आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेला जातिवाचक शिवीगाळ; पत्रकार भंडारे यांना विनयभंगप्रकरणी अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- सफाई कामगार महिलेचा विनयभंग करुन तिला जातिवाचक शिवीगाळ करीत धमकावल्याप्रकरणी पत्रकार प्रकाश गोविंद भंडारे (65, पत्रकार वसाहत) यांच्याविरुद्ध तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना रविवारी सकाळी पत्रकार वसाहतीत घडली. सायंकाळी उशिरा भंडारे यांना अटक करण्यात आली.
सफाई कामगार महिलेने फिर्यादीत म्हटले आहे, रविवारी सकाळी एका ओळखीच्या महिलेबरोबर मी पत्रकार वसाहतीत साफसफाईसाठी गेले होते. भंडारे यांच्या घरासमोर साफसफाई करीत असताना त्यांनी आपला विनयभंग केला. आपण विरोध करण्याचा प्रयत्न केला असता जातिवाचक शिवीगाळ करत ‘तुझ्याकडे बघून घेईन’, अशी धमकी दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी भंडारे यांच्याविरुद्ध विनयभंग, अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा, तसेच नागरी हक्क संरक्षण कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सायंकाळी भंडारे यांना अटक करुन वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. या गुन्ह्याचा तपास शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक श्याम घुगे करत आहेत. भंडारे यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.