आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी आणून द्या; अन्यथा आत्मदहन, अपहृत मुलीच्या आईचा पोलिसांना निर्वाणीचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - श्रीगोंदे तालुक्यातील मांडवगण येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण होऊन दीड महिना उलटला, तरीही आरोपी मुलीचा तपास पोलिसांना लावता आलेला नाही. शिवाय आरोपीचे नातेवाईक धमकावत असल्यामुळे पीडित मुलीचे कुटुंब भीतीच्या छायेखाली आहे. या तपासात श्रीगोंद्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी हलगर्जीपणा करत असल्याने जिल्ह्यात महिलांची सुरक्षा अद्याप रामभरोसेच आहे, असा आरोप शिवसेना महिला आघाडीने केला आहे. या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना महिला आघाडीने आता बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
नगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना महिला आघाडीने आपली भूमिका मांडली. मांडवगण येथील संबंधित शेतकरी कुटुंबात आई, वडील तीन मुलींचा समावेश आहे. सर्वात मोठ्या मुलीचे लग्न आपल्याशी लावून देत नाही, म्हणून शेतकऱ्याच्या बहिणीच्या मुलाने दुसऱ्या क्रमांकाच्या मुलीचे अपहरण केले. मुलगा ड्रायव्हर व्यसनी आहे, शिवाय मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिच्या घरच्यांनी लग्नाला नकार दिला. हा नकार पचवता आल्यामुळे २५ जूनला काही गुंडाच्या मित्रांच्या मदतीने संबंधित तरुणाने मुलीचे अपहरण केले.
दोन दिवस शोध घेऊनही मुलगी सापडली नाही. त्यामुळे अखेर संबंधित युवक त्याच्या कुटुंबीयांच्या विरुद्ध श्रीगोंदे पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली. या घटनेला दीड महिना झाला, तरीही अपहरण करणारा आरोपी युवक अपहृत युवती पोलिसांना सापडलेले नाहीत. आम्ही पोलिस ठाण्यात चकरा मारत आहोत, पण पोलिसांकडून उलटसुलट उत्तरे मिळत असल्यामुळे आम्हाला न्याय मिळेल असे वाटत नाही, असे पीडित मुलीच्या आई वडिलांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुलीचे अपहरण होऊनही पोलिस केवळ आमचे प्रयत्न तपास सुरू आहे, असे सांगत आहेत. अपहरण करणारा युवक नात्यातील असल्यामुळे पोलिस पीडित कुटुंबालाच तुच्छतेची वागणूक देत आहेत. मुलीचे आई-वडील पोलिस ठाण्यात चौकशीसाठी गेले, तर त्यांना दिवसभर बसवून ठेवले जाते. एकूणच पोलिसांना या गुन्ह्याच्या तपासाचे काहीच गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे, असा आरोप शिवसेनेच्या महिला आघाडीने केला. पत्रकार परिषदेला मुलीच्या आई-वडिलांसह शिवसेना महिला आघाडीच्या सुषमा पडोळे, आशा निंबाळकर, किरण हजारे उपस्थित होत्या.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
पत्रकार परिषद संपल्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी शिवसेना महिला आघाडीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडत आम्हाला न्याय मिळवून द्या, अशी विनंती त्यांनी केली. दीड महिना होऊनही मुलगी सापडत नसल्यामुळे आपला धीर खचला आहे. आठ दिवसांत जर मुलगी सापडली नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा पीडित मुलीच्या आईने यावेळी दिला. तसे लेखी निवेदन त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी पाटील यांना दिले.

तर बेमुदत उपाेषण
जिल्ह्यात मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. आरोपीचे कुटुंबीय धमकावत असल्यामुळे पीडित कुटुंबातील इतर दोन मुलींचे शिक्षणही बंद झाले आहे. पोलिस बघ्याची भूमिका घेत असतील, तर न्याय कोणाकडे मागायचा, असा सवाल शिवसेना महिला आघाडीने केला. राज्यात आमचा पक्षही सत्तेत असला, तरीही दुर्दैव कायम आहे. आठ दिवसांत अपहृत मुलीचा शोध लावला नाही, तर महिला आघाडी बेमुदत उपोषण करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

मी अंतर्ज्ञानी नाही
महिलाआघाडीने पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांची भेट घेऊन तपासाबाबत विचारले असता, ‘मी काही देवमाणूस नाही. आम्ही अंतर्ज्ञानी नाहीत. आमचे प्रयत्न चालू आहेत. आरोपीचे काही डिटेल्स मिळाले तर द्या’, असे ते म्हणाले. पीडित मुलीच्या पालकांना तर त्यांनी तुमच्याच पाहुण्यांनी मुलगी पळवून नेली आहे, असे त्यांनी सुनावले. अधिकारी जर अशी भाषा वापरत असतील, तर फिर्यादीने दाद कोणाकडे मागायची, असा सवाल आशा निंबाळकर यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...