आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘केदारेश्वर’च्या 1500 कार्यकर्त्यांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी - केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याला गाळप परवाना द्यावा, या मागणीसाठी कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी पुणे येथील साखर संकुल कार्यालयावर मोर्चा काढणार्‍या सुमारे दीड हजार आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. कारखान्याचे संस्थापक बबनराव ढाकणे यांच्यापाठोपाठ प्रताप ढाकणे यांनाही अटक झाल्याने ‘केदारेश्वर’संदर्भातील आंदोलन आणखी चिघळले आहे.

‘केदारेश्वर’ने दहा वर्षांसाठी अंबिरकरवाडी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीशी दहा वर्षांचा करार केला आहे. या कंपनीने कारखान्यावरील कर्जाचे हप्ते भरून कारखाना सुरू करण्याची तयारी केली होती. ‘केदारेश्वर’ प्रशासनाने 30 सप्टेंबरला नगर येथील साखर संचालक कार्यालयात कारखान्यास गळीत हंगाम सुरू करण्यास परवानगी द्या, असा प्रस्ताव पाठवला होता. मात्र, सव्वा महिना होऊनही गाळपास परवानगी मिळत नसल्याने पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील ‘केदारेश्वर’ बचाव कृती समितीने आंदोलने केली. त्यापूर्वी ढाकणे यांनीही आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी पुण्यात साखर संकुलावर मोर्चा काढण्यात आला. प्रताप ढाकणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल कराळे, तालुकाप्रमुख रफिक शेख, नगरसेवक डॉ. दीपक देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष डॉ. मृत्युंजय गज्रे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पवार, अमोल बढे, अजय भंडारी, गहिनीनाथ शिरसाठ, डॉ. राजेंद्र खेडकर, योगेश रासने, कचरू चोथे आदींसह सुमारे दीड हजारावर कार्यकर्त्यांनी साखर संकुलावर गाळप परवाना मिळालाच पाहिजे, शासनाचा धिक्कार असो, अशा घोषणा देत मोर्चा काढला.

गेटवरच पोलिसांनी मोर्चा अडवल्याने प्रताप ढाकणे व पोलिस अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. साखर आयुक्त विजय सिंघल कार्यालयात नसल्याने कारखान्याचे अधिकारी तीर्थराज घुंगरट, पोपट केदार या शिष्टमंडळाने प्रशासकीय साखर संचालक अरुण तोष्णीवाल यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर तोष्णीवाल मोर्चेकर्‍यांना सामोरे गेले.

कारखान्याला गाळपाचा प्रस्ताव आजच मिळाला आहे, त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार साखर आयुक्तांना असल्याने त्यांनी यावर निर्णय घेण्यास असर्मथता दर्शवली. याबाबतचा निर्णय तासाभरात घ्या; अन्यथा अधिकार्‍यांना बाहेर पडू देणार नाही, असा पवित्रा घेतला. दीड तासानंतर तोष्णीवाल मोर्चेकर्‍यांना सामोरे गेले. त्यांनी यावर तत्काळ कार्यवाही करण्यात घेईल, असे आश्वासन दिले.

प्रताप ढाकणे म्हणाले, मोर्चा काढणार याची पूर्वकल्पना देऊनही आयुक्त कार्यालयात थांबत नाहीत. दुष्काळी भागातील कारखाने विक्रीस काढण्याचा उद्योग स्वत:चे खिसे भरण्यासाठी काही नेत्यांनी व अधिकार्‍यांनी सुरू केला आहे. ‘केदारेश्वर’ विकायचा असेल, तर शंभर कोटींना विका व सर्व रक्कम सभासदांना द्या. बबनराव ढाकणे यांचे वय 76 झाले. तरीही ते तुरूंगात जातात. ते स्वार्थासाठी नाही, हे लक्षात घ्या. आमच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय दिला नाही, तर मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढू, असा इशारा त्यांनी दिला.