आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डागवालेंना स्थानिकांचे शिव"बंधन', किशोर डागवाले अखेर शिवसेनेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले नगरसेवक किशोर डागवाले अखेर शिवसेनेत दाखल झाले. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शनिवारी मुंबईत सेना प्रवेश केला. शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी नगरसेवकांनी रविवारी त्यांचा स्वागत समारंभ आयोजित केला होता, परंतु त्यास थंड प्रतिसाद मिळाला. सेनेचे मोजके पदाधिकारी नगरसेवकांनीच या समारंभास हजेरी लावली. त्यामुळे डागवाले यांच्या सेनाप्रवेशास शिवसैनिकांचा तीव्र विरोध असल्याचे स्पष्ट झाले.

पूर्वाश्रमीचे कट्टर शिवसैनिक डागवाले यांनी गेल्या आठ-दहा वर्षांपासून सेनेशी फारकत घेत वेगळी चूल मांडली होती. या वेगळ्या चुलीवरील भाकरी करपायला लागल्याने डागवाले यांनी पुन्हा सेनेच्या मार्ग निवडला. महापौर निवडणुकीत पक्षादेश पाळल्याने त्यांची मनसेतून हकालपट्टी झाली होती. त्यामुळे निराधार झालेल्या डागवाले यांना पुन्हा सेनेत प्रवेश करण्याची उपरती झाली. सत्तेच्या जवळ राहण्याची सवय लागलेल्या डागवाले यांनी सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापौर निवडणुकीचा योग्य अंदाज बांधला. महापालिकेत सेनेची सत्ता येणार असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट आहे. राजकारणात मुरलेल्या डागवाले यांनी पुन्हा सत्तेच्या जवळ राहण्यासाठी सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. विनाअट सेनेत प्रवेश करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले, तरी त्यांची पदाची अपेक्षा लपून राहिलेली नाही. महापालिकेत सेनेची सत्ता आल्यानंतर स्थायी समितीचे सभापतिपद, सभागृह नेता अथवा शिवसेना शहरप्रमुख पदावर त्यांचा डोळा आहे. हे सर्व राजकीय गणित बांधत त्यांनी सेनेत प्रवेश केला.

डागवाले यांच्या सेना प्रवेशास सेनेचे काही पदाधिकारी नगरसेवकांनी कडाडून विरोध केला, परंतु हा विरोध झुगारून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डागवाले यांच्या सेना प्रवेशास हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर डागवाले यांच्या सेना प्रवेशाचे स्थानिक पदाधिकारी नगरसेवकांनी स्वागत केले, परंतु हा स्वागत समारंभ केवळ औपचारिकताच ठरला. मोजकेच पदाधिकारी नगरसेवकांनी स्वागत समारंभास हजेरी लावली. त्यामुळे डागवाले यांच्या सेनाप्रवेशाचे "मूळ' भविष्यात सेनेच्या दुफळीचे कारण ठरणार आहे, यात शंका नाही. स्वागत समारंभ संपल्यानंतर अनेक नगरसेवकांनी पत्रकारांजवळ तशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे भविष्यात डागवाले यांचा प्रवेश सेनेला डोकेदुखीच ठरणार आहे.

औपचारिकता म्हणून दोन शब्द
डागवालेपूर्वाश्रमीचे खंदे शिवसैनिक. आठ-दहा वर्षांनंतर ते पुन्हा स्वगृही परतले. सेनेकडून त्यांचे जंगी स्वागत होणे अपेक्षित होते, परंतु तसे होता त्यांच्या स्वागत समारंभास अनेक नगरसेवक गैरहजर होते. शहरप्रमुख कदम यांनी मारून मुटकून प्रास्ताविक केले. शिवसेना उपनेते राठोड हेदेखील केवळ अौपचारिकता म्हणून दोन शब्द बोलले.

पुढील स्‍लाइडवर वाचा तीन नगरसेवकांचाही प्रवेश?
बातम्या आणखी आहेत...