आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kharekarjune Explosion : Police Inquary, Project Affected Not Having Certificat

खारेकर्जुने स्फोट : पोलिस तपास सुस्त, प्रकल्पग्रस्तांचे दाखलेच नाहीत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - कमी लोकसंख्या व एमआयडीसी जवळ असूनही विकासकामांची वानवा, बेरोजगारी, तरुणाईत नवे काही करण्याच्या इच्छाशक्तीचा अभाव यासारख्या समस्या नगर तालुक्यातील खारेकर्जुनेकरांचा पिच्छा सोडायला तयार नाहीत. लोकप्रतिनिधींनी केलेले दुर्लक्ष, भंगारचोरी, स्फोटाच्या गुन्ह्यांबाबत पोलिसांचा कधीच पूर्ण न झालेला तपास आणि जिल्हा प्रशासनाची अनास्था गावाच्या मागासलेपणाला कारणीभूत ठरली आहे. त्यामुळे लोकांनी पैसे कमावण्याचा हा जीवघेणा, परंतु जवळचा वाटणारा मार्ग चोखाळला. शुक्रवारी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने गावाला भेट दिली असता, गावातील व्यवहार अगदी काहीच विशेष घडले नसल्यासारखे सुरू होते. कारण अशा घटनांची गावाला सवयच झाली आहे.

खारेकर्जुने गावातील सुमारे सातशे एकर जमीन लष्कराने 1961 मध्ये अधिग्रहित केली. ही जमीन मुख्यत्वे गोड पाण्याची होती, तर उर्वरित जमीन क्षारपडीची होती. त्याकाळी गावात साक्षरतेचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे प्रकल्पग्रस्तांची प्रमाणपत्रे मिळवण्यासाठीही कोणी प्रयत्न केले नाहीत. नंतर ज्यांना कागदपत्रांचे महत्त्व लक्षात आले त्यांनी राजकीय वरदहस्त वापरून ती मिळवली. पण, इतर ग्रामस्थ अजूनही प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र व त्यापासून मिळणार्‍या लाभांपासून वंचित आहेत.

अजूनही गावातील निम्मे लोक शेती करीत असले, तरी त्यातून फारसे काही मिळत नसल्याने काही लोकांनी लष्कराच्या युद्धसराव क्षेत्रात छुप्या पद्धतीने घुसखोरी करून मूल्यवान भंगार गोळा करण्याचा ‘जीवघेणा’ उद्योग सुरू केला. हे भंगार काळ्या बाजारात विकून बक्कळ पैसा कमावण्याचा फंडा त्यांना सोपा वाटला. पण याच ‘शॉर्टकट’ने आतापर्यंत किमान 30 जणांचा बळी घेतला. (काही गावकरी हा आकडा शेकड्यात असल्याचे ‘ऑफ द रेकॉर्ड’ सांगतात)

अपघात वाढल्यानंतर लष्कराने दारुगोळ्याचे भंगार गोळा करण्यासाठी परप्रांतीय ठेकेदार नेमला. पण, ठेका संपूनही तो पुनरुज्जीवित केला नाही म्हणून ठेकेदारही गजाआड झाला. आता नगरमधील ठेकेदाराकडे भंगार गोळा करण्याचा ठेका आहे.

तपासाबाबत प्रश्नचिन्ह
खारेकर्जुने गावातील भंगारचोरीच्या प्रकरणात अद्यापपर्यंत कोणालाही शिक्षा झालेली नाही. काही वर्षांपूर्वी शेळके नावाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी पकडले होते. त्याच्यावर लष्कराचा दारुगोळा चोरल्याचा ठपका होता. तो राजकारणी नेते व पोलिसांच्या संपर्कात असल्याचे गावकरी सांगतात. नंतर त्याचा गूढरित्या मृत्यू झाल्यामुळे त्या गुन्ह्याचा तपासही थंडावला. दोन वर्षांपूर्वी ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला होता. तो तपासही संथगतीने सुरू आहे. एकूणच भंगार गोळा करणार्‍यांचे व पोलिसांच्या ‘अर्थपूर्ण’ संबंधांमुळे हा जीवघेणा धंदा फोफावल्याचे लोक सांगतात.

रोजगारासाठी पर्याय उपलब्ध करण्याची गरज
लष्करी सरावक्षेत्रात मिळणार्‍या निकामी दारुगोळ्यातील मूल्यवान स्फोटक पदार्थ मिळतात. विशेषत: दारुगोळ्याच्या पावडरला ‘काळ्या बाजारा’त चांगली अडीच ते तीन हजार रुपये किलो इतकी किंमत मिळते. ही पावडर नंतर सुरुंगासाठी वापरली जाते. भंगार तस्करीसोबत गावात वाळूतस्करी व चंदनतस्करीही जोरात चालते. रोजगार नसल्यामुळे तरुणाई अशा अवैध धंद्यांकडे वळते, असे गावातील ज्येष्ठ नागरिक सांगतात. या तरुणाईसाठी प्रशासनाने चांगले पर्याय उपलब्ध करून दिले, तर गावावरचा बदनामीचा शिक्का पुसेल, असा गावकर्‍यांना विश्वास आहे.