आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आले पतंगबाजीचे, काटाकाटीचे दिवस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - मकरसंक्रांत जवळ आल्याने शहरात पतंगांचे स्टॉल लागले आहेत. सध्या नाताळाची सुटी असल्याने बच्चे कंपनी आतापासून पतंग व मांजा खरेदीसाठी गर्दी करत आहे. बरेली व चायना मांजाला यंदाही विशेष मागणी आहे.

नगरमध्ये दिवाळीनंतर आकाशात पतंग दिसू लागतात. नाताळच्या सुटीत अनेकजण पतंग उडवण्याचा आनंद घेत आहेत. नवीन वर्षातील पहिला सण मकरसंक्रांतीचा. या सणावेळी पतंगोत्सव साजरा होतो. आतापासूनच घरांच्या छतावर बच्चे कंपनी पतंग उडवताना दिसत आहे. आकाशात काटाकाटी रंगू लागली आहे.

पतंगप्रेमींचा कल धारदार मांजा खरेदीकडे आहे. पूर्वी साध्या धाग्याचा बंडल घेऊन त्याला काच लावण्याचे काम करावे लागे. आता बरेली, पांडा, मैदानी, चायना आदी प्रकारचे तयार मांजाचे प्रकार 1 ते 4 हजार मीटर लांब रिळमध्ये उपलब्ध आहेत. नायलॉनचे चायना मांजे अधिक धारदार असल्याने मुलांकडून त्याला पसंती मिळत आहे. चायना मांजात मोनोकाइट, जंबो, मोनो हीरो, मोनो फिल, ड्रॅगन हे प्रकार उपलब्ध आहेत. चक्री व कागदाचेही दर वाढले आहेत. त्यामुळे पतंगांची यंदा भाववाढ झाली. 2 ते 150 रुपयांपर्यंत आकारानुसार पतंगाचे दर आहेत. यंदा मांजांचे दरही वाढले. मागणी असली तरी चायना मांजा कमी प्रमाणात विक्रीला ठेवला आहे, असे मांजा विक्रेते प्रदीप क्यादर यांनी सांगितले.

अमेरिकेचा पॅरट बर्ड काइट यंदा प्रथमच नगरमध्ये
सावेडी परिसरात राहणार्‍या अरुण पटेल यांचा नातू देवांश याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे परदेशस्थ काका त्रिपूर पटेल यांनी अमेरिकेतील पॅरट बर्ड काइट हा पतंग भेट दिला. हा पतंग नायलॉनच्या कापडाने बनवलेला आहे. पतंगाच्या काड्या फायबर ग्लासच्या आहेत. या पतंगाचे वैशिष्ट्य म्हणजे वारा जोरात वाहत असतानाच हा पतंग उडवला जातो. समुद्रकिनारी उडवण्यासाठी हा पतंग प्रसिद्ध आहे. डोंगरावरदेखील हा पतंग चांगल्या पद्धतीने उडवता येतो. विशेष म्हणजे या पतंगाची घडी घालता येते. या पतंगाची किंमत सुमारे 300 रुपये आहे.