आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जत तालुक्यातील पाणीप्रश्न आणखी गंभीर, कुकडीचे पाणी सोडण्याची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्जत; तालुक्यातील पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर झाला आहे. टँकरची मागणी वाढत आहे. कर्जत शहराला १३ टँकरने पाणी पुरवठा होत आहे. वाड्यावस्त्यांवरील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. बहुतांशी पाण्याचे उद््भव कोरडे पडले आहेत. या भागात पाणीपुरवठा कसा करणार हा प्रशासनापुढे प्रश्न पडला आहे.कुकडीचे पाणी त्वरित सोडण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

पाणीप्रश्न सोडवण्यासाठी कुकडी हाच एकमेव आधार आहे. यापूर्वी कुकडीचे जेव्हा सोडण्यात आले, तेव्हा तालुक्याच्या वाट्याला पुरसेे पाणी मिळाले नाही. थेरवडी दूरगाव तलावात पिण्यासाठी जे पाणी सोडले होते, ते केव्हाच संपले आहे. आता टँकर भरायचे कोठे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
तालुक्याला हक्काचे कुकडीचे पाणी कधीच मिळत नाही. यापूर्वी कुकडीचे पाणी सोडताना टेल टू हेड पाणी सोडावे म्हणून मागणी केली जात होती. प्रत्यक्षात मात्र कधीही नियमाप्रमाणे पाणी सोडले जात नाही. सुरुवातीला कुकडीचे पाणी सोडताना करमाळा तालुक्याला पाणी सोडले जाते. तालुक्यात प्रशासकीय गलथानपणामुळे पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. यात सत्ता कोणाचीही असो कर्जत तालुका पाणीटंचाई हे समीकरण मात्र दिवसेंदिवस अधोरेखित केले जात आहे.
गेल्या पाच वर्षांपासून तालुक्यात पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. तालुका टँकरमुक्त व्हावा म्हणून शासनाने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. मात्र, यात जनतेचा सहभाग नसल्याने कोट्यवधी रुपये पाणलोट विकासावर खर्च होऊनही कर्जत तालुक्यातील पाणीटंचाई दूर होऊ शकली नाही. आज कर्जत तालुक्यातील शेती पावसाअभावी वाया गेली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. फळबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. खरीप हंगाम वाया गेला, रब्बीही हातचा जाणार आहे. तरीही शासनाकडून तालुक्यात दुष्काळ जाहीर केला जात नाही. तालुक्यात दुष्काळ जाहीर व्हावा म्हणून आंदोलने होत आहेत.

शासनाने येथील शेतकऱ्यांचा सर्व सामान्यांचा अंत पाहू नये, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ून व्यक्त होत आहे.

तालुक्यात छावण्या सुरू होणे गरजेचे
तालुक्यातदुष्काळी परिस्थिती आहे. शासनाकडून याची दाखल घेतली जात नाही. खरिपापाठोपाठ रब्बीही वाया गेला. जनावरांच्या चाऱ्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जनावरांच्या छावण्या सुरू होणे गरजेचे आहे; अन्यथा तालुक्यात जनावरेच शिल्लक राहणार नाहीत. दुधाला भाव नसल्याने येथील दूध व्यवसाय मोडकळीस आला आहे. पालकमंत्र्यांना मतदारसंघाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. काँग्रेसतर्फे तालुक्यात आंदोलन करण्यात येणार आहे.'' बाळासाहेबसाळुंके, अध्यक्ष, तालुका काँग्रेस.

पालकमंत्री शिंदे फक्त दौरे करण्यातच मग्न...
पालकमंत्रीराम शिंदे यांच्याकडे आठ खात्यांचा पदभार आहे. त्यामुळे त्यांना मतदारसंघाकडे लक्ष देण्यास थोडाही वेळ नाही. तालुका दुष्काळाने होरपळत आहे. मंत्री महोदय मात्र लालदिव्याच्या गाडीत बसून राज्यभर दौरे करण्यात सध्या मग्न आहेत. तालुक्यात गेल्या एक वर्षाच्या काळात कोणती किती विकासाची कामे झाली आहेत, हे पालकमंत्र्यांनी एकदा जनतेला सांगावे. त्यामुळे कर्जत तालुक्यात लवकरच मोठे आंदोलन करण्यात येणार आहे.'' अॅड.सुरेश शिंदे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी लिगल सेल.