आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिरी मुले नगरला दत्तक, शिक्षणासाठी आठ मुलांना डाॅक्टर दांपत्याची मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काश्मिरातील महापुरात उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांतील ८ मुले नगरच्या डाॅ. दीपक दांपत्याने शहरात आणली आहेत. या मुलांसोबत डाॅ. एस.एस. दीपक, त्यांच्या पत्नी डाॅ. किरण, सौरभ देशमुख, गौरव गुगळे, विनीता घोडके, सुषमा घोडके, वर्धमान मुनोत. छाया : अनिल शाह
नगर - काश्मीरमधील फुटीरतावादावर प्रेम आणि शिक्षण हीच मात्रा ठरू शकेल. याच प्रेमाच्या सेतूने काश्मिरातील श्रीनगरला महाराष्ट्रातील अहमदनगरशी जोडले आहे. महापुरात उद्ध्वस्त झालेल्या गरीब कुटुंबांतील ८ मुले नगरच्या डॉ. दीपक दांपत्याने आणली आहेत. त्यांच्या राहण्या-खाण्यासह शिक्षणाची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. ८ ते १४ वयोगटातील शाहनवाझ अहमद, बिलाल अहमद, रुहुलुल्लाह इब्राहिम, अमजद अली, शाहीद अहमद, एजाज रसूल, रुहुलुल्लाह रसूल दार, रफिक रथर ही मुले मार्च महिन्यात येथे आली आहेत. एवढेच नाही तर आणखी १५ मुले येण्याच्या तयारीत आहेत.

नगरमधील डॉ. एस. एस. दीपक व त्यांच्या पत्नी डॉ. किरण यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. डाॅ. किरण या एका प्रकल्पावर काम करत आहेत. त्याअंतर्गत तळागाळातील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना काम करायचे होते. आपल्याकडे तशी मुले होती. परंतु त्याचवेळी दीपक यांची काश्मिरात समाजकार्य करणा-या नगरच्या स्नेहालय संस्थेशी निगडित सौरभ देशमुख व पेशाने सीए असलेले गौरव गुगळे यांच्याशी चर्चा झाली. काश्मिरातील पुरात सर्वस्व हिरावले गेलेल्या कुटुंबाच्या स्थितीची माहिती त्यांना मिळाली. श्रीनगरपासून १५-१६ कि.मी.वर शरिफाबादेत ‘जोडो भारत’अभियानांतर्गत देशमुख व गुगळे यांचे काम सुरू आहे. नुकतेच यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेले देशमुख तेथील तरुणांना परीक्षेबाबत मार्गदर्शन करतात. शरिफाबादेत आर्थिक क्षमता नसलेली अनेक मुले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. डाॅ. किरण यांच्या उपक्रमांतर्गत या मुलांना नगरला आणण्याचे त्यांनी ठरवले. त्यानुसार ही मुले आली आहेत. त्यांच्या शालेय व उच्च शिक्षणाची जबाबदारी नगरकरांनी घेतली आहे. नंतर ही मुले त्यांच्या राज्यात जातील. एकेकाळी शेख सलाउद्दीन या कट्टर अतिरेक्याचा बालेकिल्ला असलेल्या शरिफाबादची मुले नवी उमेद घेऊन आली आहेत. प्रेमाच्या धाग्याने ती बांधली जात आहेत.

सीबीएससी पॅटर्नमध्ये शिक्षण
पहिली ते सहावी अशा इयत्तेत ही मुले शिकली आहेत. पुढचे शिक्षण आता नगरच्या तारकपूर भागातील सेंट मोनिका प्रॅक्टिसिंग स्कूलमध्ये होणार आहे. त्यांच्या प्रवेशासाठी शाळेच्या निवृत्त पर्यवेक्षिका विनिता घोडके, सिस्टर सुषमा घोडके यांनी मोलाचे सहकार्य केले.

‘खरा तो एकची धर्म...’
नगरच्या उष्ण वातावरणात ही मुले आली. नगर कसे वाटले असे विचारता एका सूरात म्हणाली, खूप छान! या मुलांची शाळा जूनमध्ये सुरू होईल. पण वातावरणाचा सराव व्हावा म्हणून त्यांना लवकर आणण्यात आले आहे. ‘स्नेहालय’ संचालक डॉ. गिरीष कुलकर्णी यांनी त्यांची चांगली व्यवस्था केली आहे. तेथील वातावरणात मराठी खाद्य संस्कृतीला ही मुले चांगलीच रूळली आहेत. ब-यापैकी मराठीही बोलत आहेत. साने गुरुजींची "खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे' ही प्रार्थनाही ते म्हणतात.

‘घरवापसी’चा अडथळा
शिक्षणापासून दुरावलेल्या मुलांच्या पालकांशी सौरभ देशमुख यांनी संपर्क केला. शिक्षणासाठी गाव सोडण्याची तयारी २२ मुलांनी दाखवली. त्याचवेळी हिंदुत्ववादी संघटनांचा "घरवापसी' कार्यक्रम जोर धरत होता. मुलांचेही धर्म परिवर्तन होईल अशी भीती वाटल्याने या लोकांनी ऐनवेळी मुलांना पाठवण्यास नकार दिला. पण गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी समजावल्यामुळे आठ पालकांनी मुले पाठवली. आलेली मुले गावातील इतर मुलांना येथील परिस्थिती, व्यवस्थेबद्दल कौतुकाने सांगत आहेत. यामुळे शरिफाबादेतील आणखी १५ मुलेही नगरला येण्याच्या तयारीत आहेत.
रोजगार उपलब्ध करून द्यावा
सामान्य काश्मिरी माणसाची भारतीयांबाबत चांगली भावना आहे. देशातील पर्यटकांमुळेच त्यांचे पोटपाणी चालते याची जाणिवही त्यांना आहे. पर्यटन व काही प्रमाणात शेती हीच उपजिविकेची साधने आहेत. वर्षभरापूर्वीच्या पुरामुळे हे राज्य २० वर्षे मागे गेले आहे. लोक बेघर झाले. सफरचंदाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. बेरोजगारी मोठी आहे. रिकामे व माथी भडवली गेलेले तरुण वेगळ्या मार्गाला जातात. त्यांना रोजगार दिला तर त्यांच्यातील अलगपणाची भावना कमी होईल. ते मुख्य प्रवाहात येतील.
- सौरभ देशमुख, समन्वयक, ‘जोडो भारत मोहीम’