आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आई म्हणाली, \'तुझी आठवण येते गं छकुली\'; इतर पीडितांसाठीही अखेरपर्यंत लढेन!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- माझ्या छकुलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या नराधमांना फाशी द्यावी, अशी मागणी होती. त्यासाठी सर्वांनी रस्त्यावर उतरून साथ दिली. आरोपींना झालेली शिक्षा कायम राहण्यासाठी अखेरपर्यंत मी पाठपुरावा करेन.. यापुढे अशा घटना घडू नयेत, इतर पीडित मुलींवर होणाऱ्या अत्याचाराविरोधातही अखेरपर्यंत लढेन.., अशी ग्वाही काेपर्डीतील पीडित तरुणीच्या माऊलीने न्यायालयाच्या निकालानंतर दिली. 


कोपर्डी खटल्याचा निकाल ऐकण्यासाठी सकाळपासूनच न्यायालयासमोर गर्दीचा ओघ लोटत होता. मुख्य प्रवेशद्वारात सर्वांची कसून तपासणी करूनच पोलिस त्यांना आत सोडत होते. पत्रकार, वकिलांना सुरुवातीला प्रवेश देण्यात आला. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पाेलिस अधीक्षक घनश्याम पाटील, सहायक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, उपअधीक्षक बाळासाहेब थोरात, एलसीबीचे पीआय दिलीप पवार, ताेफखाना पीआय सुरेश सपकाळे, कोतवाली पीआय अभय परमार, भिंगार कॅम्पचे एपीआय कैलास देशमाने, फौजदार गजानन करेवाड, राजकुमार हिंगोले, श्रीधर गुठ्ठे यांच्यासह राखीव पोलिस दल तैनात होते.


वृत्तवाहिन्या व छायाचित्रकारांनी सकाळपासूनच न्यायालयात हजेरी लावली. वार्तांकनाचे कव्हरेज लाईव्ह दाखवण्यासाठी सर्वांचा आटापिटा सुरू होता. न्यायालय परिसरात ठिकठिकाणी पोलिसांना फिक्स पॉइंट दिलेले होते. न्यायालय परिसरात होणाऱ्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी एलसीबीचे पोलिस संदीप घोडके व संदीप पवार छतावर उभे राहून टेहळणी करत होते. प्रत्येक प्रवेशद्वारात मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी करून आत सोडले जात होते.

 

सकाळपासून सर्वांना आरोपींना कधी आणले जाते, याची उत्सुकता होती. आरोपींना मंगळवारी रात्रीच येरवडा कारागृहातून सबजेलला आणले होते. आरोपींचे छायाचित्र टिपण्यासाठी सर्वांचे प्रयत्न होते.


सर्वांना दिला चकवा 

८ वाजून ५५ मिनिटांनी पोलिसांचे वाहन न्यायालयात आले. त्यापुढे एक जीप होती. त्यामुळे या वाहनातच आरोपी असल्याचा सर्वांनी अंदाज बांधला. ही दोन्ही वाहने मुख्य इमारतीच्या डाव्या बाजूला वळली. त्यापाठोपाठ सर्व छायाचित्रकार, वृत्तवाहिन्यांचे कॅमेरामन्स, पत्रकार धावले. वाहनाचा दरवाजा उघडला. आत शस्त्रधारी पोलिस बसलेले होते. आता आरोपी बाहेर येतील, या अपेक्षेने त्यांची छबी टिपण्यासाठी सर्वजण सज्ज झाले. मात्र, ५ मिनिटे उलटली तरी वाहनातून काेणी बाहेर येईना. अखेर पाच मिनिटांनी एकेक जण खाली उतरायला सुरुवात झाली. अन् त्या व्हॅनमधून पोलिसांशिवाय कोणीच उतरले नाही. 


आरोपी थेट दालनात

नेहमीच्या सुनावणीला अारोपींना उजव्या बाजूच्या दरवाजाने आत नेले जाते. मात्र, आधी आलेले वाहन डाव्या बाजूला गेल्याने सर्वजण तिकडे धावले. तोवर पाठीमागून बरोबर ९ वाजता आलेले दुसरे वाहन उजव्या बाजूच्या दरवाजाकडे गेले. त्यातून आरोपींना बाहेर काढून बंदोबस्तात थेट न्यायाधीशांच्या दालनात नेऊन बसवण्यात आले. पत्रकार व छायाचित्रकारांच्या लक्षात येईपर्यंत पोलिसांनी सर्वांना चकवा दिलेला होता. हे नियोजन आदल्या दिवशीच एसपी रंजनकुमार शर्मा व इतर पाेलिस अधिकाऱ्यांनी यांनी केले होते. 


पाच मिनिटांत वाचला निकाल 
 सव्वाअकरा वाजेच्या सुमारास विशेष सरकारी वकील झेड सुरक्षेत न्यायकक्षात दाखल झाले. सर्वांना मोबाइल बंद ठेवण्याची सूचना करण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले ११ वाजून २८ मिनिटांना न्यायासनावर विराजमान झाल्या. आरोपींच्या वकिलांचा पुकारा करण्यात आला. लगेचच आरोपींना समोर बोलावून निकालपत्राचे वाचन करण्यात आले. निकालपत्राच्या प्रती दुपारपर्यंत दिल्या जातील, असे सांगण्यात आले. तोपर्यंत दालनातील पत्रकार व वकिलांची गर्दी बाहेर गेली. आरोपींना पुन्हा दालनातील त्यांच्या जागी नेऊन बसवण्यात आले.


