आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे रस्त्यावर मध्यरात्रीपर्यंत वाहतूक ठप्प

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगर-पुणेमहामार्गावरील केडगाव येथील रेल्वे उड्डाणपुलावर मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास झालेल्या दोन जीप ट्रकच्या विचित्र अपघातामुळे वाहतूक सुमारे तीन तास ठप्प झाली होती. वाहतूक पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने अपघात झालेली दोन वाहने हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. मात्र, त्यासाठी प्रवासी वाहनचालकांना मध्यरात्रीपर्यंत ताटकळत थांबावे लागले. विशेष म्हणजे या अपघाताबाबत कोणतीच नोंद नसल्याचे कोतवाली पोलिसांनी बुधवारी "दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.
स्टेशन रस्त्यावरील उड्डाणपुलाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे नगर-पुणे रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. नगर महाविद्यालय ते सक्कर चौकापर्यंतच्या रस्त्यावर दिवसभरात अनेकदा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. एखादा लहान- मोठा अपघात झाल्यास प्रवाशांना किमान दोन-तीन तास ताटकळत थांबावे लागते.
मागील काही दिवसांपासून केडगाव उड्डाणपुलावर वारंवार अपघात होत आहेत. काही अवजड वाहने पुलावरच बंद पडतात. परिणामी वाहतूक कोंडी होऊन तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास पुण्याकडे जाणारा ट्रक नगरकडे येणाऱ्या दोन जीपचा उड्डाणपुलावर विचित्र अपघात झाला. वाहतूक पोलिसांना अपघाताची माहिती मिळूनही ते वेळेत पोहोचल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. दोन्ही बाजूने सुमारे तीन िकलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. नंतर आलेल्या वाहतूक पोलिसांनी काही प्रवासी नागरिकांच्या मदतीने अपघात झालेल्या जीप हटवल्या. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली, तरी या गोंधळात नागरिक प्रवाशांना तब्बल तीन तास महामार्गावर ताटकळत थांबावे लागले. वाहतूक सुरळीत होईपर्यंत मध्यरात्र झाली होती. त्यामुळे अनेकांची मोठी गैरसोय झाली.
पर्यायी रस्त्याची आवश्यकता
नगर-पुणेरस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले असले, तरी रेल्वे उड्डाणपूर पूर्वी होता तसाच आहे. पूल अरूंद असल्याने तेथे वाहतुकीची कोंडी सातत्याने होते. नवा मोठा पूल बांधण्याबरोबरच केडगावपासून महामार्गाच्या दुतर्फा सर्व्हिस रोड तयार करणे आवश्यक आहे. सर्व्हिस रोड तयार केले, तर शहरातील नागरिकांना महामार्गावर वाहन नेण्याची गरज भासणार नाही. मंगळवारी रात्री अनेक वाहनचालक पर्यायी रस्त्याचा शोध घेत होते. काहींनी आगरकर मळ्यातील रेल्वेलाईनखालील रस्त्याने जाण्याचा पर्याय स्वीकारला. हा रस्ता चांगला केल्यास नगर-केडगाव मार्गावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकेल. शिवाय सध्या उपेक्षित असलेल्या भागात लोकवस्ती होऊन शहराच्या विस्ताराला चालना मिळेल. त्यादृष्टीने तातडीने पावले उचलण्याची मागणी अनेक नागरिकांनी मंगळवारच्या घटनेनंतर "दिव्य मराठी'शी बोलताना केली.
केडगावजवळील रेल्वे उड्डाणपुलावर मंगळवारी रात्री अपघात झाल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

नगर-पुणे रस्त्यावरील केडगाव उड्डाणपुलावर मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास अपघात झाल्याने सुमारे तीन तास वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले. ज्या ट्रकमुळे अपघात झाला तो ट्रक दुसऱ्या दिवशीही तेथून हलवण्यात आला नसल्याने बुधवारीही वाहतूक कोंडी होत होती.