आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच वर्षांच्या आत परिचरांच्या बदल्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा परिषदेतील परिचर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी पाच वर्षे सेवेची अट असतानाही पाच वर्षांच्या आतच काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात विचारणा केली असता बदली हा तुमचा हक्क नसल्याचे सांगून माघारी पाठवण्यात आले, असा आरोप जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेने केला असून तसे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांना दिले.

जिल्हा परिषदेत सातत्याने विविध पदांच्या बदल्यांवरून गोंधळाचे वातावरण निर्माण होत असते. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनीही पाच वर्षांच्या आत बदल्या केल्याप्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. तसे निवेदन जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे.

जुलै २०१४ मध्ये झालेल्या परिचर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत पाच वर्षे सेवेची अट घातली होती. परंतु, काही कर्मचाऱ्यांची पाच वर्षे सेवा पूर्ण झालेली नसतानाही त्याची बदली करण्यात आली. तसेच दोन कर्मचाऱ्यांची बदली जिल्हा परिषद सभागृहात झाली आहे, परंतु त्यांना अद्यापि बदलीचा आदेश दिला नाही. यासंदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. पण बदली हा तुमचा अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले. जुलैमधील बदल्यांसाठी पाच वर्षे सेवेची अट असताना सप्टेंबरमध्ये ती अट शिथिल झाली.

अकोले तालुक्यातून मुख्यालयात बदलून आलेल्या कर्मचाऱ्यांची दोन महिन्यांतच बदली करण्यात आली. याचा अर्थ संघटनेला समजला नाही. त्यामुळे बदली प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, असे संघटनेचे म्हणणे आहे.

आदर्श गुणवंत कर्मचारी म्हणून पुरस्कारप्राप्त कर्मचारी रजेवर असताना त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता बदली करण्यात आली. एखाद्या कर्मचाऱ्याची तक्रारी बदली केली असेल, तर शासनाच्या निर्णयानुसार संबंधित कर्मचाऱ्याची प्राधान्याने चौकशी होणे गरजेचे आहे, असेही संघटनेने निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे परिचरांच्या बदल्या कळीचा मुद्दा ठरला असून बदल्यांबाबत प्रशासनाने ठोस निर्णय न झाल्यास संघटना कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परिचर कर्मचाऱ्यांचा वूलन गणवेश दोन महिन्यांपासून जिल्हा परिषदेत आहे. परंतु अद्यापि त्यांचे वाटप करण्यात आलेले नाही.

वूलन गणवेशाची दहा वर्षांपासून प्रतीक्षा
परिचर कर्मचाऱ्यांना दर तीन वर्षांनी वूलन गणवेश दिला जातो. परंतु मागील दहा वर्षांपासून आम्हाला वूलनचे गणवेश दिलेले नाहीत. यासंदर्भात पाठपुरावा केल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी गणवेश उपलब्ध झाले. परंतु त्यांचे अद्यापि वाटप झालेले नाही. यासंदर्भात अधिकारी वाटप करू एवढेच आश्वासन देतात, असेही कर्मचाऱ्यांनी सांगितले.

...हे तर स्थानांतरण
^ जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांना आवश्यक स्टाफ मागण्याचा अधिकार आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार त्यांच्या कार्यालयात बदल्या व स्थानांतरणाने कर्मचारी देण्यात आले. मे व जून महिन्यात बदल्या झाल्या होत्या, पण हे केवळ स्थानांतरण आहे. त्यासाठी कोणीही चौकशीची मागणी केली तरी, त्यासाठी आवश्यक ते रेकॉर्ड उपलब्ध करून देण्याची प्रशासनाची तयारी आहे.” जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी.

..तर आंदोलन करू
^कर्मचाऱ्यांच्या बदल्या कार्यालयांतर्गत केल्याने त्यांची गैरसोय झाली नाही, हे आम्हाला मान्य आहे. पण या बदल्या करताना केवळ बांधकाम उत्तर व शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्याच का केल्या? इतर विभागांच्या का केल्या नाहीत? अन्यायकारक बदल्या रद्द केल्या नाही, तर आठवडाभराने आमचे एक शिष्टमंडळ पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. मागणीची दखल घेतली नाही तर आंदोलन करू” अशोक काळापहाड, अध्यक्ष, कर्मचारी संघटना.