आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपी प्रशांतनेच ओळखले विहिरीतून काढलेले मृतदेह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पोलिसांनी विहिरीतून बाहेर काढलेले मृतदेह आपल्या काका-काकूचे असल्याचे आरोपी प्रशांत जाधव यानेच ओळखले होते. विहिरीतून काढलेले शीरविरहित धड आपला चुलतभाऊ सुनील याचे असल्याचे प्रशांतने ओळखले, अशी महत्त्वपूर्ण साक्ष पंच आत्माराम घाटुळ यांनी दिली. बहुचर्चित जवखेडे तिहेरी हत्याकांडाच्या खटल्याची नियमित सुनावणी सोमवारपासून जिल्हा सत्र न्यायालयात सुरू झाली. घाटुळ यांची साक्ष उलटतपासणीही सोमवारी पूर्ण झाली. 
प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. जवखेडे खालसा येथील शेतावर असलेल्या विहिरीतून तीन मृतदेह पोलिसांनी बाहेर काढले होती.
त्यावेळी आत्माराम घाटुळ हे पंच म्हणून उपस्थित होते. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी त्यांची सरतपासणी घेतली. 

२० अॉक्टोबर २०१४ रोजी पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे जाधव कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळले होते. सुरुवातीला दलित हत्याकांड असल्याच्या चर्चेने हे प्रकरण गाजले. पोलिस तपासात मात्र फिर्यादीच आरोपी निघाला. त्यामुळे फिर्यादीसह तिघा जणांना पोलिसांनी आरोपी केले, तसेच त्यांना अटक करत न्यायालयात त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. 

२१ ऑक्टोबर २०१४ रोजी आपण पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे घटनास्थळी पोहोचलो. पोलिसांनी आपल्याला पंच म्हणून उपस्थित राहण्याची विनंती केली. आपल्यासमक्ष पोलिसांनी विहिरीतून तीन मृतदेह बाहेर काढले. सुरुवातीला संजय जगन्नाथ जाधव, त्यापाठोपाठ जयश्री संजय जाधव यांचा मृतदेह बाहेर काढला. नंतर शीर नसलेले एक धड बाहेर काढले, असे घाटुळ यांनी साक्षीत सांगितले. 

पोलिसांनी विहिरीबाहेर काढलेले आधीचे दोन मृतदेह आपल्या काका-काकूचे असल्याचे प्रशांत जाधवने सांगितले. शीर नसलेल्या धडाची ओळखही प्रशांतनेच करुन दिली, असे घाटुळ यांनी सांगितले. पंचनामा केल्याची वेळही घाटुळ यांनी अचूक सांगितली. मृत संजय जाधव याच्या शरीरावर असलेल्या जखमांचे कपड्यांचे वर्णनही त्यांनी अचूक केले. न्यायालयात हे कपडे दाखवण्यात आल्यानंतर घाटुळ यांनी ते ओळखले. 
 
आरोपी प्रशांत दिलीप जाधव, अशोक दिलीप जाधव दिलीप जगन्नाथ जाधव यांच्या वतीने अॅड. पी. एस. गवळी, एस. एस. प्रधान सुनील मगरे यांनी घाटुळ यांची उलटतपासणी घेतली. पंचनामा करताना तेथे उजेड होता का, घटनास्थळी किती पोलिस होते, असे प्रश्न त्यांनी विचारले. खटल्याशी संदर्भ नसल्याचा आरोप करत विशेष सरकारी वकिलांनी बहुतांश प्रश्नांवर आक्षेप नोंदवला. पंच घाटुळ यांची उलटतपासणीही पूर्ण झाली. 

१६० साक्षीदार 
जवखेडेतिहेरी हत्याकांड खटल्याच्या सुनावणीला तब्बल दोन वर्षांनंतर वेग आला. सलग चार दिवस या खटल्याचे कामकाज चालणार आहे. या खटल्यात सुरुवातीला दोनशेहून अधिक साक्षीदार होते. त्यापैकी १६० साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या जातील. मंगळवारपासून इतर पंचांच्या साक्षी नोंदवल्या जातील. यामध्ये पोलिस उपनिरीक्षक जोपळे, सहायक निरीक्षक सचिन जाधव, पंच कपील तळेकर यांचा समावेश अाहे. 

आरोपींतर्फे पुन्हा अर्ज 
तिन्ही आरोपींच्या वतीने अटक केल्यापासून वारंवार न्यायालयात अर्ज सादर केले जात आहेत. सोमवारीही आरोपींच्या वतीने दोन अर्ज सादर करण्यात आले. आरोपीच्या वकिलांना घटनास्थळी भेट द्यायची असून आरोपींनाही सोबत न्यायचे आहे. त्यासाठी त्यांनी न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. न्यायालयाने त्यावर सरकार पक्षाचे म्हणणे मागवले असून मंगळवारी या अर्जावर निर्णय होण्याची शक्यता आहे.