आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जितू भाटिया खूनप्रकरण: हेमा भाटिया हिचा जामीन अर्ज फेटाळला, लवकरच दोषारोपपत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - गंजबाजारातील व्यापारी जितू मोहन भाटिया खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार दिव्या ऊर्फ हेमा जितेंद्र भाटिया (वय 32) हिचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एन. चौरे यांनी शुक्रवारी हा निकाल दिला. 27 मे रोजी रात्री प्रदीप ऊर्फ शप्पू जनार्दन कोकाटे याने जितेंद्रचा गोळ्या घालून खून केला होता.

तपासात भाटिया यांची पत्नी हेमाचे प्रदीपशी अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. या संबंधांची कुणकुण जितेंद्र यांना लागल्यामुळे त्यांचा काटा काढण्यासाठी तिनेच खुनाची सुपारी दिल्याचेही निष्पन्न झाले. तेव्हापासून हेमा कोठडीत आहे. काही दिवसांपूर्वी तिने जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर जिल्हा सत्र न्यायाधीश चौरे यांच्यासमोर सुनावणी झाली.

या अर्जावर सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. पुष्पा कापसे-गायके यांनी बाजू मांडली. हेमा ही खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार व मुख्य आरोपी आहे. तिने केलेला गुन्हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा आहे. त्यामुळे तिला जामीन देण्यास सरकार पक्षातर्फे तीव्र आक्षेप घेण्यात आला. न्यायालयाने हेमाचा जामीन अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांच्या वतीने लवकरच दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे, अशी माहिती तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांनी दिली.