आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कवी अनंत फंदी पुरस्कार भूषणावह

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर - आई-वडिलांच्या नावाने पुरस्कार दिले जातात. मात्र, या पुरस्कारांपेक्षा कवी अनंत फंदी यांच्या नावाने दिल्या जाणार्‍या पुरस्काराचे महत्त्व मोठे आहे. फंदी यांच्या नावाने पुरस्कार दिला जावा, अशी अपेक्षा त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाइकांनी धरली नव्हती, म्हणूनच हा पुरस्कार पुरस्कारार्थीसाठी भूषणावह असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बी. जे. खताळ यांनी केले.

संगमनेर इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने रविवारी कवी अनंत फंदी साहित्य पुरस्कारांचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व माजी मंत्री बी. जे. खताळ यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. या वेळी खताळ बोलत होते. शिवचरित्राचे अभ्यासक प्रा. सोपान देशमुख, माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, कवी अनंत फंदी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जसपाल डंग, इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष डी. बी. राठी आदींसह पुरस्कारार्थी व्यासपीठावर उपस्थित होते.

संगमनेरचे शाहीर शिवाजी कांबळे, अनुराधा ठाकूर, किशोर पाठक, दादाजी बागूल, आनंद हरी, किरण भावसार, अनिल कांबळी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शेंडी (भंडारदरा) येथील पांडुरंग खाडगीर व अविनाश मोंढे यांचाही गौरव इतिहास संशोधन मंडळाने केला.

खताळ म्हणाले, आज देशासमोर अनेक भीषण प्रश्न आहेत. मात्र, त्यांची चर्चा होताना दिसत नाही. या प्रश्नांऐवजी जयंती, पुण्यतिथी, सत्कार यांचा जोर वाढला आहे. पुरस्कारांचेही तसेच झाले आहे. आई-वडील यांच्या नावाने पुरस्कार सुरू झाले. त्यामुळे पुरस्कार कोणाच्या नावाचा आहे हे पाहणे आवश्यक आहे. काही साहित्य केवळ करमणूक करते, तर काही साहित्यातून जगण्याची प्रेरणा मिळते. अनुभवातून आलेले साहित्यच चिरकाल टिकणारे असते. जे साहित्य अनुभवातून येत नाही, ते साहित्य असूच शकत नाही. साहित्याची सवरेत्कृष्ट पद्धतीने सांगड घालण्याचे काम इतिहास संशोधन मंडळ करीत असून कवी अनंत फंदी पुरस्कार मिळालेल्या पुरस्कारार्थींचे साहित्य जीवनाचे महत्त्व सांगणारे आहे. स्वअनुभवातून आलेले साहित्य कायमस्वरूपी असते.

पुरस्कारार्थी साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून समाजाला नवे विचार देण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रा. देशमुख यांनी सांगितले. या वेळी पुरस्कारार्थी अनुराधा ठाकूर व किशोर पाठक यांनीही मनोगत व्यक्त केले.

महसूलमंत्र्यांनी केले पुरस्कारार्थींचे कौतुक

इतिहास संशोधन मंडळाचे कार्यकर्ते साहित्याशी एकरूप झालेली माणसे आहेत. समविचारी लोकांनी एकत्र येऊन सुरू केलेला हा पुरस्कार म्हणजे मनापासून काम करणार्‍या पुरस्कारार्थींचा सत्कार सोहळा आहे. महाराष्ट्र व संगमनेरसाठी बी. जे. खताळ हे अभिमानाने घेतले जाणारे नाव आहे. पुरस्कारार्थी शिवाजी कांबळेंसारखी माणसे येथील समाजजीवनाचा एक भाग बनली असल्याचे सांगत महसूलमंत्री थोरात यांनी पुरस्कारार्थींचे कौतुक केले.