आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपी भैलुमेच्या घराचे सील काढण्याची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर झालेले अत्याचार खून खटल्यातील तिसऱ्या क्रमांकाचा आरोपी नितीन गोपीनाथ भैलुमे याच्या घराला पोलिसांनी सील ठोकले आहे. महत्त्वाची कागदपत्रे अडकली असल्याने या घराचे सील काढण्याचे आदेश द्यावेत, तसेच दोषनिश्चितीतून वगळण्याच्या अर्जावर उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी कालावधी वाढवून द्यावा, असे दोन अर्ज गुरुवारी भैलुमे याचे वकील अॅड. प्रकाश आहेर यांनी जिल्हा न्यायालयात सादर केले. या अर्जांवर आता नोव्हेंबरला सुनावणी होईल.
भैलुमेच्या वतीने यापूर्वी केलेला दोषमुक्तीचा अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी २० ऑक्टोबरला फेटाळला होता. त्याच्या जामीनअर्जावर २७ ऑक्टोबरला सरकार पक्षाचे म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले होते. भैलुमेच्या दोषमुक्तीसाठी औरंगाबाद खंडपीठात अपील करणार असल्याचे त्याच्या वकिलांनी सांगितले होते. त्याबाबत काय केले, हेही न्यायालयात सांगावे लागणार होते. त्यासाठी अॅड. आहेर गुरुवारी दुपारी न्यायालयात आले. त्यांच्यामार्फत भैलुमेच्या वतीने दोन अर्ज सादर करण्यात आले. जिल्हा न्यायालयाने दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्यानंतर भैलुमेला खंडपीठात अपील करायचे होते, पण त्यासंदर्भातील कागदपत्रांवर त्याच्या स्वाक्षऱ्या मिळवण्यात दोन दिवस गेले. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध होऊ शकली नाहीत. पुरेसा कालावधी मिळाल्यामुळे अद्याप अपील दाखल करू शकलो नाही, असे पहिल्या अर्जात म्हटले आहे. भैलुमेला अटक केल्यापासून त्याच्या कोपर्डीतील घराला पोलिसांनी सील ठाेकले आहे. हे सील काढण्याचे आदेश देण्याची विनंती दुसऱ्या अर्जाद्वारे करण्यात आली. सील काढून घराचा ताबा भैलुमे त्याच्या कुटुंबीयांकडे द्यावा, तसेच त्याच्या घरातील सर्व वस्तू जिथल्या तिथे असल्याची शहानिशा करावी, अशी विनंतीही अर्जात करण्यात आली आहे. भैलुमेच्या वतीने जिल्हा न्यायालयात करण्यात आलेल्या जामीन अर्जावर गुरुवारी सरकार पक्षाचे म्हणणे सादर होणे अपेक्षित होते. मात्र, ते सादर झाले नाही. त्यामुळे गुरुवारी दुपारी भैलुमेच्या वतीने नव्याने सादर करण्यात आलेल्या दोन्ही अर्जांवर, तसेच जामीनअर्जावर आता नोव्हेंबरला सुनावणी होईल.
बातम्या आणखी आहेत...