आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोपर्डी खटला; तिन्ही दाेषींना फाशीच! सव्वा वर्षाने न्याय, महाराष्ट्रामधील सर्वात वेगवान निकाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर- महाराष्ट्राचे समाजमन ढवळणाऱ्या कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व खून प्रकरणी मुख्य आरोपी जितेंद्र बाबुलाल शिंदे (२५), सहआरोपी संतोष गोरख भवाळ (३०) व नितीन गोपीनाथ भैलुमे (२५) यांना बुधवारी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. बुधवारी सकाळी ११.३० वाजता जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी विविध कलमांनुसार तपशीलवार निकालाचे वाचन करून ५ मिनिटांत निकाल दिला. बलात्कार व खून खटल्यात फाशीची शिक्षा होण्याचा हा सर्वात वेगवान निकाल असल्याचे या खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. 


घटनेच्या सव्वा वर्षांनंतर पीडितेला न्याय मिळाला. खटल्यात पीडितेची आई, बहीण व मैत्रिणीच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. शिक्षेनंतर आरोपींना बंदोबस्तात पुन्हा सबजेल कारागृहात नेले. तेथून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. १८ नोव्हेंबरला कोर्टाने तिन्ही आरोपींना दोषी ठरवले होते. 

 

अपिलासाठी ३० दिवसांची मुदत 
या निर्णयाविरुद्ध आरोपींना ३० दिवसांत औरंगाबाद खंडपीठात अपील करता येईल. तेथे आरोपींतर्फे काम पाहण्यास कोणी पुढे आले नाही, तर तिन्ही आराेपींना विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने कायदेशीर साह्य पुरवले जाईल, असे न्यायाधीश केवले यांनी नमूद केले. 

 

इतर पीडितांवरील अत्याचाराविरुद्ध लढेन..
अश्रूंच्या आवेगात पीडितेची आई म्हणाली, ‘छकुली... तुझी आठवण येते गं... नराधमांना फासावर लटकेपर्यंत लढाई सुरू ठेवू. यापुढे अशा घटना घडू नयेत, म्हणून कार्यरत राहीन. तसेच समाजातील इतर पीडितांवरील अत्याचारािवरुद्ध लढेन. न्यायव्यवस्था व अॅड. निकम यांच्यावर विश्वास होता. फाशीसाठी मराठा समाज एकवटला. त्यामुळेच छकुलीला न्याय मिळाला.

 

परिस्थितिजन्य पुराव्यांची साखळी 
प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. परिस्थितिजन्य पुराव्यांची साखळी तयार केली. कट करणारा गुन्हा करणाऱ्याप्रमाणे दोषी असतो, असा युक्तिवाद केला. सहआराेपींना फाशीच का द्यावी, यादाखल सुप्रीम कोर्टाचे १० न्यायनिवाडे सादर केले. त्यात इंदिरा गांधी हत्या, संसद हल्ला प्रकरणाचाही समावेश होता.
- अॅड. उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील 

 

बलात्कार पीडितांत भेदभाव का : हायकोर्ट

 मनाेधैर्य याेजनेअंतर्गत तुटपुंजी मदत देणाऱ्या सरकारला हायकाेर्टाने फटकारले. यानंतर ही रक्कम १० लाखांपर्यंत वाढवू, असे सरकारने हायकाेर्टात सांगितले. मात्र अत्याचारानंतर मृत्युमुखी पडलेली महिला नाेकरदार असेल तर १० लाख व गृहिणी असल्यास ५ लाखांची मदत देण्याचे सांगण्यात अाले. त्यावरही हायकाेर्टाने हा भेदभाव का, असा प्रश्न विचारला. महाधिवक्त्यांनी दाेन्ही महिलांना १० लाख मदत देण्याची ग्वाही दिली.

 

‘फ्रोझन ब्लडेड मर्डर’
या खटल्याच्या निमित्ताने कोर्टात प्रथमच ‘फ्रोझन ब्लडेड मर्डर’ हा शब्दप्रयोग झाला. क्रूर खुनाला ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’ (थंड डोक्याने केलेला खून) असे म्हणतात. पण कोपर्डीचा प्रकार त्याहून गंभीर आहे. त्यामुळे त्याला ‘फ्रोझन ब्लडेड मर्डर’ (रक्त गोठलेल्या डोक्याने क्रूरपणे केलेला खून) म्हणावे लागेल, असे अॅड. निकम अंतिम युक्तिवादात म्हणाले होते.

 

पुढील स्‍लाइडवा वाचा, 
तिघांना जन्मठेप, २० हजार दंड, ३ वर्षे सक्तमजुरी... 
निकम यांनी लढवलेल्या खटल्यांत ही ४४वी फाशी...

 

हे ही वाचा,
कोपर्डीचा न्‍याय: ‘सात तासांच्या’ पहिल्या आंदोलनाची न्याय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका...
कोपर्डीचा न्‍याय: ‘त्या’ क्रूर कृत्याला शिक्षा तर केली, पण पूर्वीचा विश्वास निर्माण होईल?...
आई म्हणाली, 'छकुली..तुझी आठवण येते गं'; इतर पीडितांसाठीही अखेरपर्यंत लढेन!...
कोपर्डीच्या तिन्ही दोषींना फाशीच का? उज्ज्वल निकम यांनी कोर्टात असा केला होता युक्तिवाद...

बातम्या आणखी आहेत...