मंगळवारच्या कामकाजात नमूद केले होते. त्यानुसार बुधवारी या डायऱ्या उपलब्ध झाल्या. मात्र, त्याबाबतच्या अहवालावर पोलिस कॉन्स्टेबलची सही होती. त्यावर नावानिशी नमूद करुनही कॉन्स्टेबल कसे काय डायऱ्यांच्या अहवालावर सही करतात, अशी विचारणा न्यायालयाने केली. तसेच यापुढे किमान फौजदारपदाच्या अधिकाऱ्याच्या सहीनेच डायऱ्या पाठवण्याची सूचना केली. 

घटनास्थळीच फिर्याद 
आरोपी प्रशांत जाधव याने घटनास्थळीच पोलिसांना मूळ फिर्याद दिली होती. ती फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल दारकुंडे यांच्यामार्फत पोलिस ठाण्यात पाठवण्यात आली. तेथे असलेले तत्कालीन सहायक निरीक्षक सचिन जाधव यांनी ती पुन्हा प्रिंट केली. तिची एक प्रत दारकुंडेंमार्फत पुन्हा मूळ फिर्यादीला देण्यासाठी रवाना केली. तशा नोंदी स्टेशन डायरीला घेतल्या, ही बाब एपीआय जाधव यांच्या सरतपासणीत समाेर आली. दुपारच्या सत्रात एपीआय जाधव यांची सरतपासणी झाली. 

अज्ञाताविरुद्ध तक्रार 
मूळफिर्यादीत प्रशांत जाधवने म्हटले होते की, त्याचे चुलते संजय जाधव, चुलती जयश्री जाधव, चुलतभाऊ सुनील यांचा अज्ञात व्यक्तीने, अज्ञात कारणासाठी, तीक्ष्ण हत्याराने खून केला. नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचे म़ृतदेह दौलत जाधवच्या शेतातील विहिरीत टाकून दिले. या मूळ फिर्यादीवरुन सहायक निरीक्षक सचिन जाधव यांनी खुनाचे, पुरावा नष्ट करण्याचे कलम लावल्याचे सांगितले. सहायक निरीक्षक जाधव यांची सरतपासणी उलटतपासणीही बुधवारी दुपारच्या सत्रामध्येच पूर्ण झाली. 

वेळ वाया घालू नका 
फौजदारजोपळे यांची उलटतपासणी घेताना अॅड. मगरे यांनी पंचनामा करण्यास किती वेळ लागला, असा प्रश्न वारंवार विचारला. त्यावर विशेष सरकारी वकिलांनी आक्षेप घेतला. एकच प्रश्न वारंवार विचारुन आरोपींचे वकील न्यायालयाचा वेळ वाया घालवत आहेत, असे अॅड. यादव म्हणाले. न्यायालयाने ही बाब खटल्याच्या कामकाजात नोंदवून अॅड. मगरे यांना प्रश्नांची पुनरावृत्ती करण्याची, तसेच न्यायालयाचा वेळ वाया घालवण्याची सूचना केली. 

साक्षीदार न्यायालयात 
बुधवारीसाक्ष नसूनही एक साक्षीदार व्यक्ती न्यायालयात उपस्थित होती. ही बाब आरोपीचे वकील सुनील मगरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. संबंधित व्यक्तीकडे चौकशी करुन ते साक्षीदार असल्याची शहानिशा करण्यात आली. साक्षीदारांच्या यादीत त्यांचे नाव असल्याने त्यांना बाहेर जायला सांगण्यात आले. तसेच यापुढे सरकारी पक्षाने योग्य खबरदारी घ्यावी, अशी सूचना न्यायालयाने सरकारी पक्षाला केली. 

असे विचारु नका 
जयश्रीयांच्या दागिन्यांचा उल्लेख जप्ती पंचनाम्यात नव्हता. त्यामुळे अॅड. मगरे यांनी हे दागिने स्वत:कडे ठेवण्यासाठी तुम्ही मुद्दाम पंचनाम्यात नोंदवले नाहीत, असा प्रश्न फौजदार जोपळेंना विचारला. त्यावर विशेष सरकारी वकील यादव यांनी तीव्र आक्षेप घेतला. हा पोलिस अधिकाऱ्यांवर संशय घेण्याचा प्रकार अाहे, असे ते म्हणाले. ही बाब कामकाजात नोंदवून घेत पुन्हा असे प्रश्न विचारु नका, असे न्यायालयाने अॅड. मगरे यांना सुनावले. 
 
बातम्या आणखी आहेत...