तर न्यायालयाचा अवमान

न्यायाधीश केवले निकालपत्र वाचून दाखवत असताना दालनात पुन्हा कुजबूज सुरू झाली. पाेलिसांनी दोन-तीनदा शांतता राखण्याचे आवाहन केले, तरीही प्रत्येक कलमानुसार शिक्षा वाचून दाखवताना कुजबूज सुरूच होती. त्यामुळे अखेर न्यायाधीश केवले यांनीच सर्वांना शांतता राखण्याची सूचना केली; अन्यथा दालनात उपस्थित असलेल्या सर्वांवर न्यायालयाचा अवमान करण्याचा इशारा दिला. त्यानंतर मात्र न्यायालयात पूर्णपणे शांतता पसरली. निकालाचे वाचन झाल्यानंतर सर्वजण दालनातून बाहेर गेले.


तिघांचेही चेहरे निर्विकार 
दालनात आणून बसवले तेव्हापासून तिसरा आरोपी भैलुमे खाली मान घालून बसला होता. निकाल वाचून दाखवताना तिघांना काेर्टासमाेर समोर आणले तेव्हा तिघेही न्यायाधीशांसमोर हात जोडून दयेच्या भावनेने उभे हाेते.

 

तिची आठवण येते
माझ्यासमोर पीडितेला धमकावले होते. आजही तो प्रसंग आठवला की अंगावर भीतीने काटा येतो. या निकालामुळे आरोपींना कठोर शिक्षा झाली. याचा समाजात चांगला संदेश जाईल. आजही पीडितेची प्रचंड आठवण येते. ती आमच्यात नाही, हे आठवले की डोळे ओलावतात, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या मैत्रीणीने दिव्य मराठीला दिली. ही मैत्रीण छेडछाडीच्या घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होती. 

 

निकालाने जरब बसेल
आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास होता. या निकालामुळे तो सार्थ ठरला. आमच्या मुलीला न्याय मिळाला आहे. त्याबद्दल विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, भय्युजी महाराज, मराठा समाज संघटना, मराठा क्रांती मोर्चा यांचे आभार मानतो. सर्व आरोपींना फाशीची शिक्षा जाहीर करण्याच्या या निकालामुळे गुन्हेगारांना जरब बसेल.
पीडितेचे वडील

 

न्यायव्यवस्थेचे मनापासून आभार- शरद पवारांचे ट्‍वीट
नराधमांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या कोपर्डीच्या निर्भयाला आज खर्‍या अर्थाने न्याय मिळाला. न्यायव्यवस्थेचे मनापासून आभार, अशा शब्दात शरद पवार यांनी ट्‍वीट केले आहे.

 

शिक्षेमुळे अपप्रवृत्तींना जरब बसेल : मुख्यमंत्री  
कोपर्डी अत्याचार प्रकरणातील तीन आरोपींना देण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेमुळे समाजातील अपप्रवृत्तींना जरब बसण्याबरोबरच न्यायपालिकेवरील विश्वास वाढला असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. खटल्याच्या जलद प्रक्रियेमुळे न्यायालयावरचा विश्वास वाढला. या शिक्षेमुळे अशा अपप्रवृत्तींना जरब बसून महिलांवरील अत्याचारास पायबंद बसेल, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.  

 

फासावर लटकतील तेव्हाच पूर्ण न्याय : मुंडे  
पीडितेचा जीव परत येणार नाही तरीही  आरोपींना फाशीच्या शिक्षेचा निकाल  पीडितेला आणि तिच्या कुटुंबीयांना काही अंशी न्याय देणारा आहे. हा निकाल वरिष्ठ न्यायालयात कायम राहून जेव्हा तिन्ही आरोपी फासावर लटकतील तेव्हाच पूर्ण न्याय मिळेल ही जबाबदारी राज्य शासनाची आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेतील विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली.  ‘अशा शिक्षेने गुन्हेगारांमध्ये जरब निर्माण हाेईल’, असे ते म्हणाले.

 

भविष्यात तरी मुलींवरील अत्याचार थांबतील  
कोपर्डीच्या निकालाबाबत सरकार, पोलिस प्रशासन, साक्षीदार, न्यायालय आणि मराठा मोर्चाच्या माध्यमातून दबाव आणलेल्या सर्व समाजाचे आभार मानतो. या निकालामुळे भविष्यात कोणत्याही  मुलीवर अत्याचार होणार नाही याची शाश्वती निकालाने  मिळेल.  
- राजेंद्र कोंढरे, मराठा महासंघ

 

दबाव नव्हताच 
कोपर्डीत झालेला प्रकार निर्घृण होताच, पण तिच्यावर झालेल्या अनन्वित अत्याचारामुळे संतापाची भावना होती.  मराठा समाजाचा हा दबाव किंवा रेटा जलद निर्णय लागावा म्हणून होता, चुकीचा निर्णय देण्यासाठी नव्हता, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.   
- डॉ. बाळासाहेब सराटे पाटील, मराठा समाज अभ्यासक, अाैरंगाबाद.  

 

त्वरित अंमल व्हावा  
निर्भया प्रकरणातील आरोपींना दिलेल्या फाशीच्या शिक्षेची अजूनही अंमलबजावणी झाली नाही. तसा प्रकार इथे होऊ नये म्हणून उच्च न्यायालयात फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब होऊन त्याची त्वरित अंमलबजावणी होण्याची गरज आहे.    
- संजीव भोर पाटील, संस्थापक अध्यक्ष, शिवप्रहार संघटना   

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... फोन येताच धावत पळत आला भाऊ, पण 'छकुली'चा ओझरता चेहराच दिसला...

 

बातम्या आणखी आहेत...