आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपर्डीचा खटला सुरू; आज आरोप निश्चित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कर्जत तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या तीन आरोपींच्या विरोधात येथील जिल्हा सत्र न्यायालयात मंगळवारी खटला सुरू झाला. जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर आरोपींना हजर करण्यात आले. दरम्यान, मुख्य आरोपीसह आणखी एका आरोपीने आपली बाजू मांडण्यासाठी वकील मिळावा, असा विनंती अर्ज न्यायालयाकडे सादर केला. तिसरा आरोपी नितीन भैलुमे याने आपल्या वकिलामार्फत जामिनासाठी अर्ज केला. त्यानंतर खटल्याचे कामकाज स्थगित करण्यात आले. बुधवारी (१९ ऑक्टोबर) ते पुढे सुरू होईल.
कोपर्डीतील शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या तीन आरोपींच्या विरोधात पोलिसांनी तीनशे पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. पोलिसांतर्फे बाजू मांडण्यासाठी सरकारने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुुक्ती केली आहे. आरोपींच्या विरोधात जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर मंगळवारी सुनावणी सुरू झाली. येरवडा कारागृहात असलेला मुख्य आरोपी जितेंद्र बाबुलाल शिंदे याच्यासह आरोपी संतोष गोरक्ष भवाळ नितीन गोपीनाथ भैलुमे यांना पोलिसांनी दुपारी न्यायालयासमोर हजर केले. या खटल्याचे गांभीर्य ओळखून जिल्हा न्यायालयाच्या आवारात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
विशेष सरकारी वकील निकम हे सकाळपासूनच न्यायालयात हजर होते. मोठ्या पिंजऱ्यातून आणलेल्या तिन्ही आरोपींना प्रथमच चेहरा झाकता न्यायालयात हजर करण्यात आले.
आरोपींना पाहण्यासाठी न्यायालयाच्या आवारात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी आरोपींना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याच्यासह दुसरा आरोपी संतोष भवाळ याने आपली बाजू मांडण्यासाठी अाम्हाला वकील मिळावा, असा विनंती अर्ज न्यायाधीशांकडे केला. तिसरा आरोपी नितीन भैलुमे याने आपल्या वकिलामार्फत जामिनासाठी अर्ज केला. त्यानंतर न्यायाधीशांनी खटल्याचे कामकाज स्थगित केले. आरोपींनी दिलेल्या विनंती अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे.

मकासरे यांची नियुक्ती
मुख्यआरोपी जितेंद्र शिंदे याच्यासह दुसरा आरोपी संतोष भवाळ याने आपली बाजू मांडण्यासाठी वकील मिळावा, असा विनंती अर्ज न्यायालयात सादर केला. विधी सेवा प्राधिकरण समितीने दोन्ही आरोपींचा खटला लढवण्यासाठी निवृत्त सरकारी वकील योहान मकासरे यांची नियुक्ती केली. दोन्ही आरोपींची बाजू मकासरे कशी मांडतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागणार आहे.

निकम आज बाजू मांडणार
खटल्याचीसुनावणी तातडीने सुरू करावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायाधीशांकडे केली. दरम्यान, आरोपी नितीन भैलुमे याचे वकीलपत्र घेतलेले वकील प्रकाश अहेर यांनी भैलुमेचा या प्रकरणाशी संबंध नसून त्याला अारोपमुक्त करून जामीन द्यावा, अशी मागणी न्यायालयाकडे केली. याबाबत निकम बुधवारी न्यायालयासमोर आपली बाजू मांडणार आहेत.

निकम यांची कोपर्डीला भेट
विशेष सरकारी वकील निकम यांनी खटल्याचे कामकाज आटोपल्यानंतर कोपर्डीला भेट देऊन घटनास्थळाची पंचनाम्याप्रमाणे पाहणी करून पीडित कुटुंबाशी संवाद साधला. अारोपींना फाशी द्या, अशी मागणी मुलीच्या आईने केली. ‘न्यायदेवतेवर विश्वास ठेवा... खटला सक्षमपणे लढवला जाईल. तुमच्या मुलीला निश्चित न्याय मिळेल, यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेन’, असे निकम यांनी सांगितले. यावेळी तपास अधिकारी शशिकांत पाटाेळे पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...