आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टपाल विभागाने जपली महाकवी कालिदासांची स्मृती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - आषाढाचा पहिला दिवस ‘महाकवी कालिदास दिन’ म्हणून ओळखला जातो. मेघदूत, रघुवंशम्, कुमारसंभवम् यासारखी अजरामर महाकाव्ये आणि अभिज्ञानशाकुंतल, विक्रमोर्वशीयम, मालविकाग्नीमित्रम् यासारखी नाटके लिहिणार्‍या या महाकवीची चित्रमय आठवण टपाल विभागाने तिकिटांच्या रूपाने जतन केली आहे. जामखेड येथील संग्राहक पोपटलाल हळपावत यांच्या संग्रहात ही दुर्मिळ तिकिटे आहेत.

22 जून 1960 रोजी प्रकाशित केलेल्या तिकिटावरील चित्रात मेघामार्फत यक्षाने आपल्या प्रेयसीला संदेश पाठवला हे दृश्य दाखवण्यात आले आहे. ‘‘आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्ट सांनु। वप्रकीडा परिणत गजप्रेक्षनीयं ददर्श।।’’ हा संस्कृत श्लोक त्याखाली छापण्यात आला आहे. या तिकिटाची किंमत 15 नये पैसे आहे.

दुसरे टपाल तिकीट 2 फेब्रुवारी 1963 रोजी प्रकाशित करण्यात आले. महाकवी कालिदासाने लिहिलेल्या काव्यातील शकुंतला दुष्यंतराजाला पत्र लिहितानाचे वर्णन तिकिटावर चित्रीत करण्यात आले आहे. त्यावर ‘‘तव न जाने हृदयं मम पुन: कामो दिवापि रात्रावपि। निर्घृण । तपति बलीय: । - शकुन्तला’’ या संस्कृत ओळी आहेत.

हळपावत यांच्या संग्रहात मेघदूतातील चित्र असलेले ‘स्पेशल कव्हर’ही आहे. 1986 मध्ये पाटणा येथे झालेल्या बिहारच्या टपाल तिकीट प्रदर्शनात त्याचे प्रकाशन करण्यात आले होते. टपाल खात्याने स्वस्त दरात काढलेल्या पोस्टकार्डांना ‘मेघदूत’ असे नाव देण्यात आले आहे.

महाकवी कालिदास कोठे होते, कोणत्या प्रदेशातून आले होते हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. कालिदासाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपल्याकडे कुठेच काहीही शिल्लक नाही. जिथे मेघदूत लिहिले असे म्हटले जाते त्या विदर्भातील रामटेकवर त्याचे एक लहान स्मारक आहे. समाधान एवढंच की महाकवी कालिदास भारताचे होते आणि त्यांनी या देशाची संस्कृती, सभ्यता, भौगोलिक सौंदर्य, राजशासन आदींची माहिती आपल्या काव्यांमधून अमर केली. महाकवी कालिदास आणि त्यांच्या काव्याची मोहिनी आजही कायम आहे. केवळ भारतीय नव्हे, तर परदेशांतील विद्वानही त्याला दाद दिल्यावाचून रहात नाहीत, असे हळपावत म्हणाले.