आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतंगच्या मांजाने कापला दोन जणांचा गळा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर: चिनी बनावटीच्या मांजानेच भिंगारकरांवर ‘संक्रांत’ आणली असून, दोन जणांचा गळा कापून ते गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी भिंगारमध्ये घडली. यामुळे नागरिकांनी चिनी मांजावर बंदी आणावी, अशी मागणी केली.
भिंगारमधील सौरव कॉलनी येथील रहिवासी नितीन शिंगवी यांचा मुलगा सोहन शिंगवी दुपारी पतंगाच्या मांजाने बोट कापून जखमी झाला. वडिलांनी त्याला रुग्णालयात नेले. पिता-पुत्र मोटारसायकलने घराकडे परतत असताना रस्त्यावरील मांजाने पुन्हा सोहनचा गळा कापून तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या गळ्याला आठ टाके घालावे लागले.
एमइएस वसाहतीतील दिलीप कहाणे रविवारी सकाळी स्कूटरवरून जात असताना रस्त्यात आडवा तरंगत असलेला चिनी मांजा त्यांच्या लक्षात आला नाही. तो मांजा त्यांच्या गळ्याला घासल्याने ते गंभीर जखमी होऊन गाडीवरून पडले. त्यांना तातडीने सिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चिनी मांजा धोकादायक असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केले होते. त्यात नगरमधील विक्रेते तो सर्रास विकत असल्याचे स्पष्ट केले होते, पण त्याची प्रशासनाने दखल न घेतल्याचा परिणाम रविवारी दिसून आला.
चौथ्या मजल्यावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू
पतंग उडवताना चारमजली इमारतीवरून पडल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शितळादेवी परिसरात नवरंग व्यायामशाळेजवळ घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मनोहर नारायण येमूल (32) असे मृताचे नाव आहे. नवरंग व्यायामशाळा परिसरातील एका इमारतीच्या गच्चीवरून मनोहर पतंग उडवत होता. तोल गेल्याने खाली पडून त्याचा जागीच मृत्यू झाला.