पाथर्डी - जवखेडे तिहेरी हत्याकांडाचा तपास योग्य दिशेने चालू आहे. लवकरच आरोपी हाती लागतील. तपासकामात लाय डिटेक्टर व नार्को चाचणीचा अवलंब केला जाईल. राज्य सरकार व संपूर्ण प्रशासन मृतांच्या कुटुंबीयांमागे खंबीरपणे उभे असून त्यांच्या संरक्षणार्थ विशेष बंदोबस्त तैनात आहे, अशी माहिती रविवारी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. भाजपतर्फे पाच लाखांचा धनादेश त्यांच्या हस्ते वृद्ध दांपत्यास देण्यात आला.
मृतांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी रविवारी पंकजा मुंडे आल्या. राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार मोनिका राजळे, राम शिंदे व भीमराव धोंडे उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले आहेत. वरिष्ठ अधिका-यांच्या ते संपर्कात आहेत. ग्रामस्थांनी तपासात सहकार्य करावे. शासनाची सर्व ताकद तपासासाठी वापरू, असे मुंडे म्हणाल्या.
माझा मुलगा तर गेला, या पैशांचे करायचे काय?
राज्य शासनाच्या विशेष समाजकल्याण विभागामार्फत यापूर्वीच जाधव कुटुंबीयांना मदत देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षातर्फे मुंडे यांनी पाच लाख रुपयांचा धनादेश मृतांच्या आईच्या हाती देण्यात आला. तेव्हा ‘पैशांचे काय करायचे? माझा मुलगा गेला, आता आरोपीला पकडून फाशी द्या’,' अशी मागणी त्या माउलीने केली. ते ऐकून मुंडे यांचेही डोळे पाणावले.