आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्टगल्लीत भरवस्तीत डॉक्टरवर चाकूहल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शहराच्या मध्यवस्तीतील कोर्टगल्ली परिसरात डॉ. र्शीकांत नारायण मोने यांच्या घरी सोमवारी (7 ऑक्टोबर) रात्री पावणेनऊच्या सुमारास चोरीचा प्रयत्न झाला. भरवस्तीत घडलेल्या या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली. चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात डॉ. मोने जखमी झाले आहेत. आठवडाभरातील ही दुसरी घटना असून वाढत्या गुन्हेगारीमुळे कोतवाली पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रo्नचिन्ह निर्माण झाले आहे.

डॉ. मोने हे कोर्टगल्लीतील मोनेवाड्यात राहतात. सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास तिघेजण मोटारसायकलीवरून त्यांच्या घरासमोर आले. तोंडावर काळा बुरखा पांघरलेला एक चोरटा हातात गुप्ती, नकली पिस्तूल व दोरखंड घेऊन डॉ. मोने यांच्या घरात घुसला. त्याने गुप्ती व पिस्तूल दाखवून डॉ. मोने यांना धमकावण्यास सुरुवात केली. डॉ. मोने यांना काय प्रकार घडतोय याचा अंदाज येण्यापूर्वीच चोरट्याने त्यांच्या डाव्या हाताचे मनगट व कोपरावर चाकूने वार केला. डॉ. मोने यांनी जीवाच्या आकांताने आरडाओरड केली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली.

जमाव येत असल्याचे पाहून डॉ. मोने यांच्या घरासमोर थांबलेले दोन चोरटे मोटारसायकल तेथेच सोडून पसार झाले. तिसरा चोरटा घरातच होता, पण नंतर हातातील गुप्ती, दोरखंड, बनावट पिस्तूल व बुरखा तेथेच टाकून त्यानेही पळ काढला. जमावातील काही जणांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हातातील चाकूचा धाक दाखवून तो चोरटा पसार होण्यात यशस्वी झाला.

घटनेनंतर काहींनी कोतवाली पोलिस ठाण्यात माहिती कळवली. पाच मिनिटांत कोतवाली पोलिस घटनास्थळी पोहोचू शकले असते. मात्र, तब्बल 25 मिनिटांच्या विलंबानंतर पोलिस आले. श्वानपथक पोहोचण्यास रात्रीचे दहा वाजले. चोरट्यांनी घरासमोर लावलेली बजाज कंपनीची मोटारसायकल, तसेच घरात टाकलेला बुरखा, गुप्ती, दोरखंड, बनावट पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. श्वानपथकाने वाडिया पार्कपर्यंत चोरट्यांचा माग काढला. तेथून हे चोरटे वाहनाने पसार झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली.

पोलिसांनी केलेल्या विलंबामुळे भरवस्तीत हल्ला करून चोरटे पसार होण्यात यशस्वी ठरले. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. घटनास्थळी शहर उपविभागाचे उपअधीक्षक श्याम घुगे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. डॉ. मोने यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसर्‍या दिवशीही चोरट्यांचा शोध घेण्यात कोतवाली पोलिस अपयशी ठरले.

वृद्धेच्या हातातील बांगड्या हिसकावल्या
कोर्टगल्लीजवळ असलेल्या सांगळेगल्लीत दोन दिवसांपूर्वीच घरात घुसून वृद्ध महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या हिसकावून नेण्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर पोलिसांनी दक्षता न घेतल्याने डॉ. मोनेंवर हल्ला झाल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला. चोरट्यांची वाढलेली हिंमत पाहता पोलिस गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.