आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतीमुळे छेडछाडीच्या प्रकाराकडे केला कानाडोळा, तिन्ही आरोपींना न्यायालयात ओळखले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर : ‘त्या’घटनेच्या एक-दोन दिवसांपूर्वीच त्यांनी ‘तिची’ छेड काढून धमकावले होते. हा प्रकार आपण आईला सांगितला. पण मुख्य आरोपी तुलाही त्रास देतील, अशी भीती आईने व्यक्त केल्यामुळे अापण ‘त्या’ घटनेविषयी कोठे बोललो नाही, अशी महत्त्वपूर्ण बाब कोपर्डीतील (ता. कर्जत) अत्याचाराला बळी पडलेल्या पीडितेच्या वर्गमैत्रिणीने न्यायालयात सांगितली. तिन्ही आरोपींनाही तिने न्यायालयात ओळखले. तिघेही कोपर्डीतच राहतात, असेही तिने उलट तपासणीत ठासून सांगितले. 
 
कोपर्डी खटल्याचे कामकाज जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरू आहे. मंगळवारी पीडितेच्या वर्गमैत्रिणीने साक्ष नोंदवली. तिची उलटतपासणीही पूर्ण झाली. ही वर्गमैत्रिण पीडिता इयत्ता सहावीपासून एकाच वर्गात शिकत होत्या. अत्याचाराला बळी पडलेली आपली मैत्रिण खो-खो अभ्यासात हुशार होती, असे या वर्गमैत्रिणीने सांगितले. दोघीही स्कूलबसमधून सोबतच येत-जात होत्या, असेही तिने नमूद केले. 
 
१३ जुलैला रात्री ११ च्या सुमारास वडिलांनी पीडितेवरील अत्याचाराचा प्रकार आपल्याला सांगितला. तो एेकून आपल्याला धक्का बसला. कारण एक-दोन दिवसांपूर्वीच जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबुराव शिंदे याने पीडितेला धमकी दिल्याची घटना आठवली. शाळेतून पायी घरी येताना चारीजवळच्या रस्त्यावर समोरुन मोटारसायकलवर तिघे आले. त्यांनी मोटारसायकल आडवी लावून आम्हाला अडवले, असे वर्गमैत्रिणीने साक्षीत सांगितले. 
 
ते तिघे पप्पू शिंदे, संतोष भवाळ नितीन भैलुमे होते. पप्पू शिंदेने पीडितेला अश्लील भाषा वापरली हात धरुन तिला चारीच्या दिशेने ओढण्याचा प्रयत्न केला. पीडितेने त्याला ढकलून देत स्वत:ची सुटका केली. त्यावर आपण पप्प्याला जाब विचारला. त्यावर पप्प्याने पीडितेकडे पहात ‘तुला मी माझे कामच दाखवतो’, असे धमकावले. भैलुमे भवाळ हसायला लागले. ‘आपण हिला नंतर आपले काम दाखवू’, अशी धमकी देत ते निघून गेले. 
 
हा प्रकार आपण घरी सांगायला हवा, असे मी पीडितेला म्हटले. ‘तू घरी सांगतेस की, मी सांगू?’ असे विचाल्यानंतर पीडिता म्हणाली, मीच सांगते. या घटनेच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी (१२ १३ जुलै २०१६) पीडिता शाळेत आली नव्हती. त्यानंतर १६ जुलैला आपण वडिलांसोबत पोलिस ठाण्यात जाऊन या घटनेविषयी जबाब नोंदवला, असे वर्गमैत्रिणीने आपल्या साक्षीत नमूद केले. सुमारे पाऊण तास तिची साक्ष नोंदवण्यात आली. 

म्हणून गप्प राहिले... 
मुख्य आरोपी शिंदे याच्या वतीने अॅड. मकासरे यांनी वर्गमैत्रिणीची उलटतपासणी घेतली. घटनेच्या एक-दोन दिवसांपूर्वी घडलेला छेडछाडीचा प्रकार पोलिसांना, वर्गशिक्षकांना का सांगितला नाही, असे त्यांनी विचारले. त्यावर हा प्रकार आपण घरी जाऊन आईला सांगितला. पण पप्प्या तुलाही त्रास देईल, अशी भीती आईने व्यक्त केली. त्यामुळे मी तो प्रकार कोणाला सांगितला नाही, असे उत्तर वर्गमैत्रिणीने उलटतपासणीत दिले

दबावाचा आरोप 
आरोपी भवाळ याच्या वतीने अॅड. बाळासाहेब खोपडे यांनी वर्गमैत्रिणीची उलटतपासणी घेतली. त्यांनी वर्गमैत्रिणीच्या वर्गातील बसण्याची जागा, वर्गातील इतर विद्यार्थ्यांच्या ओळखी, तिच्या बाकावर कोण बसते, जेवणाच्या सुटीचा कालावधी, याविषयी विचारणा केली. त्यावर विशेष सरकारी वकील यांनी तीव्र आक्षेप घेतला. हे प्रश्न खटल्याच्या अनुषंगाने नसल्याचे ते म्हणाले. न्यायालयाने त्यांचा विरोध नोंदवून घेतला. 
 
ते गावातच राहतात 
आरोपी भैलुमे याच्या वतीने अॅड. प्रकाश आहेर यांनी उलटतपासणी घेतली. भैलुमे हा पुण्यात रहात असल्याचे त्यांनी म्हटले. तत्पूर्वी अॅड. खाेपडे यांनीही दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी भवाळ हा कोपर्डीत नव्हे, तर कर्जत तालुक्यातील खांडवी गावात राहतो, असे म्हटले होते. त्यावर वर्गमैत्रिणीने हे दोन्ही आरोपी कोपर्डीतच राहतात, असे ठासून सांगितले. तिन्ही आरोपींनी केलेल्या छेडछाडीची लेखी तक्रार केली नसल्याचे ती म्हणाली. 

गर्दीत ओळखले आरोपी 
खटल्याचे कामकाज एेकण्यासाठी न्यायालयात तोबा गर्दी झाली होती, तरीही सरतपासणीत मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याला पीडितेच्या वर्गमैत्रिणीने अचूक ओळखले. भवाळ भैलुमे यांच्यात मात्र तिची गफलत झाली. काही वेळाने आरोपींना न्यायालयातील गर्दीत बसवण्यात आले. त्यावेळी मात्र तिने आरोपींच्या जवळ जात त्यांना उभा करुन नावासह त्यांना अचूक ओळखले. या प्रकाराला आरोपींच्या वकिलांनी मात्र विरोध दर्शवला. 
 
 
बातम्या आणखी आहेत...