आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चाैकशीच्या ससेमिऱ्यामुळे कपाटांची अदलाबदल सुरू, जिल्ह्यात १४ चौकशी उपसमित्या स्थापन करून चौकशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर -  अंगणवाडी सेविकांमार्फत खरेदी केलेली कपाटे निकृष्ट असल्याने याची जिल्हास्तरीय चौकशी सुरू झाली आहे. \"क्लिन चिट\' मिळवण्यासाठी निकृष्ट कपाटे हलवून दर्जेदार कपाटे खरेदी केल्याचे दाखवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. दरम्यान, अंगणवाडी सेविकांवर निकृष्ट खरेदीसाठी दबाव आणणाऱ्या महाभागांचा शोध समिती घेणार आहे. त्यासाठी तालुका स्तरावर १४ उपसमित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. 
 
एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत अंगणवाड्यांना कपाटे खरेदीसाठी सेविकांच्या खात्यावर हजार रुपये जमा करण्यात आले होते. या रकमेतून लोखंडी मिनी कपाटे खरेदी करणे अपेक्षित होते. तथापि, ही कपाटे निकृष्ट असल्याचे समोर आल्यानंतर जिल्हास्तरावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे मुख्य लेखा वित्त अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची समिती स्थापन करण्यात आली. या समितीला जिल्हाभरातील हजार ६०३ अंगणवाड्यांना भेट देणे अशक्य आहे. या समितीने आतापर्यंत १४ पैकी तीन-चार तालुक्यांत भेटी दिल्या आहेत. सर्वच तालुक्यांतील सखोल चौकशी करण्यासाठी १४ तालुक्यांमध्ये सहायक गटविकास अधिकारी सहायक लेखाधिकारी यांच्या उपसमित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. शनिवारी जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

या घोटाळ्यात नेमका दोषी कोण, याचा शोध घेण्यासाठी समितीचे कसब पणाला लागणार आहे. कपाटाचे पैसे थेट सेविकांच्या खात्यावरच वर्ग करून स्थानिक पातळीवर कपाटे खरेदी करण्याचे निर्देश होते. पण काही पुरवठादारांनी थेट अंगणवाडीतच निकृष्ट दर्जाची कपाटे पोहोच करून बिले देण्यास सेविकांना सांगितले. या प्रकरणात प्रशासनातील काही अधिकारी संघटनांच्या काही पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. कपाट निकृष्ट असल्याचे समोर आल्यानंतर प्रथमदर्शनी सेविकांवरच कारवाई होण्याची चिन्हे आहेत. परंतु दोषी नसलेल्या सेविकांचा यात बळी जाऊ नये, यासाठी चौकशी समिती जिल्ह्यातील सर्वच सेविकांचेही जबाब नोंदवणार आहे. 

दरम्यान, या चौकशीतून निर्दोष सुटण्यासाठी अंगणवाड्यांमध्ये पोहोच झालेली निकृष्ट कपाटे हलवण्याचा पर्याय समोर आला आहे. ही कपाटे हलवून दर्जेदार, तसेच निकषानुसार कपाटे खरेदी करून दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पण या पळवापळवीची झळ मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना बसण्याची शक्यता आहे. 

गोपनीय जबाब 
शनिवारी झालेल्या बैठकीत तालुकास्तरावर चौकशी करण्यासाठी प्रश्नांची यादी देण्यात आली. कपाट कोणाकडून खरेदी केले, पावतीवरील दुकानाचा पत्ता, लेखी पुरवठा आदेश, वरिष्ठ कार्यालयाने कपाट खरेदीबाबत सूचना दिली का, यासह इतर प्रश्नांचा गोपनीय जबाब नोंदवला जाणार असल्याचे समजले. 
 
बातम्या आणखी आहेत...