आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कान्हूर पठार पतसंस्थेच्या चौकशीची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पारनेर तालुक्यातील दिवंगत कम्युनिस्ट नेते बाबासाहेब ठुबे यांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी स्थापन केलेल्या कान्हूर पठार पतसंस्थेत आता शेतकर्‍यांना अल्प किमतीची कर्जे मिळणे दुरापास्त झाले आहे. त्याऐवजी बड्या मंडळींना कोट्यवधींचे कर्जवाटप सुरू आहे. सभासदांना विश्वासात न घेता हा उद्योग सुरू असल्याने ठेवीदारांनी दोन आठवड्यांपूर्वी वडझिरे व वासुंदे येथील शाखांत रांगा लावून आपल्या ठेवी काढून नेल्या. हेच लोण आता नगर शहरात पसरण्याची शक्यता व्यक्त करून मल्टिस्टेटच्या नावाखाली सुरू असलेल्या या पतसंस्थेच्या गैरव्यवहारांची चौकशी विश्वसनीय यंत्रणेकडून करण्याची मागणी संस्थेचे संस्थापक बाबासाहेब ठुबे यांचे पुत्र व जिल्हा परिषदेचे सदस्य आझाद ठुबे यांनी केली आहे.

नगर जिल्ह्यात आतापर्यंत निघोज येथील सहकार महर्षी किसनराव वराळ, संपदा, तापी, वडझिरेची शरदचंद्र या पतसंस्था आपल्या गैरव्यवहारांमुळे बुडाल्या. त्यामुळे त्यांत ठेवी असलेले लोक अक्षरश: देशोधडीला लागले. त्यात दिवसागणिक वेगवेगळी नावे समाविष्ट होत आहेत. नगरमधील रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेचे ठेवीदारही संकटात सापडल्याच्या पार्श्वभूमीवर आझाद ठुबे यांनी कान्हूर पठार पतसंस्था वाचवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. ‘दिव्य मराठी’शी बोलताना त्यांनी संस्थेच्या कारभाराबद्दल चिंता व्यक्त केली. संस्थेबद्दल माहिती देताना आझाद ठुबे म्हणाले, की कान्हूर पठार पतसंस्था शेतकर्‍यांना सावकारांच्या पाशातून सोडवण्यासाठी व त्यांची आर्थिक पत वाढवण्यासाठी बाबासाहेब ठुबे यांनी 1984 मध्ये स्थापन केली. त्यावेळी पतसंस्था फक्त नागरी होत्या. पण ठुबे यांनी त्यासाठी विधानसभेत लढा देऊन ग्रामीण भागात पतसंस्था सुरू करण्याची परवानगी देण्यास सरकारला भाग पाडले. नंतर बाबासाहेबांना इतर कामांमुळे तिच्याकडे फारसे लक्ष देता आले नाही. त्यामुळे या पतसंस्थेचे व्यवहार ठप्प झाले. 1987 मध्ये बाबासाहेबांनी ती ज्ञानदेव वाफारेला चालवण्यास दिली. 1990 मध्ये संस्था बळकावण्याच्या उद्देशाने सभासद वाढवून वाफारे त्यावेळचे संस्थेचे सचिव व सध्याचे व्यवस्थापक दिलीप ठुबे यांनी बाबासाहेबांचा विश्वासघात करून त्यांना बाजूला केले. 90 ते 95 दरम्यान बाबासाहेबांना मानणार्‍या संचालकांना अपात्र ठरवून वाफारे व दिलीप ठुबे यांनी बाजूला करीत बाबासाहेबांना संस्थेतून हद्दपार केले. 1995 च्या निवडणुकीत, तर याच वाढवलेल्या सभासदांच्या जोरावर बाबासाहेबांचे पॅनेल पराभूत करण्यात दिलीप ठुबे यांना यश आले.

1995 ते 2001 या कालावधीत वाफारेच्या नेतृत्वाखाली चांगली नावारूपास आली. संस्थेचे स्वमालकीची इमारतही या काळातच उभी राहिली. 2001 च्या निवडणुकीपूर्वी दिलीप ठुबे यांनी वाफारेंनाही संस्थेतून बाहेर काढण्याचा कट केला. त्यानुसार 2001 मध्ये बाबासाहेबांना मानणार्‍या लोकांचे आझाद ठुबे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल तयार करून त्यांच्यामार्फत दिलीप ठुबे यांनी सत्ता मिळवली. नंतर याही पॅनेलमध्ये फुट पाडून संपूर्ण संस्थेवर कब्जा मिळवला.

