आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा आरोग्य विभागाची काविळीने दमछाक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दूषित पाण्यामुळे शहराच्या बहुतांश भागात काविळीची लागण झाली असून त्यावर उपाययोजना करताना महापालिका कर्मचाऱ्यांच्या नाकीनव आले आहेत. साथ रोखण्यासाठी आयुक्त विजय कुलकर्णी यांच्या आदेशानुसार आरोग्य विभाग कामाला लागला आहे. काविळीची लागण झालेल्या भागातील घरांची पाहणी करून त्याचा दैनंदिन अहवाल सादर करताना या विभागाची दमछाक होत आहे. या विभागामार्फत आतापर्यंत ५५ हजार घरांची पाहणी करून नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले, तरीदेखील काविळीच्या रुग्णसंख्येत घट होण्याऐवजी ती अधिक वाढली आहे.

दूषित पाण्यामुळे सुरू झालेली काविळीची साथ शहराच्या विविध भागात पसरली आहे. काविळीमुळे दोघांना जीव गमवावा लागला, तर सुमारे अकराशे नागरिक अजूनही काविळीने त्रस्त आहेत. संतप्त नागरिक व नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढल्यानंतर आयुक्त कुलकर्णी यांनी आठ दिवसांपूर्वी कावीळ रोखण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम तयार करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार आरोग्य, पाणीपुरवठा व बांधकाम या तिन्ही विभागांमार्फत संयुक्त मोहीम राबवण्यात येत आहे. घरोघरी जाऊन काविळीच्या रुग्णांची माहिती घेणे, नागरिकांचे प्रबोधन करणे, औषध फवारणी करणे यासारख्या अनेक उपाययोजना गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहेत. असे असले तरी काविळीच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
आगरकर मळा परिसरात तर प्रत्येक घरात काविळीचे तीन ते चार रुग्ण आहेत. या भागापासून सुरू झालेली ही साथ आता शहराच्या विविध भागात पसरली आहे. महापालिका आरोग्य विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंत १ हजार ७९ नागरिकांना काविळीची
लागण झाली आहे. सुमारे ३४६ रुग्णांना डिसचार्ज देण्यात आला असून ४२३ रुग्ण अजूनही वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने आरोग्य विभागाला धडकी भरली आहे. दैनंदिन पाहणी व उपाययोजना करूनही रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

आणखी तीन महिने काळजी घ्यावी लागणार
शासनाच्या आरोग्य पथकाने काविळीची लागण झालेल्या भागाची पाहणी करून विविध उपाययोजना करण्याच्या सूचना मनपा प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. परंतु काविळीची साथ रोखण्यासाठी आणखी तीन महिने काळजी घ्यावी लागणार असल्याचे आयुक्त कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले आहे. त्यानुसार काविळीची साथ आणखी काही महिने तरी आटोक्यात येणार नाही.