आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्जतच्या पर्यटन विकासाला गरज मार्केटिंगची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्जत - सतत दुष्काळी असलेल्या कर्जत तालुक्याचा अडखळलेला विकास गतिमान करण्यासाठी पर्यटन क्षेत्र खुणावत आहे. तालुक्यातील क्षेत्र मांदळी, संत गोदड महाराज, भोसे खिंड पाणी वहन बोगदा, राशीन येथील हलती दीपमाळ, दूरगाव येथील दुर्योधन मंदिर, रेहेकुरी अभयारण्य, श्रीक्षेत्र सिद्धटेक ही महत्त्वाची पर्यटन क्षेत्रे विकसित करण्यास वाव आहे. तालुक्यात पर्यटन विकासाला प्राधान्यक्रम देत योग्य मार्केटिंग व सुविधा उपलब्ध करून दिल्यास येथे पर्यटन विकासाला वाव मिळेल.
पुणे, बीड आणि सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर कर्जत तालुक्याचे प्रवेशद्वार असलेले नगर-सोलापूर मार्गावरील आत्मागिरी महाराज क्षेत्र मांदळी हे प्रतिपंढरपूर समजले जाते. येथे दर सोमवारी व एकादशीला भाविकांची मोठी गर्दी होते. जिल्ह्यासह बीड, पुणे व सोलापूर जिल्ह्यातून भाविक दिंडीने पायी येतात. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून येथे भक्तनिवास व प्रसादालयाची कामे प्रगतिपथावर आहेत. एसटी महामंडळातर्फे बसेस सोडण्यात येतात. नगर - सोलापूर मार्गावरून येणार्‍या सर्व बसगाड्यांना या ठिकाणी थांबा देण्यात यावा, अशी भाविकांची मागणी आहे.
राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले राशीनचे यमाई देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते. हलत्या दीपमाळा या ठिकाणी आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून देवस्थानची ख्याती सातासमुद्रापार पोहोचली आहे. मंगळवारी या ठिकाणी बैलांचा मोठा बाजार भरतो. यात लाखो रुपयांची उलाढाल होते.
काशी विश्वेश्वर मंदिर, विष्णू नागेश्वर, उद्बोधनाथ महादेव मंदिर, काळा महादेव व खंडोबा मंदिरात श्रद्धाळूंची गर्दी असते.

नवरात्रोत्सवासह अन्य उत्सव येथे साजरे होतात. या स्थळाचा तीर्थक्षेत्रांच्या ‘ब’ वर्गात समावेश करण्यात आला आहे. देवस्थानचे उत्पन्न जास्त असले तरी तुलनेत सुविधांचा अभाव आहे. सर्व सुविधायुक्त विश्रामगृह, अद्ययावत बसस्थानक, भक्तनिवासाची वाढीव इमारत, गावातून मंदिराला जोडणार्‍या अंतर्गत मार्गाचे डांबरीकरण, दर्शनबारी, वाहनतळ, क्लोज सर्किट टीव्ही व पोलिस स्थानकाची या ठिकाणी आवश्यकता आहे.
कर्जतपासून 4 किमी अंतरावर रेहेकुरी येथे 2.17 चौरस किमी एवढ्या विस्तीर्ण जागेत काळवीट अभयारण्य विखुरले आहे. हिरवीगार वनश्री, रंगीबेरंगी फुलपाखरे, विविध पक्षी व प्राणी या अभयारण्यात आहेत. या अभयारण्यात काळवीट, चिंकारा, लांडगा, कोल्हा, कापशी, माळाटिटवी, जंगली कबुतर, शिंपी, गाय, बगळा, चित्रबलाक, धामण, नाग आणि कॉमन रोज, कॉमन गार्डन लिझार्ड, कॉमन इंडियन हे सरडे, तर कॉमनरोज, स्ट्रीपड टायगर या फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात. भटकंती करताना याचा वेळोवेळी प्रत्यय येतो.
एकेकाळी भारतीय उपखंडात चार लाख काळवीट होते. तथापि, 1983 च्या गणनेनुसार फक्त 24 हजार उरले आहेत. रेहेकुरी अभयारण्यात ही संख्या 500 च्या वर आहे.

कर्जत येथील संत गोदड महाराजांची रथयात्रा प्रसिद्ध आहे. रथयात्रोत्सवाला शासकीय मदत झाल्यास धाकट्या पंढरीचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही.

देशात एकमेव असलेले तालुक्यातील दुरगाव येथील दुर्योधनाचे मंदिर प्रसिद्ध आहे. पौराणिक काळातील कौरव - पांडवांच्या युद्धाची या गावास पार्श्वभूमी आहे. पांडव अज्ञातवासात लपले होते, तो पांडव डोह अजून याची साक्ष देतो. लोक दुर्योधनाबरोबर पांडव डोहाची पूजा करतात. पावसाळ्यात दुर्योधनाची मूर्ती कोंडल्यानंतर तिला घाम फुटतो, त्यानंतर पाऊस पडतो, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. या स्थळाला भेट देण्यासाठी पर्यटक येत असतात.
विकासकामांना गती आवश्यक
अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र सिद्धटेक येथील सिद्धिविनायकाच्या मूर्तीसह भीमा नदीकाठचा परिसर विलोभनीय आहे. या ठिकाणी भक्तनिवास, तसेच प्रसादालय आहे. त्याचप्रमाणे नौकानयन चांगल्याप्रकारे सुरू आहे. विकासकामे मंद गतीने चालू आहेत. गैरसोयीमुळे या ठिकाणी भक्त आणि पर्यटकांची संख्या रोडावली आहे.
सर्वात मोठा बोगदा
आशिया खंडातील जमिनीखालून पाणी वहन करणारा सर्वात मोठा व महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून भोसेखिंड प्रकल्पाची ख्याती आहे. कुकडीचे पाणी या प्रकल्पाद्वारे सीना धरणात सोडण्यात येते. डोंगर पोखरून केलेला बोगदा हा उत्कृष्ट नमुना आहे. पाणी चालू असताना ते पाहण्यासाठी गर्दी होते. सुविधा झाल्यास हे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध होईल.