आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर - तालुक्याबाहेर समायोजन झाल्यामुळे शिक्षण विभागाचा आदेश डावलून नियुक्तीच्या ठिकाणी हजर न होणार्या सात शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्या आदेशानुसार शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद यांनी नोटिसा बजावल्या आहेत.
सप्टेंबर 2012 मध्ये झालेल्या पटपडताळणीत नगर तालुक्यात 22 शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यांचे समायोजन ज्येष्ठतेनुसार तालुक्याबाहेर करण्यात आले. त्यातील 14 शिक्षक आदेशानुसार नियुक्तीच्या ठिकाणी हजर झाले. परंतु 7 शिक्षक आदेशाला केराची टोपली दाखवून पुन्हा नगर तालुक्यात पुनर्नियुक्ती मिळवण्याच्या प्रयत्नांत आहेत.
आदेशानुसार नियुक्तीच्या ठिकाणी हजर झालेल्या 14 महिला शिक्षकांनी त्या सात शिक्षकांना नगर तालुक्यात नियुक्ती दिल्यास आपल्यावर अन्याय होईल, अशी तक्रार शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे केली होती. जिल्हा परिषद सदस्य संभाजी दहातोंडे यांनीही हा विषय शिक्षण समितीच्या सभेत पत्राद्वारे मांडला होता. अखेर अग्रवाल यांच्या मान्यतेने गोविंद यांनी संबंधित सात शिक्षकांना नोटिसा बजावल्या आहेत.
शिक्षण विभागाने आदेश देऊनही संबंधित शिक्षक नियुक्तीच्या ठिकाणी हजर झाले नाहीत. या प्रकरणी सात दिवसांत खुलासा सादर करावा; अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे नोटिशीत म्हटले आहे. शिक्षकांच्या घरच्या पत्त्यावर नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.