आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kedgaon Zilha Parishad Executive Engineer Charge Sheet Issue

कार्यकारी अभियंत्यावर विविध प्रकरणांत आरोपपत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जिल्हा परिषदेच्या केडगाव येथील प्राथमिक शाळेतील 13 वर्गखोल्या दुरूस्त करण्याच्या नावाखाली सुमारे 8 लाखांचा अपहार झाला. याप्रकरणी कार्यकारी अभियंता पी. पी. खंडागळे यांच्यासह तीन अभियंत्यांना चौकशी समितीने दोषी ठरवले. जुन्या तीन प्रकरणांतही खंडागळे अडचणीत आले असून एकत्रित आरोपपत्र शासनाला सादर करण्याची कार्यवाही प्रशासनाकडून सध्या सुरू आहे.

पंचायत राज समितीने जामखेड पंचायत समिती इमारतीच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. प्रशासनाने गुणवत्ता नियंत्रक विभागाकडून या कामाचा अहवाल मागवला. पर्यवेक्षणात झालेल्या हलगर्जीपणामुळे खंडागळे अडचणीत आले. विभागप्रमुखाला काही कामांच्या मंजुरीचे अधिकार आहेत. मात्र, हे करताना अर्थ खात्याची शिफारस आवश्यक असते. खंडागळे यांनी अशी शिफारस न घेताच मंजुरी दिल्याचे लक्षात आले. याप्रकरणी प्रशासनाने खंडागळे यांच्यावरील कारवाईबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवला. शासनाने आरोपपत्र सादर करण्याचे आदेश दिले. मात्र, अद्यापि हे आरोपपत्र सादर झालेले नाही.

दरम्यान, केडगाव येथील प्राथमिक शाळेच्या 13 खोल्यांच्या दुरूस्तीच्या कामातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आला आहे. या खोल्यांच्या बांधकामासाठी 24 फेब्रुवारी 2011 रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला. हे काम अवघ्या एक महिन्यात पूर्ण करून त्यासाठी 9 लाख 15 हजार 393 रुपये खर्च दाखवण्यात आला. वास्तविक या कामावर अवघे 49 हजार खर्च झाला. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती. त्यानंतर प्रशासनाने उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप पालवे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. मात्र, अहवाल सादर होण्यास विलंब झाल्याने प्रशासनाने पालवे यांनाच शिस्तभंगाची कारवाई का करू नये, अशी विचारणा नोटिशीद्वारे केली. त्यामुळे पालवे यांनी 23 मे रोजी अहवाल सादर केला. यात दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता पी. पी. खंडागळे, शाखा अभियंता आर. जी. पानसंबळ, उपअभियंता एस. ए. पोवार यांना दोषी ठरवले.

वाळकीतील रस्त्याचा प्रस्ताव अडचणीचा
वाळकी येथील आरोग्य केंद्राच्या रस्त्याचे काम झालेले असतानाही दुसर्‍यांदा त्याच कामाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आला. यातही खंडागळे अडचणीत आले आहेत. या कामाच्या मंजुरीसाठी कोणी आग्रह धरला होता, याची चौकशी होणेही गरजेचे आहे.

अध्यक्षांचे कानावर हात
शाळा दुरूस्ती प्रकरणातील अपहाराबाबत पत्रकारांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल लंघे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी मला या प्रकाराबाबत माहिती नसल्याचे सांगितले. माहिती घेऊनच बोलता येईल, असे ते म्हणाले.