नेवासे- वैयक्तिक अभ्यासाबरोबर व्यवहारात उपयोगी पडणा-या सर्वसाधारण कायद्याची माहिती करून घ्यावी. त्यामुळे ज्ञानात भर पडेल. शिवाय व्यवहारात फसगत होणार नाही. कुटुंबीयांच्या व्यवहारात पालकाना मदत करता येईल. त्यासाठी कायदेविषयक ज्ञान संपादन करावे, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश शरद कुलकर्णी यांनी केले. श्रीज्ञानेश्वर महाविद्यालयात शुक्रवारी आयोजित कायदेविषयक जनजागृती शिबिरात ते बोलत होते. न्यायाधीश एस.एन.भालेराव, न्यायाधीश महेश फडे, प्राचार्य डॉ. अशोक शिंदे यांनी स्वागत केले. यावेळी अॅड. बी. एस. टेमक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
न्यायाधीश कुलकर्णी म्हणाले, विवाहानंतर प्रत्येकाने विवाह नोंदणी केलीच पाहिजे. त्यास पुराव्याच्या दृष्टीने महत्त्व आहे. सध्या सुविधा भरपूर आहेत.
विद्यार्थीनी प्रियंका वाल्हेकर हिने मनोगत व्यक्त केले. ती म्हणाली, या महाविद्यालयात रॅगिंग होत नाही. भविष्यातही होऊ देणार नाही. दस्तऐवज कायद्याचा व इतर कायद्याचा अभ्यास करून समाजाला त्याचा लाभ देऊ. हुंडा देणार नाही, घेणार नाही, असा संकल्पही तिने केला. प्राचार्य डॉ. शिंदे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक अॅड. टेमक यांनी केले. अॅड. व्ही. आर. जंगले यांनी रॅगिंग प्रतिबंधक कायदा, अॅड. पी. आर. माकोणे यांनी दस्तऐवजांचा कायदा, न्यायाधीश महेश फडे यांनी बाल अत्याचार प्रतिबंधक कायदा या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. अमान शेख, अॅड. के. टी. शिंदे, अॅड. प्रदीप वाखुरे आदींसह सर्व प्राध्यापक यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन अॅड. के. एच. वाखुरे यांनी केले. प्रा. साळवे यांनी आभार मानले.