आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kanhur Pathar Organization Issue At Nagar, Divya Marathi

कान्हूर पठार संस्थेची गुंतवणूक नियमबाह्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कान्हूर पठार पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप ठुबे यांनी राजकीय हेतूने काही ठिकाणी संस्थेच्या पैशांची केलेली गुंतवणूक संबंधित संस्थाच बुडाल्याने गोत्यात आली आहे.
‘कान्हूर पठार’ने शिरूरच्या अजित बँकेत व जिजामाता बँकेत केलेली लाखोंची गुंतवणूक त्या बुडाल्याने अडचणीत आली. वास्तविक पाहता कोणत्याही सहकारी पतसंस्थेस फक्त जिल्हा बँकेतच गुंतवणूक व व्यवहार करता येतात. इतर ठिकाणी गुंतवणूक किंवा व्यवहार करताना सहकार खात्याची परवानगी घेणे बंधनकारक असते. संस्था मल्टिस्टेट होण्यापूर्वी कोणतीही परवानगी न घेता विविध बँका व फंडांत अशी गुंतवणूक करण्यात आली. सन 2010 नंतर कोणत्याही वर्षाचे लेखापरीक्षण सभासदांना पाहण्यास मिळाले नाही. त्यामुळे या गुंतवणुकीचे पुढे काय झाले हे समजत नाही, असा आरोप जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांनी केला आहे.
कान्हूर पठार सहकारी पतसंस्था असली, तरी ती एक चालकानुवर्ती बनली आहे. त्यामुळे गैरव्यवहारांना मोकळे रान मिळाले. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप ठुबे यांनी टाकळी ढोकेश्वर, भाळवणी येथील शाखा आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या जागेत सुरू केल्या. त्यात त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळवून दिला. संस्थेतील आर्थिक गडबडी लपवण्यासाठी संस्था घाईने व बनावट कागदपत्रांद्वारे मल्टिस्टेट केल्याचा आरोपही आझाद ठुबे यांनी केला आहे
दिलीप ठुबे यांनी आपली संस्था अतिशय पारदर्शीपणे सुरू असल्याचा खुलासा केला आहे. मात्र, 17 पैकी 8 संचालक व सुमारे 40 टक्के कर्मचारी जवळचे नातेवाईक असल्याने पतसंस्थेच्या कारभारातील त्रुटी बाहेर जाणार नाहीत, याचा कडेकोट बंदोबस्त दिलीप ठुबे यांनी केल्याचा आरोप आझाद यांनी केला आहे. ते म्हणाले, पारदर्र्शीपणे काम करत असल्याचा व त्यामुळे जादा ठेवी असण्याचा आव आणणा-यांनी या ठेवी संस्थापक बाबासाहेब ठुबे यांच्यावरील विश्वासामुळे ठेवीदारांनी ठेवल्या आहेत, हे लक्षात घ्यावे.
संस्थेने सन 2009 मध्ये रिलायन्स इन्फ्रा या म्युच्युअल फंडात एक कोटीची गुंतवणूक केली. हा फंड आतापर्यंत पूर्णपणे तोट्यात होता. आता गुंतवणूकदार जेमतेम मुद्दलात असल्याची माहिती समजली.
‘मल्टिस्टेट’साठी सर्वच बनावट
मल्टिस्टेट करताना कोणती वार्षिक सर्वसाधारण सभा दिलीप ठुबे यांनी घेतली होती? सर्व बनावट कागदपत्रे करून अक्षरश: त्याबाबतच्या ठरावावर 169 लोकांच्या सह्या घेतल्या आहेत. या सह्यांपैकी सात पूर्ण बनावट, संचालकांच्या नावेवाईकांच्या 90 व 15 संस्थेच्या कर्मचा-यांच्या व फक्त सात संचालकांच्या आहेत. विरोधी संचालकांना, तर हा ठराव कधी झाला हे माहिती नाही. त्यापैकी तीन बाळासाहेब मार्तंड ठुबे, बाळासाहेब भालेकर व कौसाबाई पारधी यांनी, आपल्याला सभाच कधी झाली, याची माहिती नसल्याचे प्रतिज्ञापत्र केंद्रीय निबंधकांना पाठवले आहे. त्यात त्यांनी गेल्या सहा वर्षांपासून आपल्याला आर्थिक ताळेबंद दाखवला जात नसल्याचीही तक्रार केली आहे. हाच तुमचा पारदर्शी कारभार आहे का, असा सवालही आझाद ठुबे यांनी उपस्थित केला आहे.
