नगर - गंजबाजारातील तरुण व्यापारी जितेंद्र भाटिया यांच्या हत्या प्रकरणाचा गुंता जवळपास सुटल्यात जमा आहे. पोलिस ठाण्यातील फिर्यादीनुसार व प्रथमदर्शनी हे प्रकरण खंडणीतून घडल्याचे सांगितले जात होते. पोलिसही सर्व शक्यता पडताळत गुन्ह्याचा अथक तपास करत होते. रविवारी मात्र पोलिस तपासाला कलाटणी मिळाली. भाटिया यांची हत्या खूपच ‘नाजूक’ प्रकरणातून झाली असल्याचा संशय आता बळावला आहे. या संशयाला दुजोरा देत सोमवारी सकाळपर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी दिली.
दरम्यान, रविवारी सकाळी सिद्धार्थनगर परिसरातून पोलिसांनी आणखी एका युवकाला ताब्यात घेतले. त्याने प्रदीप कोकाटेला पिस्तूल पुरवले असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याच्याकडून आणखी एक पिस्तूल पोलिसांनी जप्त केले आहे. पोलिसांनी दुपारी जितेंद्र भाटिया यांच्या पत्नीलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. नंतर उल्हासनगर येथे राहणा-या तिच्या भावालाही अधिक चौकशीकरिता पोलिसांनी बोलावून घेतले. एका खास पथकाने त्याला उल्हासनगरहून नगरला आणले. कोकाटेसह ताब्यात घेतलेल्या चौघांचीही एमआयडीसी पोलिस ठाण्यात कसून चौकशी सुरू होती.
27 एप्रिलला रात्री सव्वानऊच्या सुमारास भाटिया यांची गंजबाजारातील त्यांच्या दुकानात गोळ्या झाडून हत्त्या करण्यात आली. हत्या होण्याच्या काही वेळापूर्वी तसेच काही दिवसांपासून जितेंद्र यांचे बंधू शंकर यांच्या मोबाइलवर 30 लाखांच्या खंडणीसाठी धमकीचे फोन आले होते. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी खंडणीसाठी ही हत्या झाल्याचा गुन्हा दाखल केला. तपासही त्याच दिशेने सुरू झाला. नंतर आयपीएलमधील सट्टेबाजी, आर्थिक व सोनेखरेदीचा व्यवहार अशा विविध कारणांमुळे भाटियांचा खून झाला असावा अशा चर्चांचे पेव फुटले.
पोलिसांनी सर्व शक्यता पडताळून पाहत तपास सुरू केला; परंतु भाटियांवर गोळ्या झाडणारा मारेकरी सापडत नाही, तोपर्यंत खुनाचे निश्चित कारण समजू शकत नव्हते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिस मारेक-याच्या मागावर होते. 1 मे रोजी गोळीबार करणा-या प्रदीप कोकाटेला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याला 7 मेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. त्यामुळे हत्येची उकल होईल, अशी शक्यता बळावली. प्रदीप कोकाटे याने आपण केवळ ‘शार्पशूटर’ची भूमिका बजावल्याचे सुरुवातीला पोलिसांना सांगितले. त्यामुळे त्याला हत्त्येची सुपारी कोणी दिली, सुपारी देणा-यांना भाटियांना का मारायचे होते या दिशेने तपासाला वेग आला. कोतवाली पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखा व इतर विशेष पथकेही समांतर पद्धतीने या गुन्ह्याची उकल करत आहेत.
हत्येचे कारण ‘नाजूक’?
प्रदीप कोकाटे चकवा देणारी माहिती देत होता. आपले लग्न झाले असून काही दिवसांपूर्वी पत्नीचा हृदयविकाराने मृत्यू झाला, अशी माहिती त्याने दिली होती. परंतु नंतर तो अविवाहित असल्याचे समोर आले. हत्त्या करण्यासाठी सुपारी देण्यात आल्याचे प्रदीपने सांगितले होते. पण ही माहितीही दिशाभूल करणारी होती. रविवारी पोलिसांनी मृत जितेंद्र भाटिया यांच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
आज होणार गुन्ह्याची उकल
भाटियांची हत्या खंडणीसाठी झालेली नाही, हे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण साळुंके यांनी आधीच जाहीर केले होते. नंतर विविध शक्यताही आम्ही पडताळून पाहिल्या. आतापर्यंत 7 हून अधिक जणांची चौकशी आम्ही केली. गुन्ह्याचे निश्चित कारण आताच सांगता येणार नसले तरी सोमवारी सकाळपर्यंत आम्ही या गुन्ह्याची उकल केलेली असेल.’’
वाय. डी. पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी, नगर