आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहृत मुलीचा ताबा मागणार्‍या पित्याचा अर्ज नामंजूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगरमधून अपहरण करून धुळ्यातील कुंटणखान्यात विकण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीचा ताबा मिळावा, अशी मागणी करणारा तिच्या पित्याचा अर्ज न्यायालयाने गुरुवारी नामंजूर केला. युवतीचा सांभाळ करायला पिता असर्मथ असल्याचे मत जिल्हा न्यायाधीश बी. यू. देबडवार यांनी नोंदवले.

अपहरण झालेली युवती सध्या औरंगाबाद येथील महिला सुधारगृहात आहे. 16 जुलैला तिच्या पित्याने मुलीचा ताबा मिळावा, यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. सरकार पक्षाच्या वतीने अँड. सुरेश लगड व रमेश जगताप यांनी काम पाहिले. अपहृत युवतीच्या आईने पुण्यातील कोरेगाव पार्क ठाण्यात फेब्रुवारीमध्ये पतीविरुद्ध दिलेल्या तक्रारअर्जाकडे त्यांनी लक्ष वेधले. या अर्जात आईने मुलीच्या वडिलांना दारूचे व्यसन असून ते मुलींना व आपल्याला मारहाण करतात, असे म्हटले आहे. शिवाय मुलीला वेश्याव्यवसायाला भाग पाडत असल्याचा आरोपही केला आहे. काही महिन्यांपूर्वी ही युवती वडिलांच्या त्रासाला कंटाळून चाकणला नातेवाईकांकडे गेली होती. वडिलांकडूनच तिच्या जिवाला धोका असल्याने युवतीला वडिलांच्या ताब्यात देण्यास सरकार पक्षातर्फे तीव्र आक्षेप घेण्यात आला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने पित्याचा अर्ज फेटाळला. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी सुधाकर संग्राम कांबळे, अलताफ अबुल खाटिक व आशाबाई पाटील यांच्या वतीने जामिनासाठी अर्ज करण्यात आला असून त्यावर 23 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.