आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन हजारांवर नागरिकांना काविळची लागण, उपाययोजनांच्या कृती कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- कावीळ झालेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले. आयुक्त विजय कुलकर्णी यांनी ठोस कृती कार्यक्रम तयार करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मात्र, दहा दिवस उलटले, तरी या कृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही. अनेक भागात अजूनही दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. परिणामी रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
महिनाभरापूर्वी आगरकर मळा, आनंदनगर, गजानन कॉलनी, स्मृती कॉलनी, शिवनेरी चौक, मल्हार चौक आदी भागात पाचशेपेक्षा अधिक नागरिकांना काविळीची लागण झाली होती. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाल्यानंतर महापालिका प्रशासन व सत्ताधारी खडबडून जागे झाले. कावीळ रोखण्यासाठी आठ दिवसांपूर्वी आयुक्तांनी ठोस कृती कार्यक्रम तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार आरोग्य, पाणीपुरवठा व बांधकाम या विभागांमार्फत संयुक्त मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र, रुग्णांची वाढती संख्या पाहता ही मोहीम तोकडी ठरली आहे. घरोघरी जाऊन रुग्णांची माहिती घेणे, नागरिकांचे प्रबोधन करणे, औषध फवारणी करणे यासारख्या अनेक उपाययोजना सुरू आहेत. मात्र, मूळ प्रश्नाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. काविळीची साथ दूषित पाण्यामुळे पसरली. ठिकठिकाणी पिण्याच्या पाइपलाइनला गळती लागली आहे. अनेक ठिकाणच्या पाइपलाइन ओढेनाल्यांतून गेल्या आहेत, तर काही ठिकाणी ड्रेनेजचे पाणी या पाइपलाइनमध्ये शिरले आहे. त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. ठरावीक दोन-चार ठिकाणची पाइपलाइन दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे दूषित पाण्याचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे रुग्णसंख्या दोन हजारांपेक्षा अधिक झाली आहे.
प्रशासनाच्या महितीनुसार सुमारे एक हजार नागरिकांनाच कावीळ झाली असून त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक नागरिक बरे झाले आहेत. प्रत्यक्षात मात्र दोन हजारांपेक्षा अधिक नागरिकांना कावीळ झाली आहे. आगरकर मळा परिसरात, तर प्रत्येक घरात तीनते चार रुग्ण आढळत आहेत.

निवडणुकीमुळे विसर
साथ पसरल्यानंतर नागरिकांसह विरोधी व काही सत्ताधारी नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. आमदार अनिल राठोड व महापौर संग्राम जगताप यांनीही तातडीने काविळीची लागण झालेल्या भागाची पाहणी करून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आता मात्र विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाल्याने सर्वांनाच काविळीचा विसर पडला आहे. रुग्णांची संख्या आटोक्यात का येत नाही, अशी साधी विचारणा करण्यासाठीही कुणाला वेळ नाही.

उपचारांसाठी हजारोंचा खर्च
आगरकर मळा परिसरात एका घरातील तीन-चार जणांना काविळीची लागण झाली आहे. अनेकांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यामुळे एका कुटुंबाला उपचारासाठी सुमारे ५० ते ६० हजारांचा खर्च सोसावा लागतो. कावीळ झालेल्या प्रत्येक रुग्णाला महापालिकेने ५० हजारांची मदत द्यावी, अशी मागणी आमदार राठोड यांनी केली होती, परंतु महापालिकेने या मागणीला केराची टोपली दाखवली. त्यामुळे रुग्णांच्या उपचाराच्या खर्चाचा प्रश्न गंभीर झाला आहे.

नागरिकांचा रास्ता रोकोचा इशारा
आगरकर मळा, आनंदनगर, सागर कॉम्प्लेक्स व स्टेशन रस्ता परिसरात अजूनही दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. काविळीच्या त्रासापासून आमची तातडीने मुक्तता करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच आमच्याकडून २०१४-१५ या वर्षाची पाणीपट्टी वसूल करू नये, अशी मागणी या परिसरातील नागरिक जिल्‍हाधिकारी अनिल कवडे यांच्याकडे करणार आहेत. मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही या नागरिकांनी दिला आहे.

आरोग्यधिकारीपुन्हा "नॉट रिचेबल'
महापािलकेचे प्रभारी आरोग्यधिकारीडॉ. सतीश राजूरकर फोन उचलत नाहीत, अशी तक्रार अनेक नगरसेवकांनी यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत केली होती. डॉ. राजूरकर यांनी यापुढे फोन उचलला नाही, तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी सूचना खुद्द महापौर संग्राम जगताप यांनी आयुक्त कुलकर्णी यांना भर सभेत केली होती, तरीदेखील डॉ. राजूरकर नागरिक, नगरसेवक व पत्रकारांचे फोन घेत नाहीत. त्यामुळे आता डॉ. राजूरकर यांच्यावर आयुक्त कारवाई करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.