‘मल्टिस्टेट’चे कवच
2006 च्या निवडणुकीत दिलीप ठुबे यांनी 15 पैकी नऊ जागांवर आपले जवळचे नातेवाईक उभे करून संस्थेवर एकहाती कब्जा मिळवला. तेथूनच संस्थेत गैर कारभाराला सुरुवात झाली, असे आझाद ठुबे यांनी सांगितले. ‘मल्टिस्टेट’चे कवच मिळाल्याने संस्थेत आर्थिक गैरव्यवहार सुरू आहेत. ज्या सामान्य शेतकर्‍यांसाठी ही संस्था सुरू झाली, त्यांना लहान रकमेचे कर्ज दिले जात नाही. त्या ऐवजी नगरमधील बड्या लोकांना कोट्यवधींची कर्जे दिली जात आहेत. त्यासाठी एक कोटींचा बोजा चढवलेला ‘सात-बारा’ उताराच आझाद यांनी सादर केला. या कर्जाबाबत व त्याच्या वसुलीबाबत कोणतीही माहिती मिळत नाही. माहितीच्या अधिकारातही माहिती मागितली, तरी ती नाकारली जात. अहवालातील माहितीही थातूरमातूर असल्याने सभासद व ठेवीदारांची चिंता वाढली आहे, असे आझाद यांनी नमूद केले. (क्रमश:)

नाव ‘मल्टिस्टेट’ मात्र परराज्यात एकही शाखा नाही
2009 मध्ये मल्टिस्टेटचा दर्जा मिळवलेल्या कान्हूर पठार पतसंस्थेची परराज्यात अद्याप एकही शाखा सुरू झालेली नाही. मुळात मल्टिस्टेटचा ठराव करताना घेतलेली विशेष सर्वसाधारण सभा बोगस होती. सर्व नियमांना फाटा देऊन घाईघाईत संस्था ‘मल्टिस्टेट’ करण्यात आली. ही संस्था वाचवण्यासाठी कान्हूर पठार पतसंस्था बचाव समितीचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे.’’
आझाद ठुबे, जिल्हा परिषद सदस्य व संस्थेचे संस्थापक बाबासाहेब ठुबे यांचे सुपुत्र.

मनमानीचा ‘मल्टिस्टेट’चा फंडा
2009 मध्ये या संस्थेचे मल्टिेस्टेटमध्ये रूपांतर करण्यात आले. संस्था एकदा मल्टिस्टेट झाली, की तिच्यावरील राज्य सरकारचे नियंत्रण संपते. त्यामुळे राजस्थानातील भिलवाडा जिल्ह्यातील एका गावातील सभासद केल्याचे दाखवून संस्थेला मल्टिस्टेटच्या दर्जासाठी परवानगी मागण्यात आली. यामागे अतिशय सुरस कथा आहे. राजस्थानातील एक विहिरींचे काम करणारा कारागीर गावात कामाला होता. त्याचे ते गाव होते. त्या गावाचे आता कोणालाही नाव सांगता येत नाही. मल्टिस्टेट संबंधित अधिकार्‍यांनी कोणतीही शहानिशा न करता ही परवानही संस्थेला बहाल केली. आता सहकार खात्याकडे संस्थेबद्दल कोणी व कोणतीही माहिती मागण्यास किंवा तक्रार करण्यास गेला, तर त्याला दिल्लीचा रस्ता दाखवला जातो. चिकाटीने ती व्यक्ती दिल्लीलाही गेली, तर तिची दखल घेत नाही, अशी माहिती आझाद ठुबे यांनी दिली.

विरोधकांचे कारस्थान
४स्वत:चे अपयश झाकण्यासाठी राजकीय विरोधकांनी रचलेले हे कारस्थान आहे. वसुलीमुळे दुखावलेल्या थकबाकीदारांना खतपाणी घालून विरोधक संस्थेची बदनामी करत आहेत. ठेवीदारांच्या विश्वासावर आम्ही हे कारस्थान हाणून पाडू.’’
दिलीप ठुबे, मुख्य कार्यकारी अधिकारी, कान्हूर पठार मल्टिस्टेट पतसंस्था.

सर्व काही सुरळीत
इतर पतसंस्था अडचणीत आल्याचा आमच्या संस्थेवर कोणताही परिणाम झालेला नाही. ठेवीदारांनी ठेवी काढलेल्या नाहीत. संस्थेचा सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहे. संस्थेसमोर कोणत्याही अडचणी नाहीत.’’
सखाराम ठुबे, अध्यक्ष, कान्हूर पठार पतसंस्था.