आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य - हजाराहून अधिक नागरिकांना कावीळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहरात काविळीची साथ सुरू होऊन एक महिना उलटला, परंतु अजूनही ही साथ आटोक्यात आलेली नाही. दोघांच्या मृत्यूनंतर जाग आलेल्या महापालिका प्रशासनाकडून उपाययोजना सुरू असल्या, तरी रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. मनपाच्या आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या सर्व्हेक्षणात आतापर्यंत एक हजारपेक्षा अधिक नागरिकांना काविळीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्य विभागाने ३५ हजारांपेक्षा अिधक घरांचे सर्व्हेक्षण केले आहे.

दूषित पाण्यामुळे आगरकर मळा व इतर भागात मोठ्या प्रमाणात काविळीची साथ पसरली. त्यात दोघांचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत प्रशासनाचे वाभाडे काढले. त्यानंतर आयुक्त विजय कुलकर्णी यांनी कावीळ रोखण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार आरोग्य, पाणीपुरवठा व बांधकाम या तिन्ही विभागांमार्फत संयुक्त मोहीम राबवण्यात येत आहे. घरोघरी जाऊन काविळीच्या रुग्णांची माहिती घेणे, नागरिकांचे प्रबोधन करणे, औषध फवारणी यासारख्या उपाययोजना गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहेत. दररोजचा पाहणीचा अहवाल, तसेच करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती आयुक्त कुलकर्णी व महापौर संग्राम जगताप यांना संबंधित अधिकाऱ्यांना दररोज सादर करावा लागतो.

असे असले तरी काविळीच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आगरकर मळा परिसरात, तर प्रत्येक घरात काविळीचे तीन-चार रुग्ण आहेत. या भागापासून सुरू झालेली ही साथ आता शहराच्या विविध भागात पसरली आहे. टाक्यांची स्वच्छता, पाइपलाइन दुरुस्ती, पाण्याची तपासणी, फिरता दवाखाना, मोफत रक्त तपासणी, धूर फवारणी यासारख्या उपाययोजना सध्या सुरू आहेत. राज्य शासनाच्या आरोग्य पथकाच्या सूचनांप्रमाणे प्रशासनाने नागरिकांच्या प्रबोधनाची व्यापक मोहीम सुरू केली आहे. जागोजागी फलक लावून, तसेच रिक्षा फिरवून कावीळ होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यायची, याबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. रुग्णांची माहिती देण्यासाठी शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या भागात जास्त रुग्ण असतील तेथे प्राधान्याने आवश्यक त्या उपाययोजना व प्रबोधन करण्यात येत आहे.

२६ हॉटेल्सला नोटिसा
महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील घरांसह हॉटेलमधील पाण्याची तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत ९८ हॉटेलांची पाहणी केली असून त्यापैकी २६ हॉटेलचालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या हॉटेलमधील पाणी पिण्यायोग्य नसून त्यात तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने हॉटेलचालकांना केेल्या आहेत. मनपाची ही तपासणी आणखी काही दिवस सुरूच राहणार आहे.

सर्व टाक्या स्वच्छ करा
आगरकर मळा परिसरातील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात आली, परंतु शहरातील इतर उंच टाक्यांच्या स्वच्छतेकडे मनपाने दुर्लक्ष केले आहे. या टाक्यांची तातडीने स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांसह विविध सामाजिक संस्था करत आहेत. रस्ते व नवीन पाणी योजनेच्या कामासाठी खोदकाम करताना अनेक ठिकाणी पाण्याच्या पाइपलाइन फुटलेल्या आहेत. त्यांची देखील तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहेत.