आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Justice Deliver To Common Man Through Court,Nagpur Bench Judge Gawai Said

न्यायालयाद्वारे सामान्यांना त्वरित न्याय मिळावा, नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती गवई यांची अपेक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवासे - देशातील ग्रामीण भागात ग्रामपंचायत पातळीवरील या पहिल्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या माध्यमातून शेवटच्या माणसाला त्वरित न्याय मिळण्याच्या प्रक्रियेला व ग्राम न्यायालयाच्या संकल्पनेला बळ मिळावे, अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले.
नेवासे येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते शनिवारी (8 फेब्रुवारी) बोलत होते. अहमदनगरचे पालक न्यायमूर्ती एम. टी. जोशी यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण झाले. नगरचे प्रधान जिल्हा न्यायाधीश जयंत कुळकर्णी अध्यक्षस्थानी होते. न्यायमूर्ती गवई म्हणाले, सामान्य नागरिकाला घटनेने न्यायाचा मूलभूत हक्क दिला आहे. त्रास न होता जलद व कमी पैशांत न्याय मिळण्यासाठी न्यायालय आपल्या दारी ही संकल्पना ग्राम न्यायालयाच्या माध्यमातून पुढे आली.
न्यायमूर्ती जोशी म्हणाले, नेवासे येथे न्यायालय होण्यासाठीचे र्शेय नेवासे वकील संघाचे अध्यक्ष बी. एस. टेमक यांच्या पाठपुराव्याला आहे. या न्यायालयात केसेसची संख्या वाढू नये, केसेसचा त्वरित निपटारा होण्यासाठी वकिलांनी व पक्षकारांनी तडजोडी आणि वाटाघाटी यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी न्याय व विधी खात्याचे सचिव बाळासाहेब देशमुख, बार कौन्सिलचे अशोक पाटील, बी. डी. साळुंके, पंचायत समिती सभापती कारभारी जावळे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाकचौरे, मनसेचे दिलीपराव मोटे, भाजपचे अजित फाटके आदी उपस्थित होते.
येष्ठ वकील मुरलीधर करडक यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मान्यवरांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. वकील संघाचे अध्यक्ष टेमक यांनी मनोगत व्यक्त केले. नेवासे जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रथम न्यायाधीश एस. व्ही. कुलकर्णी यांनी आभार मानले.
वकील संघाने न्यायालय इमारतीसाठी प्रयत्न करावे
नेवासे येथील जिल्हा व सत्र न्यायालयामुळे स्थानिक वकिलांची जबाबदारी वाढली आहे. नेवासे दिवाणी कनिष्ठ स्तर न्यायालयांच्या बाजूलाच जिल्हा व वरिष्ठ स्तर न्यायालयाची नवीन इमारत उभारण्यासाठी नेवासे वकील संघाने आता प्रयत्न सुरू करावेत. जयंत कुळकर्णी, प्रधान जिल्हा न्यायाधीश.