आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारेकरी कुणीही असोत, आम्हाला न्याय हवाय,जयश्रीच्या माहेरच्या नातेवाईकांचा आर्त टाहो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- आमच्या मुलीचे, जावयाचे व नातवाचे मारेकरी कोणीही असोत. त्यांचेही हाल-हाल करुन त्यांना कठोर शिक्षा द्यायला हवी. साहेब त्यांना फाशीच द्या, जवखेडे गावात आमचे कुणीच राहिले नाही. आता तिकडे येणे- जाणे नाही. पण, काहीही झाले तरी आम्हाला न्याय हवाय. एवढीच आमच्या आत्म्याची आर्त विनवणी आहे'', अशी हृदय पिळवटून टाकणारी मागणी पोखर्डी येथील अंजनाबाई व मोहन गायकवाड या दाम्पत्याने केली आहे. पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील तिहेरी हत्याकांडात बळी पडलेल्या जयश्रीचे पोखर्डी (ता. नगर) हे माहेर. अंजनाबाई व मोहन गायकवाड हे तिचे आई-वडील. जयश्री घरात सर्वात मोठी होती. तिच्या पाठोपाठ भाऊ संतोष व लहान बहिण मिरा आहे. संतोष विवाहित असून त्याला एक मुलगा आहे. तर मिराचे सासर राहुरीचे असून काही महिन्यांपूर्वीच तिच्या पतीचे हृदयविकाराने निधन झालेले आहे. तेव्हापासून मिरा व तिची दोन मुलेही माहेरी पोखर्डीत रहायला आलेली आहेत.
जवखेडे हत्याकांडात बळी पडलेल्या जयश्रीची एक नणंद पोखर्डीत दिलेली आहे. त्या माध्यमातूनच जयश्रीसाठी संजय जाधवचे स्थळ आले होते. लग्नानंतर जयश्रीचे सणवार व लग्नाकार्याच्या निमित्त माहेरी येणे जाणे होते. जयश्री सासरी सुखात नांदत असल्यामुळे तिने माहेरी कधीही कसलीच तक्रार केली नव्हती. अधून-मधून जयश्री तिचे पती संजयच्या फोनवरून माहेरी संपर्क साधत असे. त्याद्वारेच तिची ख्यालीखुशाली कळायची. दिवाळीच्या दोन दिवस अगोदर जयश्रीचा फोनवरून आई-वडिलांशी अखेरचा संपर्क झाला होता.
21 ऑक्टोबरला दुपारी जयश्रीला साप चावल्याची बातमी संतोषला तिच्या सासरच्या लोकांकडून कळाली. म्हणून त्याने तत्काळ नगरच्या जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. पण, तेथे त्याला कोणी सापडले नाही. शंका आल्यामुळे तो जवखेडेला गेला. तेथे गेल्यावर त्याला तिहेरी हत्याकांड झाल्याचे समजले. नंतर जयश्रीचे आई-वडीलही तेथे गेले. मुलीचा, जावयाचा व नातवाचा खून झाल्याचे पाहून अंजनाबाई यांना तेथेच चक्कर आली. तद्नंतर त्यांच्या बहिणीच्या गावी तीन दिवस त्या उपचार घेत होत्या. अजूनही जयश्री व तिच्या घरच्यांच्या आठवणीने तिच्या माहेरचे आर्त टाहो फोडत आहेत.
कोणावरही संशय नाही
आमची जयश्री साधीभोळी होती. काही वर्षांपूर्वी तिचा एक मुलगा आजाराने दगावला. त्यामुळे सुनीलवरच त्यांची सगळी भिस्त होती. त्याचे डेअरी सायन्सचे शिक्षण होऊन तो मोठ्ठा साहेब व्हावा, एवढीच जयश्रीची इच्छा होती. एकुलत्या एका मुलावर तिचा खूप जीव होता. जावई कष्टाळू आिण नातू हुशार होता. अशा लोकांची कुणासोबत दुश्मनी असूच शकत नाही. त्यामुळे संशय, तरी कोणावर घ्यावा, असा सवाल गायकवाड कुटुंबीय करतात. आमच्या मुलीच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, एवढीच त्यांची मागणी आहे.
त्यांच्या सांत्वनाला अजूनही कोणीच आलेले नाही
जयश्रीच्या माहेरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. तिचा भाऊ संतोष वाहनचालक आहे, तर वडील मोहन गायकवाड खाणीत कामाला जातात. आई व वहिनी घरकाम व रोजंदारी करतात. जयश्रीच्या हत्याकांडाच्या वार्तेनंतर गुरुवारी दुपारपर्यंत एकही संघटना अथवा आप्तेष्ट त्यांना भेटायला गेलेले नाहीत. चौकशीसाठी आलेल्या पोलिसांशिवाय सांत्वन करायलाही कुणीच आले नसल्याचे त्यांनी सांगितले."जवखेडे गावात मुलगी दिली म्हणून तिकडे जाणे-येणे होते. आता त्या गावात आम्ही कशाला जायचे', असा आर्त सवाल तिच्या माहेरचे नातेवाईक करत आहेत.