आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समन्यायी नव्हे, हे अन्यायी पाणीवाटप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - उच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेऊन गोदावरी खोरे विकास महामंडळाने मुजोरपणा केल्याचा सूर नगर जिल्ह्यातून उमटत आहे. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू आहे. केवळ नगर जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याचा आदेश देऊन महामंडळाने जिल्ह्यावर मोठा अन्याय केल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करणाऱ्या पाटबंधारे विभागावरही लाभक्षेत्राचा रोष आहे.
गोदावरी नदी खाेऱ्यात जायकवाडी धरणाच्या वरील भागात जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा, नाशिकमधील पालखेड, दारणा, गंगापूर तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील एका कॉंप्लेक्समध्ये १० टीएमसी क्षमता असलेले दहा धरणे आहेत. समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार या सर्व धरणांतील पाणी जायकवाडीत सोडण्याचे आदेश महामंडळाकडून अपेक्षित होते. मात्र, केवळ नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याचा आदेश देऊन महामंडळाने नगर जिल्ह्याला चांगलेच डिवचले आहे.
उच्च न्यायालयाने १२ डिसेंबरपर्यंत जायकवाडीला पाणी सोडण्यास स्थगिती दिली आहे. पिण्याचे पाणी वगळता इतर पाणी सोडण्यास ही स्थगिती आहे. महामंडळाकडून देण्यात आलेल्या आदेशात कोठेही पिण्यासाठी पाणी सोडत असल्याचा उल्लेख नाही. महामंडळाने न्यायालयाचा आदेशही धाब्यावर बसवला आहे. महामंडळ न्यायालयापेक्षा मोठे आहे का, असा संतप्त सवाल जिल्ह्यातील लाभक्षेत्रातून उपस्थित होत आहे. पाणी उपलब्ध असल्याच्या विश्वासाने शेतकऱ्यांनी पिकांचे नियोजन केले आहे. आता अचानकपणे पाणी सोडण्यात येत असल्याने हे नियोजन कोलमडणार असल्याने शेतकऱ्यांत या निर्णयाविरोधात तीव्र संताप आहे.
यापूर्वीही जलसंपत्ती प्राधिकरणाने अडीच महिन्यांपूर्वी वरील धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा आदेश दिला होता. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी नगर व नाशिक जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली नाही. नेमकी आत्ताच जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याची घाई करण्याचे कारण जिल्हावासियांच्या समोर आलेले नाही. त्यामुळेच अधिकाऱ्यांच्या विरोधात संताप वाढला आहे.
जायकवाडी धरणाला पाणी सोडावे लागल्याने नगर शहराला पाणीकपातीला तोंड द्यावे लागले होते. गेल्या तीन वर्षांपासून उन्हाळ्यात शहरातील पाणीकपात लागू करावी लागत आहे. धरण उशाला व कोरड घशाला, अशी परिस्थिती नगर शहराची होत आहे. पाण्याच्या प्रश्नावरून शहरात यापूर्वी राजकारणही रंगले.
निर्णयाचा खुलासा करा
*न्यायालयाने पिण्यासाठी आवश्यकता असेल तरच पाणी सोडण्याचे निर्देश दिले होते. असे असताना पाणी सोडण्याचा निर्णय कसा घेतला याचा खुलासा प्रथम करायला हवा. त्यानंतरच पाणी सोडायला हवे. जायकवाडीला पाणी सोडणे हा नगर व नाशिक जिल्ह्यावर अन्याय आहे. त्यामुळे पाणी सोडण्याबाबत घेतलेला निर्णय चुकीचा आहे.'' चंद्रशेखर करवंदे, जलअभ्यासक.
"समन्यायी' नियम
सन २००५ च्या जलसंपत्ती अधिनियमाला २०१२ मध्ये कायद्याचे स्वरुप मिळाले. १५ आॅक्टोबरला नदी खाेरे ग्रहीत धरून सर्व धरणांमध्ये समान पाणी ठेवण्याचे हे धाेरण आहे. मृतसाठा वगळता एकूण क्षमतेच्या ३३ टक्के उपयुक्त पाणीसाठा धरणात राखणे, या नियमानुसार अपेक्षित आहे. पावणेदोन महिन्यांपुर्वीच यासंदर्भात नियमानुसार कार्यवाही अपेक्षित होती. मात्र, विलंबाने होत असलेल्या या कार्यवाहीत फक्त नगर जिल्हा भरडला जात आहे.

निळवंडेत पाणी सोडले
भंडारदरा धरणातून रविवारी सकाळी निळवंडे धरणात तीन हजार क्युसेस वेगाने प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती सहाय्यक अभियंता किरण देशमुख यांनी दिली. निळवंडे व भंडारदरा धरणातून ४ हजार ३०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे आदेश महामंडळाने दिले आहेत. निळवंडे धरणाची पातळी पूर्ण झाल्यानंतर पाच हजार क्युसेस वेगाने पाणी जायकवाडीकडे पाणी झेपावणार आहे. त्यासाठी आणखी दोन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
आदेश कालबाह्य
* महामंडळाचा आदेश कालबाह्य आहे. त्याची ५० टक्के अंमलबजावणी शक्य आहे. सद्यस्थितीत वरच्या धरणांतून सोडलेल्या पाण्यातील ३० ते ४० टक्के पाणी जायकवाडी पर्यंत पोहचतच नाही. त्यामुळे या पाण्यामुळे जायकवाडीच्या शेतकऱ्यांचे भागत तर नाहीच, पण वरच्या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान होते. समन्वयातूनच पाणीवाटप शक्य आहे. महामंडळाचा निर्णय नगरकरांवर अन्याय करणारा आहे.'' जयप्रकाश संचेती, निवृत्त कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग.
जिल्ह्याचे चित्र
एकूण सिंचन क्षेत्र : (एकूण क्षेत्र १३ लाख ५९ हजार ९०० हेक्टर)
एकूण बागायती क्षेत्र : तीन लाख २५ हजार हे. (धरणे व विहिरी) एकूण क्षेत्राच्या २४ टक्के.
विहीर व इतर स्रोत मिळून : दोन लाख ६० हजार हेक्टर क्षेत्र.
तिन्ही धरणांखालील क्षेत्र : ६५ हजार हेक्टर
ठिबक सिंचनाखाली : ३० टक्के क्षेत्र (उर्वरित क्षेत्राला थेट चाऱ्यांमार्फत पाणी दिले जाते)प्रमुख पिके : ऊस, गहू, काही प्रमाणात फळबागा व भाजीपाला.