सभासदांबाबत मनमानी
संस्थेत विरोधी गटाचे समजून 466 संस्थापक सभासदांना सन 2009 मध्ये काढून टाकण्यात आले होते. त्यांना परत घेण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हस्तक्षेप केला. आझाद ठुबे व विरोधी संचालकांनी यासाठी उपोषण केल्यानंतर काढलेल्या सभासदांना पुन्हा घेण्यात आले. अण्णांचे तसे पत्रच ‘दिव्य मराठी’ ला मिळाले आहे.

उप-यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये...
कान्हूर पठार पतसंस्थेची स्थापना माझ्या वडिलांनी केली आहे. त्यांच्यावरील विश्वासामुळेच लोकांनी संस्थेत ठेवी ठेवल्या. या ठेवीदारांच्या हिताचा आम्ही नाही, तर कोण विचार करणार? दिलीप ठुबेंना आमच्या वडिलांनीच नोकरीला लावले. या पतसंस्थेतील गैरप्रकारांमुळेच आम्ही दुसरी पतसंस्था स्थापन केली. कान्हूर पठार पतसंस्थेतील गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी आता आम्ही व आमच्या मातोश्री नंदादेवी ठुबे संस्थेच्या समोर उपोषणाला बसणार आहोत.’’
आझाद ठुबे, जि. प. सदस्य व पतसंस्थेचे संस्थापक बाबासाहेब ठुबे यांचे सुपुत्र.
आझाद ठुबे यांच्या मागण्या
-पन्नास लाखांहून अधिक कर्ज दिलेल्यांची यादी जाहीर करावी
-सन 2010 नंतरचे लेखापरीक्षण अहवाल व संस्थेचा ताळेबंद समोर ठेवा
-2010-11 या वर्षात वाढवलेल्या सभासदांच्या नोंदणी अर्जाच्या नकला द्या
-संचालकांकडील थकीत कर्जाची माहिती द्यावी.
सर्व आरोप बिनबुडाचे...
कान्हूर पठार पतसंस्थेची आर्थिक परिस्थिती भक्कम असून विरोधकांनी केलेले आरोप बिनबुडाचे व राजकीय हेतून प्रेरित असल्याचा खुलासा संस्थेचे कार्यकारी संचालक दिलीप ठुबे यांनी केला. पतसंस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याची जाणीव असताना देखील जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे केवळ राजकीय विरोधापोटी संस्थेची बदनामी करीत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. पतसंस्थेवर सभासद, खातेदार व ठेवीदारांचा विश्वास असल्यानेच 172 कोटींच्या ठेवी जमा झाल्या असून 122 कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे. संस्थेची 70 कोटींची गुंतवणूक, तर 12 कोटींचा स्वनिधी आहे. विविध महत्त्वाच्या 8 शहरांत संस्थेची स्वमालकीची अद्ययावत कार्यालये आहेत. संस्थेला दरवर्षीच ‘अ’ ऑडिट वर्ग मिळत आहे. या कार्याची दखल घेऊन राज्य पतसंस्था फेडरेशनने संस्थेचा आदर्श पतसंस्था पुरस्कार देऊन गौरव केला. पतसंस्था ही व्यापारी संस्था असल्याने मोठे व्यापारी व उद्योजकांकडून कर्जवसुलीची खात्री असल्याने संस्थेच्या हितासाठी त्यांना कर्जपुरवठा करण्यात येतो. तसेच शेतकरी, सामान्य व्यापारी, सुशिक्षित बेरोजगार व महिला वर्गाला देखील त्यांची पत व कर्ज फेडण्याच्या कुवतीनुसार कर्जपुरवठा करण्यात येतो, अशी माहितीही त्यांनी दिली.
आपण गेल्या 27 वर्षांपासून संस्थेचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. या काळात संस्थेच्या हिताचीच जोपासना केली. आरोप करणा-या विरोधकांच्या या संस्थेत कोणत्याही प्रकारच्या ठेवी अथवा व्यवहार नसताना त्यांना संस्थेच्या हिताचा कळवळा कशासाठी, असा सवाल करीत या पुढील काळात संस्थेची बदनामी खपवून घेणार नसल्याचे ठुबे यांनी निवेदनात स्पष्ट केले.