आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेज एकचे काम रखडणार केडगावचा पाणीप्रश्न गंभीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- एकीकडे शहरात रोज हजारो लिटर पाणी वाया जात असताना केडगाव उपनगरातील काही भागात मात्र सध्या आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होत आहे. तेथील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. महापालिकेचे अधिकारी मात्र सर्व आलबेल असल्याचे सांगत आहेत. केडगाव पाणीपुरवठा योजनेचे (फेज 1) अंतिम टप्प्यात असलेले कामही आता निधीअभावी रखडण्याची शक्यता आहे. त्यामुळे केडगाववरील पाणीटंचाईचे सावट आणखी काही दिवस कायम राहणार आहे.

केडगाव परिसरात महापालिकेचे 7 वॉर्ड आहेत. अधिकार्‍यांप्रमाणेच तेथील नगरसेवकही पाणीप्रश्नाबाबत उदासीन आहेत. सुमारे 60 हजार लोकसंख्या असलेल्या या उपनगरातील नागरिकांना सध्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. कुणी सायकलवर, कुणी गाडीवर, तर कुणी डोक्यावर पाणी आणत आहे. कामधंदा सोडून पाणी आणावे लागत असल्याने नागरिक वैतागले आहेत.

शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटण्याचे प्रकार मागील काही महिन्यांपासून वाढले आहेत. त्याचा सर्वात जास्त फटका केडगावलाच बसतो. जलवाहिनी दुरुस्तीच्या नावाखाली सलग आठ-दहा दिवस केडगावचा पाणीपुरवठा बंद केला जातो. सध्या केडगावला दोन-तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात शाहूनगर, एकनाथनगरसारख्या काही भागाला आठ दिवसांत एकदाच पाणी मिळते. शहराला मात्र रोज आणि सावेडी उपनगरला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. तेथे वाया जाणार्‍या पाण्याचे प्रमाण जास्त आहे. अनेक नागरिक पाणी भरून झाल्यानंतर उर्वरित पाणी रस्त्यावर सोडून देतात. काहीजण शिळे पाणी फेकून देतात. केडगावमधील नागरिकांना मात्र एकदा पाणी आल्यानंतर दुसर्‍यांदा कधी येईल, याची शाश्वती नसते.

केडगाव पाणीपुरवठा योजनेचे काम रेंगाळले आहे. मोहिनीनगर, एकनाथनगर, ओंकारनगर, जपेनगर व लोंढे मळा येथील पाण्याच्या टाक्यांची कामे अर्धवट आहेत. अंतर्गत पाइपलाइन टाकण्याचे काम 90 टक्के पूर्ण झाले असले तरी त्याचा दर्जा चांगला नाही. काम वेळेत पूर्ण न झाल्याने या योजनेसाठी आणखी 2 कोटी 80 लाखांच्या निधीची गरज निर्माण झाली आहे. तसा प्रस्ताव आयुक्तांकडे देण्यात आला आहे. काम पूर्ण होण्यासाठी 4 ते 5 कोटी लागणार आहेत. त्यामुळे सध्या योजनेचे काम पुन्हा रखडण्याची शक्यता आहे.

पाणीप्रश्न गंभीर नाही
केडगावला रोज सुमारे 22 लाख लिटर पाणीपुरवठा होतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा येथील पाणीप्रश्न गंभीर नाही. एकनाथनगर येथील टाकीमुळे पाणीपुरवठा करणे सोयीचे झाले आहे. मात्र, जुन्या वितरण व्यवस्थेमुळे काही ठिकाणी अडचणी आहेत. फेज 1 चे काम पूर्ण झाल्यानंतर ही अडचण दूर होईल.’’
-व्ही. जी. सोनटक्के, शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग.

मुबलक पाण्याची कधीपासून प्रतीक्षा..
काटकसर करून पाणी वापरले तरी ते पुरेसे नसते. चार-पाच दिवसांतून एकदाच पाणी मिळते. ते संपल्यावर पाण्यासाठी वणवण करावी लागते. आज ना उद्या मुबलक पाणी मिळेल, याची अनेक वर्षांपासून वाट पाहत आहोत.. ’’
-मनीषा शिंगवी, गृहिणी, अंबिकानगर.