आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोलते खून प्रकरण: औरंगाबाद, बीडमध्येही पिन्या कापसे 'वाँटेड'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: पिन्या ऊर्फ सुरेश भरत कापसे
नगर - पोलिस कर्मचारी दीपक कोलते यांच्या खूनप्रकरणातील मुख्य आरोपी पिन्या ऊर्फ सुरेश भरत कापसे याचा शोध नगरसह तीन जिल्ह्यांचे पोलिस करत आहेत. कोलते यांच्या खूनप्रकरणात पिन्या कापसे गेल्या नऊ महिन्यांपासून फरार आहे. मात्र, जसे नगरचे पोलिस पिन्याच्या मागावर आहेत, तसेच बीड औरंगाबाद जिल्ह्याचे पेालिसही त्याचा कसून शोध घेत आहेत.
पिन्यावर बीड पोलिसांनी वर्षांपूर्वीच मोक्कानुसार कारवाई केलेली होती. पण, त्या गुन्ह्यांमध्येही फरार झालेला पिन्या कापसे आता त्यांच्यासाठी मोठी डोकेदुखी बनलेला आहे.
फेब्रुवारी महिन्यात कोलते यांचा खून झाला. वाळूतस्कर पिन्या कापसे साथीदारांनी हा गुन्हा केला होता. तेव्हापासून पिन्या कापसे फरार आहे. गुंडाने केलेल्या हल्ल्यात पोलिसाचा खून झाल्यामुळे हे प्रकरण राज्यभर गाजले. कामात कुचराई केल्याबद्दल स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांवर तेव्हा निलंबनाची कारवाई झाली. त्यानंतर व्यापक मोहीम राबवून पिन्याचा शोध सुरू झाला. पण, अजूनही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून पिन्याच्या शोधाचा प्रयत्न झाला. पण त्यात अपयशच आले. पिन्या परराज्यात पळून गेल्याचाही संशय व्यक्त होत होता.

पिन्याच्या टोळीविरुद्ध तेव्हाचे पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनी पाठवलेला मोक्का अंतर्गतचा प्रस्ताव मंजूर झाला. अन् पिन्याच्या टोळीला मोक्का लागला. दरम्यानच्या काळात या गुन्ह्याचा तपास मागे पडला. पिन्याच्या मागावर नेमलेली तपास पथके अन्य कामांत गुंतली. वास्तविक पिन्या हा स्थानिक पातळीवरील आरोपी असल्यामुळे त्याचा बाहेरच्या राज्यात फारसा संपर्क असण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे त्याला नक्कीच स्थानिक पातळीवरील इतर गुन्हेगार किंवा गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्यांची मदत असावी, अशी शंका व्यक्त होत होती.

पिन्याच्या शोधार्थ नेमलेल्या तपास पथकाच्या अधिकाऱ्यांची बढतीवर बदली झाली. तेव्हापासून त्याची शोध मोहीम थंडावलेली आहे. पिन्या हा नगरच नाही, तर बीड औरंगाबाद पोलिसांकरिताही मोठी डोकेदुखी आहे. त्याच्या टोळीविरुद्ध बीड जिल्ह्यातील चकलांबा ठाण्यात दरोडे, जबरी चोऱ्या, लुटमारीचे अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.

बीड पोलिसांनी मोक्कानुसार कारवाई केल्यानंतर पिन्या नगरमध्ये पळून आला होता. तो फरार असल्यामुळे सध्या तीनही जिल्ह्यांचे पोलिस त्याच्या मागावर आहेत. त्यामुळे त्याला कोण गजाआड करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

नेटवर्क कमकुवत
पिन्याकापसेला नगरच्या पोलिसांनी यापूर्वीही अनेकदा अटक केलेली आहे. अर्थात त्यावेळी त्याने नुकतीच गुन्हेगारी विश्वात पावले टाकलेली होती. नंतर बीड पोलिसांनीही त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. यापूर्वी पिन्याला अटक करणारे पोलिस आपल्या मर्दुमकीचे किस्से नेहमीच रंगवून सांगत असतात, तर सध्या पिन्याच्या मागावर असलेल्या पोलिसांमध्ये बहुतांश नव्या दमाच्या कर्मचाऱ्यांचा भरणा आहे. अशा दोन्हीही दमाचे पोलिस अजूनही खात्यातच आहेत. आपापल्या खबऱ्यांच्या नेटवर्कवर त्यांना ठाम विश्वासही आहे, तरीही पिन्या अजून फरार का आहे? हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न अनुत्तरित आहे.

लांडगा आला रे आला
पोलिसाचाखून करून पिन्या कापसे फरार झाला परराज्यात पळून गेल्याचे सांगितले जात होते. पण, तरीही अनेकदा पिन्या जिल्ह्यात येऊन गेलेला आहे. पिन्याचे गाव शेवगाव तालुक्यात असून त्याची सासुरवाडी पाथर्डी तालुक्यातील आहे. त्यामुळे पिन्या नगरमध्ये आल्याची माहिती पोलिसांना अनेकदा मिळालेली आहे. पण, त्याच्या मुसक्या आवळण्याच्या मोहिमेत मात्र नेहमीच चालढकल झाली. फरार होऊनही पिन्याने नगर, बीड औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर केलेल्या लुटमारीचे किस्से अजूनही रंगवून सांगितले जातात. पण, पोलिस घटनास्थळी जाईपर्यंत पिन्या फरार झालेला असतो.

नऊ महिने अपयशच
पिन्याच्यामुसक्या आवळण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने दोन तपास पथके नेमली होती. सहायक निरीक्षक सुनील टोणपे एका पथकाचे नेतृत्व करत होते. दरम्यानच्या काळात इतर गंभीर घटना घडल्याने एक पथक इतरत्र कार्यरत झाले. टोणपे यांनी महिनाभर पिन्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पण, नंतर त्यांच्यावर तोफखाना ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून जबाबदारी आली. तेव्हापासूनच पिन्याचा तपास थंडावला. स्थानिक गुन्हे शाखा अद्यापही पिन्याचा ठावठिकाणा शोधत आहे. पण, नऊ महिने उलटूनही त्यांना यश आलेले नाही.

तीन वर्षांपूर्वीच मोक्का
बीडपोलिसांनी नोव्हेंबर २०१२ मध्ये पिन्याच्या टोळीविरुद्ध मोक्कानुसार कारवाई केली होती. औरंगाबाद ग्रामीण बीड जिल्ह्यात पिन्याच्या टोळीने दरोडे, जबरी चोऱ्या, लुटमार करून उच्छाद मांडलेला होता. बीड जिल्ह्यातील चकलांबा पोलिस ठाण्यात अनेक गुन्ह्यांची नोंद असलेले पिन्या कापसे याच्यासह ताराचंद कचरे, लक्ष्मण दसपुते, योगेश ओव्हळे, बंडू ऊर्फ गोविंद दराडे, मनोज बिटाळ, राजेंद्र सुरवसे यांच्यावर मोक्कानुसार कारवाई केली होती. बीडचे तत्कालीन पोलिस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांनी हा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे पाठवला होता.
बातम्या आणखी आहेत...