आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस-राष्ट्रवादी व भाजपमधील गटाने सहकारी साखर कारखाने मोडकळीस आणले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमधील काही गटाने महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने मोडकळीस काढले. या तिन्ही पक्षांतील गटाने लुटमार सुरू केली आहे, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री व केदारेश्वर साखर कारखान्याचे संस्थापक बबनराव ढाकणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

ढाकणे म्हणाले, केदारेश्वर कारखाना गोरगरिबांच्या रक्तातून उभा राहिला आहे. कारखाना सुरू ठेवण्यासाठी माझा लढा यापुढेही कायम राहणार आहे. माझे आंदोलन हे राजकीय स्टंटसाठी नाही. आयुष्यभर मी समाजासाठी संघर्ष केला आहे. दहा वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादी व भाजपमधील काही गटाने राज्यातील साखर कारखाने मोडून, आजारी पाडून स्वत:च्या मालकीचे कसे करता येईल. यासाठी प्रयत्न सुरू केले. कारखानदारी व्यक्ती स्वार्थासाठी व भांडवलदारांसाठी मोडून काढण्यात आली आहे. राज्यात 202 साखर कारखाने आहेत. त्यातील बहुतांशी कारखाने कर्जबाजारी झाले आहेत. गेल्या वीस वर्षांत राज्य सहकारी बँका, जिल्हा सहकारी बँका या काँग्रेस-राष्ट्रावादीने ताब्यात घेतल्या आहेत. जिल्ह्यात बावीस कारखाने आहेत. बावीसपैकी दक्षिणेतील पारनेर, जगदंबा, नगर, पाथर्डी, शेवगाव या तालुक्यांतील कारखाने गोरगरिबांनी उभारले. मात्र, मागील दहा वर्षांत हे कारखाने विक्रीला काढण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे, असेही ते म्हणाले. प्रस्थापितांनीच सहकार चळवळ मोडकळीस काढली आहे. कारण व तारण न देता साखर कारखान्यांना कोट्यवधींचे कर्ज देण्यात आले. काही ठिकाणी काँग्रेस-भाजपने, तर काही ठिकाणी राष्ट्रवादी व भाजपने हे कारखाने खरेदी केले आहेत. तिन्ही पक्षांतील गटांचे प्रमुख, सहकारमंत्री, साखर आयुक्त, बँकेचे अधिकारी एकत्र बसून कारखाने विकत घेण्याचा निर्णय घेतात, असा आरोप त्यांनी केला. ‘केदारेश्वर’ला अडचणीत आणणारे खरे शुक्राचार्य हे नगर जिल्ह्यातील नसून ते मुंबईतील आहेत, असा आरोप त्यांनी केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे, केदारेश्वर बचाव समितीचे पदाधिकारी अनिल कराळे आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री चव्हाण यांची स्तुती, तर भाजपवर केली टीका
राज्यातील सहकारी साखर कारखाने मोडकळीस आणण्याचे काम काँग्रेस-राष्ट्रवादी व भाजपमधील गटाने सुरू केले आहे. भाजपमध्ये गडकरी न मुंडे यांचा वेगळा गट आहे. हा गट सध्या मोडकळीस आलेले कारखाने खरेदी करत आहे. त्यात पवारांचाही एक गट आहे. मुख्यमंत्र्यांना राज्यही सांभाळायचे आहे आणि कारखानदारीमधील लूटही थांबवायची आहे, असे म्हणत बबनराव ढाकणे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची स्तुती केली, तर भाजपवर टीका केली.

मी मुंडेंचा सर्मथक..
मागील सहा महिन्यांपूर्वी केदारेश्वर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या परवान्याची मागणी केली होती. बीड, पुणे, कोल्हापूरबरोबर नगर जिल्ह्यातील अन्य साखर कारखान्यांना गाळपाचा परवाना मिळाला. मात्र, ‘केदारेश्वर’ला परवाना मिळालेला नाही. खासदार गोपीनाथ मुंडे यांचा मी सर्मथक आहे. कारखान्याचा विषय हा वैयक्तिक विषय आहे. यात पक्षाचा काही संबंध नाही. ‘केदारेश्वर’बाबत तोडगा न निघाल्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी सांगितले.

दोन्ही कारखान्यांचे अध्यक्ष एकाच पक्षाचे
वैद्यनाथ साखर कारखान्याकडून ‘केदारेश्वर’ला 10 कोटींचे येणे आहे. आठ महिन्यांपासून कामगारांना पगार नाही. कारखान्यात असलेली साखर ही लेव्हीची नव्हती. कामगारांच्या पगारासाठी मी आंदोलन केले. मला व कामगारांना अटक केली. ‘वैद्यनाथ’चे अध्यक्ष व ‘केदारेश्वर’चे अध्यक्ष हे दोन्ही एकाच पक्षाचे आहेत. मात्र, जबाबदारी टाळून कारखाना मोडकळीस आणण्याचा हा प्रकार आहे, अशी टीका ढाकणे यांनी मुंडे यांचे नाव न घेता केली.